एक्स्प्लोर
प्रिय कविता महाजन...
"मला 'ब्र' उच्चारायला लावणाऱ्यांच्या यादीत तुझा नंबर फार वरचा आहे. तुझ्या कवितांनी जितकं घायाळ केलं तितकंच कणखर आणि बंडखोर बनवलं तुझ्या कादंबरीतील नायिकांनी."

प्रिय कविता,
तू निघून गेलियेस विरक्तीची शुभ्र वस्रं नेसून. चार ओळींची श्रद्धांजली वाहण्याचा सोपस्कार पाळून आम्ही सगळेच आमच्या रोजमर्रा जिंदगीशी पुन्हा बांधले गेलो असलो तरी दुसऱ्या कुणाच्याही मरणाला विसरण्याइतकं सहजसोपं नाही तुझं नाव, तुझे शब्द, तुझ्या कविता, तुझी पुस्तकं यांपासून फारकत घेणं, त्यांना काळाच्या पोतडीत भिरकावून देणं. तुझ्या अचानक जाण्यानं माझ्या शब्दांना आलेलं सुन्नत्व ,शरीरमनाला आलेलं बधिरत्व अजूनही फारसं कमी झालेलं नाहीय. तुझं भौतिक अस्तित्व असणार नाही यानंतर कुठेच हे मनावर दगड ठेवून पचविण्याचा प्रयत्न चालूय. तरीही खुळ्यासारखी तुझ्या कवितेच्या पुस्तकांत तोंड खुपसून बसलेय मी. तुझे शब्द , तुझ्या कविता भिनत जातायत माझ्या आतआत खोलवर. आणि मी लिहायला घेतलय तुला पहिलं वहिलं पत्र जे तुझ्यापर्यंत पोहोचायची कुठलीच शक्यता अस्तित्वात नाही.
मी वाचलं तुझं नाव पहिल्यांदा तुझ्याच एका कवितेच्या खाली आणि मिळवून वाचत गेले तुझ्या बोटातून ठिबकलेला प्रत्येक अनमोल शब्द. पारायणं केली तुझ्या कवितांची. छातीशी कवटाळून घेतल्या तुझ्या सगळ्या कविता. पुस्तकाच्या पानावरचा पत्ता घेऊन मी तुला लिहू शकले असते एखादं चार ओळींचं पत्रं. फोन नंबर मिळवून बोलू शकले असते चार शब्द. पण तुझ्या कवितांविषयी आणि त्यांनी छळलेल्या दिवसरात्रींविषयी मला लिहिताच येणार नव्हतं चार ओळीत कधीच. बोलताही येणार नव्हतं चार शब्दात. त्यामुळे मला प्रत्यक्षातच भेटायचं होतं तुला. नुसत्या स्पर्शाने कळू द्यायचं होतं तुझ्या शब्दांवर माझा किती जीव आहे ते.
मी वाचत होते तुला पुस्तकात, वर्तमानपत्रात, मासिकात. ऐकत-बघत होते टीव्हीवरच्या मुलाखतींमध्ये. तसतशी मी अजून अजून एकरूप होत होते तुझ्याशी. जणू ही कविता त्या कविताशी तादात्म्य पावत होती. २०१३ ला मी फेसबुकवर आले, जराशी रूळले. लहाण मुलाला ध्यानीमनी नसताना आवडीचा खाऊ मिळावा तसंच झालं एके दिवशी डोळ्यात 'ब्र' उच्चारण्याची धमक असलेला करारी नजरेतला तुझा फोटो फेसबुकवर दिसला. तुला रिक्वेस्ट पाठवणं ओघानं आलंच. आणि मग तासातासाने मी नोटीफीकेशन तपासू लागले. पण तुला येणाऱ्या शेकडो रिक्वेस्टींमध्ये माझ्या एका रिक्वेस्टची भर तेवढी पडली होती. मी हिरमुसलेच जवळजवळ. तरीही तुला फॉलो करून तुझं लिहिणं वाचत राहिले पुढचे काही महिने आणि सूर्य पश्चिमेस उगवावा तसंच झालं भल्या सकाळी नोटीफिकेशन दिसलं ' Kavita Mahajan accepted your friend request.' आणि दुसऱ्या सेकंदाला मी जागीच एक गिरकी घेतली. मी इनबाॉक्समध्ये तुला 'Thank U' म्हटलं आणि तुझ्यासाठी एक बदाम ठेऊन दिला.
तुझ्या भिंतीवर मला रोज नवं नवं लेखन वाचायला मिळू लागलं. त्या काळात मी लाईक केलं नाही अशी एकही पोस्ट नसेल तुझी. मी ही लिहायचे काही बाही. मी लिहिलेल्या एखाद्या ओळीला, कवितेला तुझं लाईक शोधत बसायचे. पण ' हाय रे मेरी किस्मत' माझ्या कुठल्याच पोस्टला तुझं लाईक मिळालं नाही. तू एवढी मोठी प्रसिद्ध लेखिका आणि मी चार ओळी खरडणारी एक पोरगी. तू लिहिलेलं वाचायला मिळत होतं हीच भाग्याची गोष्ट म्हणून मी ' खपा हुऐ दिल को समझाती रही।'. एक दिवशी धाडस करून तुझ्या एका कवितेवर कमेंट केली. त्यात तुझ्या कवितेच्या आशयाच्या अनुषंगानं दोन ओळींचा मजकूर होता. कविता आवडल्याचीच ती पोहोच होती. तुझ्या भिंतीवर माझ्या अकाऊंटवरून मला वाचायला मिळालेली ती तुझी शेवटची पोस्ट. पुढे कित्येक दिवस तू मला कुठेच दिसली नाहीस. ब-याच शहानिशेनंतर शोध लागला की तू मला ब्लाॕक केलयस. का? कशासाठी? हे माझे प्रश्न आजही निरूत्तरच आहेत. ना कुठला वाद ना कुठले मतभेद. तुझी चाहतीच होते मी. तुझ्या ब्लाॉकने ' तू तुझा एक डायहार्ट फॅन गमावला ' असच क्षणभर वाटलं. पण नाराज होऊन तू लिहिलेलं वाचणं सोडून देईन ती मी कसली. तू हाडाची लेखिका तर मी तुझी हाडाची वाचक. केवळ तू लिहिलेलं वाचण्यासाठी म्हणून मी एक नवं अकाऊंट उघडलं. तिथून तुला फॉलो करत राहिले. मी न वाचलेली तुझी अजून काही पुस्तकंही मिळवली. ब्र, भिन्न, मर्यादित पुरूषोत्तम या कादंबऱ्या एकसलग वाचल्या आणि तू अजूनच आवडती लेखिका बनलीस माझी. तुला भेटायचं पक्कं होत गेलं.
हळूहळू आपल्या बाबतीत योगायोगाची साखळी तयार होऊ लागली.तू एबीपी माझा च्या वेबसाईटसाठी ब्लॉग,लिहायचीस आणि योगायोग तो काय तुझ्या ब्लॉगखाली माझा ब्लॉग पब्लिश होऊ लागला. एका नियतकालिकात तुझ्या कवितेशेजारी माझीही कविता छापून आली होती. तो अंक हातात पडल्यावर अवर्णनिय आनंदाची धनी झाले होते मी. हे सगळे क्षण एकटीच सेलिब्रेट करत होते मी. मला अजून अजून जवळ यायचं होतं तुझ्या.
नुकतीच मी मुंबईत आले. पुढच्या काही दिवसांत तुझा पत्ता शोधत तुला भेटायचं हे मनाशी ठरवलं. मुंबईत जराशी स्थिरस्थावर होतेय तोवर कुठूनतरी कळलं तू तुझा वसईतील लेखन प्रपंच आवरून पुण्यात वास्तव्यास गेलीयस ते. अवखळ मुलीसारखी मी पुन्हा हिरमुसले.पण काही क्षण. कधीतरी पुण्यात तुझा माग काढत यायचच अशी खूनगाठ मनाशी बांधली कारण नामसाम्यामुळेच का काय मी ही तुझ्याइतकीच हट्टी आहे. पुढच्या काही दिवसांत धुळीचा आवाज पुन्हा वाचायला घेतलं. रोज दोन-तीन अशा पुरवून पुरवून कविता वाचू लागले. अर्धा संग्रह वाचून झाला आणि त्सुनामी यावी तशी बातमी आली 'प्रसिद्ध कवयित्री, लेखिका कविता महाजन यांचे निधन' आपण काहीतरी चुकीचे किंवा असंबद्ध वाचतोय असं समजून मी ही बातमी फेक असल्याचं मनाला समजावलं आणि फेसबुक स्क्रोल करू लागले. स्क्रीनवर दिणारी प्रत्येक पोस्ट ही तुझ्या जाण्याला दुजोरा देणारी होती. अवसान गळल्यासारखी मी काही क्षण होत्या त्या जागी स्थिर बसून राहिले. रात्रीचे किती वाजले होते माहीत नाही खोलीतली लाईट बंद करून कितीतरी वेळ रडत राहिले रक्ताचंच कुणी माणूस गेल्यासारखं.
माझ्या कवितांशपथ सांगते माझा तुझ्या कवितांवर अफाट जीव आहे. मला तुला भेटायचं होतं. भेटून तुला मिठी वगैरे मारण्याचा वेडेपणा नक्कीच करणार नव्हते मी. कारण आपल्यातलं अंतर मला कधीच तुझ्या कुशीत शिरण्याची मुभा देणार नव्हतं. तू जेष्ठ म्हणून तुझ्या पायावर नतमस्तक होण्याचा सनातन बावळटपणाही करायचा नव्हता मला तर तुझा फक्त हातात हात घ्यायचा होता. तुझ्या लिहित्या हातांचा स्निग्ध स्पर्श अनुभवायचा होता. तुझ्या तळपत्या बोटांला स्पर्श करून माझी बोटं मला अधिक धारदार करायची होती. तुझ्या करारी नजरेला नजर द्यायची होती. तुझ्या नजरेतली वीज ट्रान्सफर करून घ्यायची होती. तुझ्यातल्या अक्षय उर्जेचं गुपीत सापडलं असतं मला तुझ्या क्षणभराच्या सहवासात. मला फार काही नको होतं गं, हवी होती तुझी एक निःशब्द भेट.
मला 'ब्र' उच्चारायला लावणाऱ्यांच्या यादीत तुझा नंबर फार वरचा आहे. तुझ्या कवितांनी जितकं घायाळ केलं तितकंच कणखर आणि बंडखोर बनवलं तुझ्या कादंबरीतील नायिकांनी. माझ्या प्रत्येक निर्भिड कृतीमागे माझ्या नेणिवेत दडलेल्या तुझ्या नायिकांचा हात आहे हे सांगताना अभिमानच वाटतोय मला. माझ्यावरचे हे तुझे ऋण कधीच विसरता येणार नाहीत मला. तुझ्याकडून मी वसा घेतलाय, 'निर्भिडपणे लिहिण्याचा,बोलण्याचा, समाजाचं देणं आपापल्या परिनं फेडण्याचा. आज तुला वचन देते, 'उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तुझा वारसा पुढे चालवत राहिण.'
तू म्हणायचीस 'बाईचे पाय भूतासारखे उलटे असतात. ती शरीराने घरातून बाहेर पडली तरी तिचं मन घरातच असतं सतत.' तुझे आहेत काय पाय तसे उलटे? तुझं मन फिरतंय का गं इथे कुठे? तुला कळतीय का तुला भेटता न आल्यानं होत असलेली माझी तडफड?
I really missed u Dear.
View More

























