डॉ. पंजाबराव देशमुख : कृषी आणि शैक्षणिक क्रांतीचा 'प्रणेता' असलेला द्रष्टा नेता
कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्ताने एबीपी माझाचे अकोला प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी 'भाऊसाहेबां'च्या आयुष्यातील महत्वाची वळणं आणि घटना यांचा आढावा घेणारा लेख लिहिला होता. तो भाईसाहेबांच्या स्मृतीनिमित्ताने आम्ही पुन: प्रकाशित करत आहोत.
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख ('भाऊसाहेब') यांची आज स्मृतीदिन आहे. आज आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रातील भरारीचा भक्कम पाया भाऊसाहेबांच्या कृषी धोरण आणि विचारांमुळे घातला गेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शेती आणि कृषी क्षेत्राला नवा आकार देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. त्यातूनच राज्यातील एक अग्रगण्य समजल्या अमरावती येथील 'श्री. शिवाजी शिक्षण संस्थे'चा पाया भाऊ साहेबांनी घातला. 10 एप्रिल 1965 रोजी भाऊसाहेबांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुढे महाराष्ट्र सरकारने 20 ऑक्टोबर 1969 रोजी त्याच्या नावाने अकोला येथे 'डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना केलीय.
'भाऊसाहेबां'च्या आयुष्यातील महत्वाची वळणं आणि घटना :
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख)
मूळ आडनाव - कदम
1926 : 'मुष्टिफंड'या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
1927 : शेतकरी संघाची स्थापना.
1927 : शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
18 ऑगस्ट 1928 : अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
1930 : प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
1932 : श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
1933 : शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
1950 : लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.
1955 : भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
1956 : अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
लोकसभेवर 1952, 1957, 1962 तीन वेळा निवड.
1962 ते 1962 केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.
देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने 1932 मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
1960 : दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
1965 : 10 एप्रिल 1965 रोजी निधन
'पापळ' ते 'इंग्लंड' : शैक्षणिक परिक्रमेचा समृद्ध प्रवास
देशाच्या सध्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीत देशाचे प्रथम कृषिमंत्री 'भाऊसाहेब' डॉ. पंजाबराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा आणि मोलाचे स्थान आहेय. शेती आणि मातीशी असलेले घट्ट नाते आणि या क्षेत्राचा भाऊसाहेबांना सूक्ष्म अभ्यास होतं. हीच गोष्ट लक्षात घेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख यांची निवड केली होती. भाऊसाहेबांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील सध्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या पापळ या गावी झाला. डॉ. पंजाराव देशमुख यांचे वडील शामराव देशमुख हे हाडाचे शेतकरी. त्यामुळेच बालपणापासून पंजाबरावांना शेतीविषयी विशेष प्रेम. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर ते पुढे माध्यमिक शिक्षणसाठी कारंजा लाड आणि अमरावतीत येथे गेले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या 'फर्ग्युसन कॉलेज' येथून पूर्ण केलेयट. पुढे 1921 मध्ये इंग्लंडच्या जगप्रसिद्ध कैम्ब्रीज विद्यापीठातून 'बैरिस्टर पदवी' उत्तीर्ण केलीय. येथेच त्यांनी संस्कृतमध्ये एम.ए. आणि पी.एच.डी.ची पदवी घेतलीय. त्यांच्या पी.एच.डी. चा विषय होताय ' Origin And Development Of Religion In Vedic Literature'. वैदिक साहित्य: त्याची सुरुवात आणि उत्क्रांती त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आणि हा ग्रंथ लिहिला. गरीबांचे दुःख दूर करण्यासाठी ते डॉक्टर बनले आणि गरीब आणि पीडितांच्या हक्कांसाठी लढणारे बॅरिस्टर झाले. परंतू, शिक्षणासोबतच त्यांना देशातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा कळवळा होता. त्यातूनच त्यांनी आपले पुढचे जीवन देशातील जनतेला समर्पित केले.
उच्चशिक्षण घेऊन भारतमातेची 'सेवा'
इंग्लंडमधील शिक्षणानंतर त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. 1930 मध्ये ते प्रांतीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आलेत. ते यात शिक्षण मंत्री, कृषी व सहकार विभागाचे मंत्री बनले होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्य झालेत. 1952, 1957 आणि 1962 असे सलग तीन टर्म्स ते खासदार म्हणून निवडून आलेत. तसेच ते 1952 ते 1962 असे दहा वर्ष ते देशाचे कृषीमंत्री होते. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी 'श्रद्धानंद वसतिगृह' सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे 315 च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत अमरावतीत 'मंदिर प्रवेश' आंदोलन :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्य निवारण चळवळीत भाऊसाहेबांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. यातूनच अमरावतीच्या 'आंबा मंदिरा'त दलितांना प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. यासाठी 13 आणि 14 नोव्हेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आणि भाऊसाहेबांनी अमरावती येथे दलितांना अंबा मंदिर प्रवेशासाठी परिषद बोलावली. सत्याग्रहातून त्यांनी हे मंदिर दलितांसाठी खुले करून दिले. यावेळी त्यांना समाजातील प्रस्थापितांचा मोठा विरोध सहन करावा लागला. हा महाराष्ट्रातील पहिला मंदिरप्रवेश सत्याग्रह होता. पुढे डॉ.बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला.
स्वत: आंतरजातीय विवाहातून घातला समाजासमोर 'आदर्श'
डॉ. पंजाबराव देशमुखांनी आधीपासूनच जातीभेदाविरोधात लढा उभारला होता. यासोबतच त्यांनी स्त्री शिक्षण आणि अधिकार याविषयी समाजाला सदैव जागृत करण्याचे काम केले. हा आदर्शवाद त्यांनी फक्त समाजाला सांगितलाच नाही तर स्वत: अंगीकारलासुद्धा. यातूनच त्यांनी स्वत: आंतरजातीय विवाह करीत समाजासमोर स्वत: आदर्श घातला. पंजाबरावांनी 1927 मध्ये मुंबईच्या सोनार जातीतील विमलाबाई वैद्य ह्या मुलीशी विवाह केला. विमलाबाई लग्नानंतर बी. ए. एल. एल. बी. झाल्यात. त्यांचा अनेक स्त्रीसंघटनांशी निकटचा संबंध होता. पुढे त्या राज्यसभेवरही निवडून आल्यात. पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यांत त्या हिरिरीने भाग घेत असत.
भाऊसाहेबांच्या 'व्हिजन'मधून साकारलेल्या दिल्लीतील कृषी प्रदर्शनानं भारताची जगात चर्चा :
केंद्रीय कृषीमंत्री असताना डॉ. पंजाबरावांनी भव्य दिव्य अशा जागतिक कृषी प्रदर्शनाचे नवी दिल्ली येथे 11 डिसेंबर 1959 ते फेब्रुवारी 1960 या दरम्यान आयोजन केले होते. अंदाजे 100 एकर जागेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे कृषी प्रदर्शन भारताच्या कृषी क्रांतीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरले. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांचे लोढेंच्या लोंढे हे प्रदर्शन पाहण्यास व ज्ञान ग्रहण करण्यास उपस्थित राहू लागले. एक नवा क्रांतीचा विचार घेऊनच शेतकरी परतत होते. जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांनी ही कृषी ज्ञानगंगा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवली. सर्वसामान्यच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर, इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ, रशियाचे पंतप्रधान बुल्गानिन, कम्युनिष्ट पक्षाच्या सर्वेसर्वा निकिता कुश्चेव आदी देश-विदेशातील गणमान्य मंडळी व भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या ऐतिहासिक कृषी प्रदर्शनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कृषी-क्रांतीचा उषःकाल निश्चित होणार असा विश्वास त्यावेळी संपूर्ण शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाला. पंजाबपासून तर कन्याकुमारीपर्यंत शेतकऱ्यांचे जबरदस्त संघटन उभे झाले. पंजाबचे शेतकरी तर 'हमारा पंजाबराव पंजाबदा' असे संबोधू लागले. त्याचवेळेस खऱ्या अर्थाने कृषिक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. एकंदरीत डॉ. पंजाबरावांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्याला जागतिक दर्जा मिळवून दिला. जगात मानाचे स्थान प्राप्त करून दिले. या देशातील शेतकरी आणि शेतमजूर हा भारताचा राजा झाला पाहिजे हे भाऊसाहेबांचे स्वप्न होते.
'भारत कृषक समाजा'ची स्थापना :
शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी 'भारत कृषक समाज' या संस्थेची स्थापन केली. त्यांनी समाजाचा अधिवक्ता असण्याचं धोरण राबविण्यासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वृत्तपत्र सुरू केले. डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी 7 फेब्रुवारी 1955 रोजी भारत कृषक समाजाची स्थापना करून संपूर्ण शेतकरी समाजाला राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ निर्माण करून दिले. संघटनेच्या बळावर कामगारांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण फायदे पदरात पाडून घेतात. मात्र शेतकरी वर्ग असंघटित असल्यामुळे तो सर्वच बाबतीत लुबाडला जातो. संपूर्ण जगाला अन्नधान्याचे बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची प्रचंड ताकद या बळीराजात असताना स्वतः तो आणि त्याचे कुटुंब अर्धपोटी-अर्धनग्न असावे हे कटुसत्य डॉ. पंजाबरावांनी ओळखून भारतात एकूण लोकसंख्येच्या 75 टक्के शेती करणाऱ्या भारतीय किसानाकरिता भारत कृषक समाज या राष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना करून शेतकऱ्यांना एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून दिले. डॉ. पंजाबरावांनी भारत कृषक समाज ही संपूर्ण शेतकरी समाजाला उपलब्ध करून दिलेली फार मोठी देणगी आहे. भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
भाऊसाहेबांच्या नावाने अकोल्यात कृषी विद्यापीठ :
कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. कृषी विदयापिठ स्थापनेत वसंतराव नाईक यांची फार मोठी दूरदृष्टी होती. शेती आणि शेतकऱ्यांवरील त्यांच्या निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली. महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे 20 ऑक्टोबर 1969 ला कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापिठास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापिठ कायदा 1983 अन्तर्गत विदर्भातील 11 जिल्ह्यात कृषी शिक्षण, शोध आणि बिज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापिठावर सोपवण्यात आले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी याकरिता 1968 साली आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी 20 ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांच्या बलिदानानंतर विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे 20 ऑक्टोबर 1969 रोजी झाली. देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या पंजाबराव देशमुख यांची कर्मभूमी असलेल्या पश्चिम विदर्भातील अकोल्यात हे विद्यापीठ स्थापन झालं. अन भाऊसाहेबांच्या कार्याला सलाम करण्यासाठी या विद्यापीठाला 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ' हे नाव देण्यासाठीच्या जनरेट्याचा सरकारने सन्मान करीत भाऊसाहेबांचं नाव अकोला कृषी विद्यापीठाला दिलं.
विद्यापीठानं जपल्यात भाऊसाहेबांच्या आठवणींच्या 'पाऊलखुणा' :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'डॉ. पंजाबराव देशमुख' यांचा समग्र जीवनपट आणि कार्य उलगडून दाखविणारे स्मृतीकेंद्र विद्यापीठाने 10 मे 2003 मध्ये उभारले आहे. यामध्ये भाऊसाहेबांच्या वस्तू, त्यांचे कार्य, दुर्मिळ फोटोज आणि इतर महत्वाच्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्राची वैशिष्ट्ये :
1) एकूण चार मुख्य दालनांचा समावेश.
2) पहिले दालन पूर्णतः 'भाऊसाहेबांना' समर्पित, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांनी वापरलेल्या खाजगी वस्तू आणि इतर साहित्य या दालनामध्ये ठेवण्यात आले आहेय. यामध्ये त्यांचे कपडे, झोपण्याची खाट, त्यांच्या आयुष्यातील महत्वाची छायाचित्रे यांचा समावेश आहेय.
3) उर्वरित दोन दालनांमध्ये कायमस्वरूपी कृषी प्रदर्शनीचे आयोजन, यामध्ये विद्यापीठाचे संशोधन आणि विविध उपलब्धी याबाबत विस्तृत माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.
4) उरलेल्या एका दालनाचे सभागृहात रुपांतर करण्यात आले असून त्याची आसनक्षमता 100 एवढी आहे.
5) मान्यवर आणि अभ्यागतांच्या बैठकीसाठी एक स्वतंत्र्य कक्ष असून त्याची क्षमता 40 एवढी आहेय.
6) या स्मृती केंद्राची उभारणी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ऐच्छिक आणि उत्स्फूर्त सहभागातून अन देणगीतून करण्यात आलीये.
7) आतापर्यंत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी राज्यपाल के. संकरनारायण, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह राज्य आणि देशातील अनेक मोठ्या विद्यापीठांच्या कुलगुरुंसह परदेशी पाहुण्यांनी या स्मृती केंद्राला भेट दिली आहेय.
या महामानवाच्या कार्याच्या अनुषंगाने त्यांना योग्य सन्मान द्यायला आपला समाज आणि शासन कमी पडले, याची खंत त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि अभ्यासकांना वाटते. मात्र, आजही कृषीक्षेत्रातील समस्यांची उत्तरे 'डॉ. पंजाबराव देशमुख' यांच्या चिरतरुण विचारांमध्ये दडलेले आहे. 'भाऊसाहेबां'च्या कार्याला केंद्र सरकारने 'भारतरत्न' देवून गौरवावे अशी त्यांच्या चाहत्यांची मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना चालना देवून त्यांच्या समर्पणाचा यथोचित गौरव झाला तर त्यांच्या 'जयंती दिनी' त्यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. भाऊसाहेबांच्या आभाळभर कामास 'एबीपी माझा'चा सलाम....