Khajuraho Film Festival: खजुराहो फिल्म फेस्टिव्हल : एक सांस्कृतिक चळवळ

Khajuraho Film Festival: मध्यप्रदेशातलं खजुराहो हे शहर आपल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. चंदोल वंशांच्या राजांनी या मंदिरांची निर्मिती केली. इथली इरॉटिक शिल्प पाहण्यासाठी देश विदेशातले पर्यंटक येत असतात. या शिल्प मंदिरांसाठी प्रसिध्द असलेल्या या शहराची आता एक नवीन ओळख तयार होत आहे. उत्तर भारतात सिनेमा संस्कृती तयार करण्याची आणि स्थानिक सिनेमाला जागतिक दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी इथं खजुराहो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा या फिल्म फेस्टिव्हलचं 11 वर्ष आहे.

प्रसिध्द अभिनेते आणि वेगळ्या बुंदेलखंडाची मागणी लावून धरणारे राजा बुंदेला यांच्या संकल्पनेतून हा फिल्म फेस्टिव्हल आकाराला आला आहे. या फिल्म फेस्टिव्हलची खासियत म्हणजे इथले टपरा टॉकीज. टपरा टॉकीज म्हणजे तंबुतला सिनेमा. खजुराहो शिल्पग्राम इथं तीन मोठ मोठे तंबू ठोकून तिथं 13 देशांमधले सिनेमे दाखवण्यात येतात. फ्रान्स, इटली या युरोपातल्या देशासहित अफ्रिका आणि इराण, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधले दाखवले जात आहेत. शहरात अन्य ठिकाणी ही असे तंबू ठोकून सिनेमे दाखवण्यात आले.

यंदाचा खजुराहो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल दिवंगत अभिनेता धर्मेंद्र, असरानी आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांना समर्पित करण्यात आला होता. इथं धर्मेंद्र आणि असरानी यांच्या नावाने टपरा टॉकीज उभारण्यात आले आहे. तिथं या दोन्ही अभिनेत्यांचे महत्त्वाचे सिनेमे दाखवण्यात आले. राजा बुंदेला यांनी सांगितलं की धर्मेंद्र आणि असरानी यांचं नुकतंच निधन झालं. काही वर्षांपूर्वी असरानी खजुराहो फिल्म फेस्टिव्हलला येऊन गेले होते. धर्मेंद्र यांनी या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली नसली तरी फिल्म फेस्टिव्हल सुरु करण्यात त्यांचा मोठा होता. म्हणूनच यंदाचा फिल्म फेस्टिव्हल त्यांना समर्पित करण्यात आला.

यंदा फिल्म फेस्टिव्हलचं उद्घाटन प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते झालं तर समारोप अभिनेता सौरभ शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आला. सात दिवसांमध्ये दिग्दर्शक एन चंद्रा, अभिनेते चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री पुनम ढिल्लो, दिपशिखा, इंदिरा तिवारी सहित अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. उत्तर प्रदेशातल्या खजुराहो सारख्या छोट्या शहरात हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले महत्त्वाचे लोक एकत्र आले होते. त्यांना पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय 13 देशांचे राजदूत या ठिकाणी आले. कुठल्याही फिल्म फेस्टिव्हलसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे.

खजुराहो फिल्म फेस्टिव्हलला राजाश्रय आहे. मध्यप्रदेश सरकारचे वेगवेगळे विभाग आयोजनात योगदान देतात. सिनेमाला समाजाशी जोडण्याचा काम इथं करण्यात येत आहे. बुंदेलखंड हा दुष्काळग्रस्त भाग आहे. प्रचंड उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना दूरवर जावं लागतं. खजुराहो शहरात तलाव आहेत. पण गावाकडे महिलांना पाण्यासाठी भटकावं लागतं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इथं नारी शक्ती टपरा उभारण्यात आला. गावाकडून आलेल्या महिलांनी इथं आपल्या समस्या सांगितल्या. त्या सोडवण्यासाठी आणि त्या संदर्भातली जागृती तयार करण्यासाठी याबाबतच्या डॉक्युमेंन्ट्री तयार करण्याचं आवाहन करण्यात आलं. प्रसिद्ध डॉक्युमेंन्ट्री मेकर ब्रनाली राय यांनी लवकरच इथल्या महिलांवर डॉक्युमेंन्ट्री करण्याचं घोषित केलंय.
खजुराहो फिल्म फेस्टिव्हल आता सामाजिक चळवळीचं रुप घेत आहे. आसपासच्या स्थानिक फिल्ममेकर्सनी इथल्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या शॉर्टफिल्म तयार केल्यात. या शॉर्टफिल्म्स मार्फत इथं येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर आपली समस्या मांडण्याची संधी या निमित्ताने त्यांना मिळाली आहे.
इथं येणाऱ्या प्रत्येक कलाकाराकडून मास्टरक्लास घेण्यात येतो. भोपाळ, इंदौर, जबलपूर, झासी आदी शहरांमधील विद्यार्थ्यांना या मोठ्या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होते. यामुळं हा फिल्म फेस्टिव्हल इतरांपेक्षा वेगळा ठरतोय.

























