एक्स्प्लोर
मोदीजी, दिव्यांगांना छळणाऱ्या डीओपीटीला वठणीवर आणा!
तुम्हाला अचानक साक्षात्कार होतो, की हा मुलगा आता या पोस्टसाठी लायक नाही म्हणून? मग इतक्या विविध टप्प्यांवर तुम्हाला त्याची अकार्यक्षमता दिसली नाही का? तळपायाची आग मस्तकात जावी असा हा प्रकार आहे.

संबंधित बातमी : यूपीएससी उत्तीर्ण दृष्टीहीन जयंत मंकलेची सरकार दरबारी लढाई सुरुच
यावर्षी यूपीएससीत पास झालेल्या विद्यार्थ्यांची पोस्टनिहाय यादी डीओपीटीने (DEPARTMENT OF PERSONNEL AND TRAINING) 31 जुलैला आणि दुसरी यादी 14 ऑगस्टला लावली. या दोनही यादीत नाव नसल्यानं जयंत हवालदिल झालाय. खरंतर 31 जुलैपासूनच तो डीओपीटीशी फोन करुन आपली स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. पण त्याला फोनवर केवळ उडवाउडवीची उत्तरं मिळाली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना, पुढची मुख्य परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना परवा तो पुण्याहून मध्यरात्री दीडची फ्लाईट पकडून विजय देशमुख या मित्रासोबत दिल्लीत आला. राजेंद्रनगरमधल्या एका मित्राकडे राहिला. त्यानंतर सकाळी सकाळी तयार होऊन डीओपीटीच्या नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात पोहचला. एवढी सगळी मेहनत करुन काय मिळालं तर.. डीओपीटीतल्या एकाही अधिकाऱ्यानं त्यांना साधी भेटण्यासाठी अपॉईंटमेंट दिली नाही. रिसेप्शनवरच अडीच-तीन तास ताटकळत बसून शेवटी त्यांना तिथून निघावं लागलं. बरं त्यातही विशेष म्हणजे डीओपीटीत डेप्युटी सेक्रेटरी पदावर एक मराठी अधिकारी आहे. पण त्याचा काडीचाही उपयोग नाही झाला. अशा केसेसमध्ये अनेकदा राजकीय इच्छाशक्तीशिवाय काम होत नाही. त्यामुळे जयंतनं तोही प्रयत्न करुन पाहिला. मीडियामध्ये याची चर्चा झाली, त्यानंतर सुप्रिया सुळे, विनय सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून हा विषय डीओपीटीचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्यापर्यंत पोहचला. त्यामुळे त्यांनी जयंतला आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं. पण जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतरही फारसं काही जयंतच्या हाती लागलंच नाही. कारण डीओपीटीचे सहसचिव विजय कुमार सिंह यांनी जयंतला डीओपीटीनं कसं आपलं काम नियमानुसारच केलं आहे याचंच प्रवचन ऐकवलं. त्यांचं म्हणणं आहे की आता तुमची केस ज्या तीन पोस्ट उरलेल्या आहेत त्या मंत्रालयांकडे गेल्यात. IFS, IRPAS, ICAS या पोस्टसाठी आम्ही परराष्ट्र, रेल्वे, अर्थमंत्रालयाच्या प्रतिसादाची वाट बघतोय. त्यांनी जर कळवलं की आम्ही अशा 75 टक्के अंध विद्यार्थ्याला घ्यायला तयार आहोत, तरच काही होऊ शकेल. ही मंत्रालयं कधीपर्यंत कळवणार याचं उत्तर ते आम्ही नाही सांगू शकत. त्यांनी नकार दिला तर पुढे काय याचं उत्तर मग आम्ही तुम्हाला पोस्ट नाही देऊ शकत. मग माझं जे सध्या करंट स्टेटस आहे त्याबाबत मला लेखी द्या काहीतरी.. याचं उत्तर ते आम्ही नाही देऊ शकत. तुम्ही आरटीआय टाका हवंतर. एखाद्या अंध विद्यार्थ्यानं परीक्षा करताना काय काय कष्ट केले असतील, सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा त्याला हे सगळं करायला त्याला किती दुप्पट त्रास होत असेल आणि इतकं सगळं दिव्य पार करुन मेरीटमध्ये आलेला मुलगा आपल्यासमोर बसलाय याबद्दल जराही कणव न बाळगता डीओपीटीचा सहचिव अशा कोरड्या असंवदेनशीलतेनं उत्तर देत होता. एका मिनिटासाठी जरी त्यानं आपल्या यूपीएससीच्या तयारीचे दिवस आठवले असते तरी जयंतशी कसं बोलायला पाहिजे याचं भान त्यांना आलं असतं. म्हणजे डीओपीटीच्या म्हणण्यानुसार आता हे तीन मंत्रालय ठरवणार की जयंतला पोस्ट द्यायची की नाही. मुळात एकदा मेरीटमध्ये आल्यानंतर त्याला पोस्ट नाकारण्याची हिंमत होतेच कशी? आयएएस, आयपीएसवर जेव्हा सामान्य विद्यार्थ्यांची निवड होते, तेव्हा पुन्हा संबंधित खातं ठरवतं का यांना घ्यायचं की नाही ते? की ते सांगतात एखाद्या उमेदवाराला आता जरा 100 मीटर पळवून दाखवा बरं, मग आम्ही तुम्हाला आमच्या खात्यात आयपीएस म्हणून जॉईन करुन घेऊ. असं इतरांबाबत होतच नाही तर दिव्यांगांच्या गुणवत्तेचा हा अपमान करण्याचा अधिकार या दीडशहाण्यांना कुणी दिला? पंतप्रधान मोदींनी अपंगांसाठी दिव्यांग असा नवा शब्द शोधून त्यांच्याबद्दलची आपली कणव जाहीरपणे दाखवून दिलीय. पण त्यानंतरही या व्यवस्थेतल्या सर्वोच्च सेवेत दिव्यांगांना हे अनुभव येत असतील तर बाकी सेवांबद्दल बोलायलाच नको. गेल्या चार-पाच दिवसांपासून जयंत दिल्लीत आहे. जिथे आशा मिळेल, त्या ठिकाणी तो धडका मारतोय. पण प्रत्येकच ठिकाणी केवळ सहानुभूतीचे शब्द ऐकण्याशिवाय भरीव असं काही हाती लागत नाहीय. कोर्टात जाऊ नये म्हणून डीओपीटी त्याला अजून काहीही लेखी कळवत नाहीय. जो काही खेळ चाललाय तो या अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार. दुर्दैवानं सदैव घाईत असलेल्या एका महाराष्ट्रातल्या मंत्र्यानं जयंतला जी वागणूक दिली तीही अपमानजनक. एवढ्या दूरवरुन आलेल्या, अंधत्वावर मात करुन यूपीएससी पास झालेल्या व्यक्तीचं गाऱ्हाणं ऐकायला पाच मिनिटांचा वेळ देता येत नसेल तर मग यांची मंत्रिपदं नेमकी आहेत कुणासाठी? दुर्दैवानं दर वर्षी अशा पद्धतीचा खेळ यूपीएससीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत सुरु असतो. याआधी प्रांजल पाटील, इरा सिंघल, बेनो झेपिन अशी अनेक उदाहरणं आहेत. हे सगळेजण व्यवस्थेशी झगडून आत्ता जबाबदारीनं आपली कामं त्या त्या पदावर पार पडतायत. या अंध विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तबगारीचा इतका प्रकाश टाकला तरी धृतराष्ट्र बनलेल्या व्यवस्थेचे डोळे उघडायला तयार नाहीयत. जयंत मंकलेच्या आर्थिक, वैयक्तिक स्थितीबद्दल फारसं लिहीत नाही. कारण त्यातून सहानूभूती मिळवणं हा त्याच्या गुणवत्तेचा अपमान होईल. एबीपी माझाला त्यानं जी मुलाखत दिली, त्यातलं एकच वाक्य मात्र काळजात रुतलं. या व्यवस्थेत येऊन काम करण्याचं स्वप्न अनेकजण बघतात. पण या व्यवस्थेकडूनच तुला असा अनुभव येतोय, यावर काय वाटतं असा प्रश्न विचारल्यावर त्यानं सांगितलं. "यूपीएससी होऊन अधिकारी बनणं हे अनेकांचं स्वप्न असेल, पण माझ्यासाठी ते स्वप्न नाही तर माझी गरज आहे. मला माहितेय मी खासगी क्षेत्रात काम करु शकत नाही, म्हणून मी ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी यूपीएससीचा अभ्यास करायचं ठरवलं." माणूस एखादी गोष्ट गरज म्हणून करतो तेव्हाच ती इतक्या तडफेने करु शकतो. समोर दुसरा पर्याय नाही हे प्रत्येक क्षणाला जाणवत असतं, त्यामुळे सगळे दोर कापल्यानंतर फक्त त्वेषानं लढण्याचाच मार्ग उरतो. आपल्या अंधत्वावर मात करत असं दैदिप्यमान यश मिळवल्यानंतरही जयंतच्या वाट्याला हा संघर्ष आलाय. परवा बोलता बोलता त्याने सांगितलं की सर माझी अवस्था बघून देशभरातल्या अनेक अंध मित्रांचेही फोन येत आहेत जे यूपीएससीची तयारी करतायत. ते काहीसे अस्वस्थ आणि खचल्यासारखे झालेत. पोस्टच मिळणार नसेल तर मग आपण कशाला अभ्यास करतोय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. काय उत्तर द्यायचं त्यांना? दिव्यांग म्हणा किंवा अपंग म्हणा. पण नुसते शब्दांचे बुडबुडे आणि पोकळ सहानुभूती दाखवण्यापेक्षा जिथं खरी गरज आहे तिथं नियमांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्याची धमक दाखवा. बघुयात जयंतला न्याय देण्यासाठी आंधळ्या आणि बहिऱ्या व्यवस्थेतल्या एका तरी व्यक्तीच्या धमन्यांमधील रक्त जागं होतं का?View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
नाशिक




















