BLOG | "आमार नाम, तोमार नाम, नंदीग्राम नंदीग्राम"
पश्चिम बंगालची संपूर्ण निवडणूक लक्षवेधी असली तरी तिथल्या "नंदीग्राम" मतदारसंघाची निवडणूक ही सर्वात जास्त लक्ष वेधणारी ठरली. 1 एप्रिलला तिथे मतदान पार पडले. सगळ्या राजकीय निरीक्षकांचं, पत्रकारांचं लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. कारण बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपला पारंपरिक "भवानीपूर" हा मतदारसंघ सोडून नंदीग्रामच्या संग्रामात उतरल्या आहेत आणि त्यांच्यासमोर आहेत तृणमूल सोडून भाजपवासी झालेले, एकेकाळचे त्यांचेच सहकारी, तिथले गतवेळचे विजेते सुवेंदू अधिकारी. एकेकाळी बंगालमध्ये गाजत असलेली "आमार नाम, तोमार नाम, नंदीग्राम नंदीग्राम" ही घोषणा सध्या तिथे कुणाच्या ओठावर नसली तरी नंदीग्राम ओठावर आहे हे नक्की. नंदीग्राम हा मतदारसंघ तसा तृणमूलचा गड. पण तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी या आपल्या गडाला, अधिकारी परिवाराच्या हवाली केल्याने तिथले गडपती झाले सुवेंदू अधिकारी. त्यामुळे हल्दिया, मेदीनीपूर, नंदीग्राम या सगळ्या भागात अधिकारी परिवाराचे वर्चस्व वाढले. हेच गडपती भाजपच्या तंबूत दाखल होऊन विरोधात उभे ठाकले आणि त्यांनी ममतांना आव्हान दिले. फायटर अशी इमेज असणाऱ्या ममतांनी आपला गड वाचवण्यासाठी हे आव्हान स्वीकारले आणि सुरू झाला नंदीग्रामचा संग्राम.
पश्चिम बंगालचे हे "नंदीग्राम" आंदोलनाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. ममता बॅनर्जींच्या राजकीय कारकिर्दीला इथून कलाटणी मिळाली. ममतांचा राजकीय उत्कर्ष खऱ्या अर्थाने इथूनच झाला आणि आज आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढण्यासाठीही त्यांना नंदीग्रामच्या भूमितच यावे लागले आहे. डाव्यांच्या सरकारविरोधात ममतांनी नंदीग्राममध्ये मोठे आंदोलन उभे केले. हे आंदोलन उभे करताना त्याची आखणी करताना त्यांचे महत्त्वाचे सहकारी सुवेंदू अधिकारी होते. त्यामुळे या भागावर सुवेंदूंची पकड असणे साहजिक आहे. ते मागील वेळेस मोठ्या मताधिक्क्याने इथून विजयी झालेत. शिवाय त्यांचे वडील आणि भाऊही खासदार होते. म्हणून सुवेंदू अधिकारींशी होणारा सामना सोपा नव्हता हे नक्की.
ममतांनी या सामन्यात उतरताना मोठे राजकीय नेते निवडतात तसा दुसरा पर्यायही निवडला नाही. म्हणजे ममता फक्त नंदीग्राम मधूनच उभ्या राहिल्या. ही संधी साधत भाजपने त्यांना नंदीग्राममध्ये घेरण्यासाठी जबरदस्त ताकद लावली होती. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे नंदीग्राममध्ये ठाण मांडून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली, अमित शाहांचा रोड शो झाला. अनेक केंद्रीय मंत्री तिथं येऊन गेले. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि एकमेव स्टार प्रचारक असलेल्या ममतांना तब्बल पाच दिवस नंदीग्राममध्ये अडकून राहावे लागले. या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे की आपल्या बळावर दोनशे पार जागा जिंकण्याची क्षमता असलेल्या ममतांना स्वतःच्या विजयासाठी संघर्ष करावा लागला आणि जिथे ममता बॅनर्जींसारखी फायरब्रांड नेता किती मताधिक्क्याने जिंकेल अशी चर्चा होणे अपेक्षित होते तिथे ममता स्वतः जिंकतील की हारतील अशी चर्चा होते आहे. यावरून नंदीग्रामच्या लढतीचा अंदाच लावता येऊ शकतो.
या नंदीग्राम मतदारसंघाचे गणित असे आहे की हा मतदारसंघ दोन भागात आहे. म्हणजे नंदीग्राम फेज 1 आणि नंदिग्राम फेज 2. यात नंदिग्राम फेज 1 मध्ये जवळपास 2 लाख 7 हजार मतदार आहेत तर फेज 2 मध्ये जवळपास 1 लाख 23 हजार मतदार आहेत. म्हणजे इथल्या एकूण मतदारांची संख्या 3 लाख 31 हजार आहे. ज्यात 51.4 टक्के पुरूष मतदार आणि 48.6 टक्के महिला मतदार आहेत. म्हणजे महिला मतदारांची संख्या निर्णायक आहे. आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे इथे असलेली मुस्लिम मतदारांची संख्या. ती आहे जवळपास 30 टक्के. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये तृणमूल काँग्रेसला 66.78 टक्के इतकी मतं मिळाली होती, डाव्या पक्षाला 26.49 टक्के मतं मिळाली होती तर भाजपला अवघी 5.33 टक्के मतं मिळाली होती. 2019 च्या लोकसभेतले इथले गणित बघितले तर तृणमुल काँग्रेसला इथून 66.24 टक्के मतं मिळाली होती, म्हणजे तृणमूलला विधानसभेत मिळालेल्या मतांमध्ये फार फरक झालेला दिसत नाही.
पण फरक पडलाय तो भाजपच्या मतात. लोकसभा निवडणुकीत भाजपला 27.10 टक्के मतं मिळाली आणि डाव्या पक्षाला अवघी 3.79 टक्के मतं मिळाली. म्हणजे 5.33 टक्के मतांवरून भाजप 27.10 टक्के मतांवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पोहोचली. शिवाय तृणमूलचे स्टँडींग आमदार सुवेंदूच यंदा भाजपचे उमेदवार होते. त्यामुळे नंदीग्राममध्ये भाजपची ताकद वाढली हे नक्की. पण मागच्या वेळेस सुवेंदूंना मिळालेल्या मतांमध्ये मुस्लिम मतांची संख्याही मोठी होती. ती यंदा नसेल त्यामुळेच भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी इथे ध्रुवीकरणाच्या राजकारणाला सुरूवात केली. 70-30 असा फॉर्मुलाच त्यांनी सांगितला. म्हणजेच 30 टक्क्यांपर्यंत असलेल्या मुस्लिम मतदारांची मते यावेळेस आपल्याला मिळणार नाहीत हे गृहित धरून त्यांनी हिंदू मतांचे ध्रुविकरण करण्यासाठी जोर लावला. त्याचा बऱ्यापैकी परिणाम ग्राउंडवर दिसून आला. नंदीग्राममध्ये तृणमूलच्या झेंड्यासोबत भाजपचे झेंडेही मोठ्या प्रमाणात फडकत होतेच. पण त्याबरोबरीने "ओम आणि जय श्री राम"असे लिहिलेले भगवे झेंडे गावागावात गल्लीगल्लीत फडकत होते हे विशेष. हे चित्र नंदीग्राम आणि एकूणच बंगालच्या राजकारणात नवीनच. "आमार नाम, तोमार नाम नंदीग्राम नंदीग्राम "म्हणणाऱ्या भूमीत "आमार नाम, तोमार नाम, जय श्रीराम, जय श्रीराम" या घोषणेनं जोर धरला.
या घोषणा प्रचार करणाऱ्या ममता बॅनर्जींच्या ताफ्यासमोर वारंवार म्हटल्या गेल्या. विशेष म्हणजे तृणमूलच्या तिकीटावर निवडून आलेल्या भाजपवासी सुवेंदूंनी यावेळी तृणमूल आले तर नंदीग्राम पाकिस्तान होईल असा जोरदार प्रचार केला. ममतांचा उल्लेख बेगम, खाला, असा करत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून ममतांनीही त्यांची रणनिती बदलली. मंदिरात जाण्याचा सपाटा लावत चंडीपाठ म्हणत म्हणत शेवटी आपले गोत्रही त्यांनी सांगून टाकले. शिवाय ममतांनी नंदीग्राममध्ये जे घर घेतते होते तेही हिंदूबहूल भागात आणि त्या शेवटी फिरल्याही जास्त हिंदूबहूल भागामध्येच. भाजपच्या राजकारणाला काउंटर करण्यासाठी गोत्र सांगण्यापर्यंत गेलेल्या ममतांना कितपत फायदा होतो हे निकालानंतरच कळेल. कारण ममतांची राजकारणाची ही दिशा बंगालला नवीन आहे. हिंदू मतांचा किती वोट शेअर ममता घेतात यावर त्यांचा विजय ठरणार आहे.
आतापर्यंतच्या निवडणुकांचा अभ्यास केल्यास ममतांसाठी महत्त्वाची भूमिका राहिलीये ती महिला मतदारांची. तब्बल 48.6 टक्के असलेल्या महिला मतदारांकडूनच ममतांना जास्त अपेक्षा आहे. कन्याश्री, रुपाश्री, खाद्यसाथी, सायकल वाटप या योजनांमुळे ममतांची महिलांमध्ये लोकप्रियता आहे ही त्यांची जमेची बाजू. मुस्लिम मतदार त्यांच्याबाजुने ठामपणे उभे आहेत. शिवाय नंदीग्राममध्ये तृणमूलचे केडर आहे, त्यांची काही पॉकेट्स आहेत. सुवेंदू अधिकारी पक्ष सोडून गेले तरीही ते शाबूत आहे. त्यामुळे काही अंशी ममतांचे पारडे थोडे जड दिसत असले तरी अंफान वादळात नुकसान झालेल्या तिथल्या अनेक लोकांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने ममतांविरूद्ध नाराजी आहे. याचा त्यांना फटका बसू शकतो आणि जर हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुविकरण झाले तर मात्र त्यांचा विजय होणे अवघड आहे.
2016 च्या विधानसभा निवडणूकीत नंदीग्राममध्ये 86.93 टक्के मतदान झाले होते. यंदा 80.79 टक्के मतदान झालेय. हे काहीअंशी कमी झालेले मतदान कुणाच्या पथ्थ्यावर पडणार हे सध्या अस्पष्ट आहे. कारण भाजपच्या पॉकेट्समधून मतदान कमी झालेय की तृणमुलच्या पॉकेट्समधून कमी झालेय यावर गणित अवलंबून असेल.
महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या दिवशी मुख्यमंत्री एका बुथवर दोन तास ठाण मांडून बसल्याची घटना आतापर्यंत कधीच घडली नाही, ती घडली नंदीग्राममध्ये. आपल्या मतदारांना मतदान करू दिले जात नाही असा ममतांनी आरोप केला. त्याचवेळी नंदीग्राममध्ये दोन गटात जबरदस्त राडा पाहायला मिळाला. खरंतर बंगालच्या राजकारणात हिंसा ही नवी गोष्ट नाही. तिथे प्रत्येक निवडणुकीत हिंसेचे गालबोट लागतेच. तिथली भूमी आक्रमकतेला प्रतिसाद देणारी असल्याने भाजपाने तिथे यंदा मोठी आक्रमकता दाखवली आहे. जी नंदीग्राममध्येही दिसली. तृणमूलच्या आक्रमकतेला जशास तसे आक्रमकतेने उत्तर भाजप देते आहे. सोबत भाजपची मोठी यंत्रणा आहे. त्यामुळे तृणमूलच्या विरोधात असणारे तिथले डाव्या पक्षांचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपचा झेंडा धरलेले पाहायला मिळतात. हेही भाजपच्या तिथे वाढलेल्या शक्तीचे कारण आहे. नंदीग्राममध्ये डाव्या पक्षाचे काहीजण असेही दिसतात की तृणमूलच्या स्थानिक कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही भाजपचा झेंडा धरला आहे असे ते म्हणतात. त्यामुळेच व्हिलचेअरवर बसून फुटबॉल हातात घेत "खेला होबे" (खेळ होईल) म्हणणाऱ्या फायटर ममता आपल्या जुन्या सहकाऱ्याविरूद्ध खेळ करून सामना जिंकतात की, "परिवर्तन होबे" (परिवर्तन होईल) म्हणत जय श्रीरामचा नारा देणारे, त्यांच्या तालमीत तयार झालेले सुवेंदू अधिकारी बाजी मारतात हे पाहावे लागेल. 13 वर्षांनंतर आपल्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी नंदीग्रामच्या भूमीत उतरलेल्या ममता बॅनर्जी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी लढाई लढताय. त्याच्यातील महत्त्वपूर्ण डाव 1 एप्रिलला खेळला गेलाय. 1 एप्रिलला फूल म्हणण्याची पद्धत आहे. नंदीग्राममध्ये 1 एप्रिलला बंदीस्त झालेल्या इव्हिएममधून 2 मे ला जोडा फूल (फुलपत्ती -तृणमुल निशाणी) उगवते की बद्धो फूल (कमळ) उगवते यावर ममतांच्या कारकिर्दीची दिशा ठरणार आहे हे नक्की. "आमार नाम, तोमार नाम नंदीग्राम नंदीग्राम "असे म्हणत राजकीय पटलावर उदयाला आलेल्या ममतांना हे पुन्हा म्हणण्याची संधी नंदीग्राम देईल का? या उत्तरासाठी 2 मे ची वाट पाहावी लागेल.