एक्स्प्लोर
Advertisement
घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर...
सप्टेंबर हा रानफुलांचा महिना. कास पठाराचा गाजावाजा होऊन तिथं पर्यटनावर निर्बंध घालण्याआधीच एकदा तिथं सुखाने फिरून आले होते. तरी तळ्याजवळ जाऊनही पाण्याला हातापायांचा स्पर्श करता आलेलाच नव्हता. काठावर बिअरच्या बाटल्यांच्या काचांचा खच होता आणि दगडांवर उगाचच रिकाम्या बाटल्या फोडून लोक पाण्यात फेकतात. त्यामुळे पायातले बूट काढून अनवाणी फिरण्याची सोयही राहिलेली नाही. विस्तीर्ण माळरानावर जांभळ्या टोपल्या बघत मनसोक्त फिरून झालं. शुभ्र ओल्या कागदावर निळी शाई शिंपडून फुलं उमलवावीत तशी टिकलीएवढी निळी अन् पांढरी फुलं एकेजागी होती. त्यांचं नंतर मी एक चित्रही काढलं.
वेगवेगळ्या जागा वेगवेगळी दृष्टी देतात. पहाड - पर्वत उंची आणि खोली या शब्दांचा अर्थ समजावून सांगतात. समुद्र आणि आकाश विस्तीर्णतेची आणि अज्ञाताची आठवण करून देतात. झऱ्यांनी खेळकरपणा कळतो, कधी नाचरेपणा देखील! धबधबे कोसळण्याची महती सांगतात, नद्या वाहत - चालत राहण्याची. जंगल, गुहा गूढ गोष्टी समजावतात. तसं पठार आपला मर्यादित ठहराव सांगतं. जास्त उंच जाण्याची दरवेळी गरज नसते, आपल्या कुवतीइतकं वाढावं आणि विस्तारावं, अशी ती मध्यमवर्गीय वृत्ती. इथं कोसळण्याची भीती नसते, ऑक्सिजन कमी पडून श्वास घेण्यास त्रास होणार नसतो, वादळ नसतं, बुडणं - वाहून जाणं नसतं... सपाट माळरानावर पायवाटांनी चालत राहायचं फक्त...! पण म्हणून त्याला कमी लेखण्याचं कारणच नाही. लाख फुलांनी माखल्यावर तर पठाराला कुणी नावं ठेवूच शकत नाही. इथं शेकडो भुंगे, मधमाशा, फुलपाखरं, असंख्य अनोळखी किडे गुणगुणत नाचत, उडत असतात. आपले पाय आपोआप नाचरे होतात. पावलं सरळ पडत नाहीत, ती आतल्या आत नाचू लागलेली असतात. फुलांचा, झुडुपांचा, गवताचा वास श्वासांत भरतो; त्याने एक गोडूस मळभ मनावर पसरतं. अजून उन्हं यायची असतात. ती येऊ लागली की रक्तात उसळी निर्माण होते... फक्त आणि फक्त नाचावं आणि नाचतच राहावं अथक असं वाटू लागतं.
वाटतं नृत्याचा उगम अशाच एखाद्या भारलेल्या – भारणाऱ्या जागी झाला असावा!
विश्वउत्पत्तीच्या अनेक कथा जगभर विविध जातीजमातींच्या मौखिक साहित्यात विखुरलेल्या आहेत. त्यांचा शोध घेत, वाचत, समजून घेत, अभ्यास करत असताना आकस्मिक काहीतरी लावण्यमय दिसावं तशी मणिपूरमधली एक विश्वउत्पत्तीची कथा मला मिळाली.
कथा अशी होती -
तेव्हा सगळीकडे केवळ पाणीच पाणी होतं. दूरदूरवर पाण्याशिवाय दुसरं काही नजरेला पडत नसे. त्या पाण्यात लाइनुरा या सात देवता पाण्यावर नर्तन करीत होत्या.
लाई पून्गथौ या नऊ देवांच्या गणाने स्वर्गातून त्यांना खेळायला थोडीशी माती दिली. ती पाण्यात भिजवून त्यातून त्यांनी आठ खंड पृथ्वी निर्माण केली. लयदार नृत्य करत -करतच त्यांनी पृथ्वीचं निर्माण आणि स्थापना केली.
पृथ्वी खूपच ओबडधोबड होती. तिला राहण्यायोग्य बनवण्यासाठी निदान काही जागा तरी समतल बनवायला हव्या होत्या. मग ते काम लाइनुरांनी माईबिये या पुजारणींकडे सोपवलं. त्यांनी नृत्याचे विविध प्रकार करत पृथ्वीवर पायांनी समतल जागा निर्माण केल्या.
अशा प्रकारे पृथ्वीची निर्मिती झाल्यावर अतिया गुरु शिदबा आणि लैमारेन यांनी एखाद्या सुंदर खोऱ्यात नृत्य करायचं ठरवलं. उंच देखण्या पर्वतमालांमध्ये त्यांना अशी एक जागा सापडली. पण ती पूर्णत: पाण्याने भरलेली होती. मग अतिया गुरु शिदबा यांनी त्या भिंतीसारख्या पर्वतमालेत त्रिशुलाने तीन मोठे छेद केले. त्यातून पृथ्वीवरचं अधिकचं पाणी वाहून गेलं आणि पृथ्वी मोकळी झाली.
मग रंगीत, सुगंधी फुलांनी माखलेल्या खोऱ्यात अतिया गुरु शिदबा, लैमारेन आणि साती लाइनुरा यांनी प्रसन्न नृत्य केलं.
पृथ्वीवरचं हे पहिलं नृत्य होतं.
अतिया गुरु शिदबा आणि लैमारेन यांना सापडलेली ती जागा म्हणजे मणिपूर. त्यांनी केलेलं नृत्य हा जगप्रसिद्ध मणिपुरी नृत्याचा उगम. लाय हरोबा म्हणजे देवांना प्रसन्न करण्यासाठी केलेलं नृत्य! मृदंगाची थाप पडली की मेघगर्जनेचा, विजांच्या कडकडाटाचा, वादळाच्या घोंघावण्याचा भास होऊ लागतो आणि झाडांच्या पानापानांत वारे फिरू लागले झाडं नृत्यमग्न दिसतात तसे हे नर्तक दिसू लागतात.
लाय हरोबाचे सहा प्रकार आहेत. तीन तांडवशैलीतले आणि तीन लास्यशैलीतले. त्यातही पुन्हा उपप्रकार आहेतच. त्यातलं मानवाच्या निर्मितीचं व स्थितीचं नृत्य म्हणजे लाय्बो जगोई. या सर्व नृत्यांमधली एक चांगली गोष्ट म्हणजे त्यात टोकाची कर्मठ वृत्ती बाळगली जात नाही. विशुद्ध रूप टिकवून, नवे ताल आणि त्यानुसार नव्या हालचाली कुणी शोधल्या तर त्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे कला साचून, तुंबून राहत नाही तर ती नदीसारखी वाहती राहते. सर्जनशीलतेचं हे स्वागत पारंपरिक कलाप्रकारांमध्ये दुर्मीळच.
( लैमा जोगोई सादर करताना मेईतेई चानू )
‘विविधतेने समृद्ध असलेला आपला देश’ हे कदाचित घिसेपिटे वाटतील देखील; पण एकेक जागा पाहू लागलोत की त्यातली सत्यता जाणवते.
त्या देवतांच्या हाती माती आली, त्यातून त्यांनी पृथ्वी घडवली. पृथ्वीवर देवांनीही नृत्य करावं सुंदर जागा निर्माण केल्या. नृत्य निर्माण केलं. इवल्या किड्यापासून ते माणसापर्यंत हजारो प्रकारचे जीव निर्माण केले.
काही घडवणं, निर्माण करणं सगळ्यांना शक्य होत नाही; पण आहे ते राखता तरी येऊ शकतं ना?
काही प्रश्न विचारून पाहू...
तुमच्या हातात एक फूल दिलं, तर त्याचं तुम्ही काय कराल?
खाल? केसांत माळाल? कोटावर लावाल? देवाला वाहाल? फुलदाणीत ठेवाल? अजून कुणाला द्याल? फेकून द्याल? पायांखाली चुरडाल? पाण्यात सोडाल? कबरीवर वाहाल? डायरी वा पुस्तकात सुकवत ठेवाल?
तुमच्या हातात एक दगड दिला, तर त्याचं तुम्ही काय कराल? शेंदूर फासून पूजा कराल? त्याच्या पाया पडाल? अन्यायापायी आलेला संताप व्यक्त करण्यासाठी फेकून माराल? शिल्प घडवाल?
पावसाचं तुम्ही काय करता? नद्यांचं तुम्ही काय केलंय? झाडांचं, पहाडांचं तुम्ही काय केलंय?
तुमच्या हातात पृथ्वी दिली, तर तिचं तुम्ही काय कराल?
‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :
घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी
घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये
घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण
घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना
घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!
घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी
घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना
घुमक्कडी : (2) सीतेची तहान
घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement