एक्स्प्लोर
Advertisement
फूडफिरस्ता : पुण्यातील अमृततुल्य चहा
चहाला ‘अमृतासमान’ करण्याची आयडीया जर गोऱ्या साहेबाला आधीच सुचली असती, तर भारतीय लोकांना चहाचा परिचय करून द्यायला त्यांना सुरुवातीला तो फुकट खचितच वाटायला लागला नसता. त्यांच्या फायद्यामधलं नुकसान तरी जरा कमी झालं असतं.
पुण्यात चहा विकणारांची परंपरा मोठी आणि अर्थातच पुण्याच्या भल्याबुऱ्या ख्यातीला साजेशी आहे. इतर गावात विकला जाणारा कपभर चहा, पुण्यात विकला जाताना मात्र अमृततुल्य बनून समोर येतो. त्यात इतरांना असेल तरी निदान पुणेकरांना आश्चर्य वाटावं असं काहीच नाही.
कारण, जसे गणपतीच्या मूर्त्यांची घाऊक प्रमाणात सुरुवात करणाऱ्या आमच्या पेणमध्ये गणपतीच्या मूर्त्यांचे फक्त ‘कारखाने’ असतात्त; पण तिथल्याच मूर्ती पुण्यात मात्र “पेणच्या सर्वांगसुंदर, शाडूच्या,”म्हणून विकल्या जातात. आपल्या पुलंचा ‘परोपकारी गंपू’ ह्याच शहरात (पुणेकरी भाषेत ‘गावात’) जन्मला आणि जिथे ‘शेवटच्या प्रसंगी’ जिथे तो मातीच्या मडक्यावर, “नेहमीच्या गिर्हाईकाला बनवू नका मिष्टर”,म्हणत असे; त्याच पुण्यात अंत्यविधीचे साहित्य ‘वैकुंठालंकार’ म्हणून विकायची ‘अशक्य’ (अजून एक पुणेरी शब्द) कल्पनाशक्ती केवळ अस्सल पुणेकरी दुकानदाराची असली तर त्यात आम्हाला नवल वाटावे असे काहीच नाही. अगदी तस्साच ब्रिटिशांनी भारतात सादर केलेला चहा, ’अमृततुल्य’ म्हणून विकायचा कल्पनाविलास केवळ पुणेकर ‘हाटेल’वाल्याचाच.
चहाला ‘अमृतासमान’ करण्याची आयडीया जर गोऱ्या साहेबाला आधीच सुचली असती, तर भारतीय लोकांना चहाचा परिचय करून द्यायला त्यांना सुरुवातीला तो फुकट खचितच वाटायला लागला नसता. त्यांच्या फायद्यामधलं नुकसान तरी जरा कमी झालं असतं.
पुण्यात माझ्या पिढीच्या ‘पोरांनी’ ह्या अमृततुल्य हॉटेलांच्या सुवर्णकाळ पाहिलाय. माणकेश्वर, ओम नर्मदेश्वर, प्रभात टी, शनिपाराजवळचे आणि टिळक रस्त्यावरचे अंबिका किंवा नंतर सुरु झालेले ओझा परिवाराचे तिलक, ह्यासारख्या अमृततुल्यच्या बाहेर घेतलेल्या ‘कटिंग’वर माझ्या आणि आधीच्या 2-3 पिढ्यांमधल्या हजारो मित्रांच्या आपापसातल्या ‘मैत्र्या’ आयुष्यभर वृद्धिंगत होत राहिल्यात.
हल्ली संख्येने कमी झाले असले तरी अस्सल ‘अमृततुल्य’चा नजारा बघण्यासारखाच असायचा. दुकान जेमतेम शेदोनशे स्क्वेअर फुटाचेच,पण कोकणातल्या छोट्याश्या घरासारखे एकदम लख्ख ! आत गेल्यागेल्या फूटभर उंचीच्या स्टीलच्या प्लॅटफॉर्मच्या एका कडेला चहाची शेगडी, मध्ये बसायला छोटीशी लाकडी बैठक. त्यावर चहा बनवणारे दस्तूरखुद्द मालक अथवा ‘महाराज’ स्थानापन्न असायचे. अंगात धवल रंगाचा सैल सदरा, गळ्यात रुद्राक्षाच्या एकदोन माळा, तोंडात किमाम मिश्रीत फुलचंद पानाचा तोबरा आणि डोळ्यात समोरच्याला न्याहाळत राहणारे किंचित बेरकी भाव आणि कामाशी संपूर्णपणे तादात्म्य पावलेला चेहरा.
बाहेरच्या पावसाचा संबंध, रोमँटीसिझम वगैरेशी नसून फक्त चहाचं आधण अजून वाढवायचं की नाही? येवढ्याच व्यावहार्य गोष्टीशी. समोर ग्राहक म्हणून आलेला एखादा नवकवी जर बाहेर कोसळणाऱ्या पावसावर कविता करायला लागलाच तर, “चहा लगेच भरु का कविता संपल्यावर?” येवढाच किमान शब्दात कमाल अपमान करणारा पुणेरी प्रश्न. विषय कट !
एकीकडे किटलीतून चहा वाटपाचे काम सुरु असताना, पाणी भरणाऱ्या आणि चहा देणाऱ्या पोऱ्यांकडे लक्ष. दुसरीकडे दिलेल्या चहाच्या पैशांचा (आठवणीतल्या तोंडी उधारीसकट) हिशोब आणि त्याचे पैसे देणेघेणे सुरुच. हे सगळं करताना समोरच्या भगभगत्या शेगडीवर चकचकीत कल्हई केलेल्या पितळी पातेल्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण उकळत असायचं. त्यात महाराजांच्या जाणकार हातांनी गरजेप्रमाणे ‘स्पेशल’ चहा पावडर आणि मांडीवर ठेवलेल्या छोट्याशा पितळी बत्याने कुटलेली खलामधल्या ताज्या वेलचीचे दाणे पडत असायचे. पातेल्यातला चहा तयार होताना दिसल्यावर डावाने हातावर त्याची चमचाभर चव घेऊन तो पसंतीला उतरला, की समोरच्या पितळी किटलीतून ते सोनेरी, तांबूस रंगाचं तजेलदार ‘अमृत’ कपात ओतण्याची सवय बघण्यासारखी.
शंकर पाटलांच्या एका कथेमध्ये, चंचीमधून पान, सुपारी, तंबाखू, चुना आळीपाळीने तोंडात टाकणाऱ्या एका इरसाल माणसाचा उल्लेख आहे बघा. चहा बनवणारे असे महाराज पाहताना मला आजही हटकून शंकर पाटलांनी नजरेसमोर उभ्या केलेल्या त्या पात्राची आठवण होते.
त्या अमृताचा एक भुरका मारताच (फाईव्हस्टार हॉटेलात घेतात तो सिप, उडप्या, इराण्याकडे घेतात तो घोट आणि अमृततुल्यमधल्या मारतात तो चहाचा भुरका) जिभेवर आणि सर्वांगात एक तरतरी यायची.
मुळात पुण्यातल्या चहाची परंपरा दोन मुख्य शाखात विभागली गेली आहे. ती म्हणजे साधारण 19 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात स्थायिक झालेले इराणी आणि त्याच सुमारास राजस्थानवरून पुण्यात दाखल झालेल्या श्रीमाळी ब्राम्हण समाजातल्या लोकांनी सुरुवात केलेली अमृततुल्य.
दोघांच्या चहाचे रंग आणि ढंग संपूर्णपणे वेगळे. चहाच्या बाबतीत काही सन्माननीय अपवाद वगळता मंगलोरवरून आलेल्या उडपी लोकांची खरी स्पेशालिटी ओळखावी ती चहापेक्षा त्यांच्या फिल्टर कॉफीमधूनच. ते काम मात्र ना इराण्याचे ना अमृततुल्यवाल्यांचं. तेथे पाहिजे उडपीचेच!
आता गल्लीबोळात झालेल्या टपऱ्यांवर मिळणाऱ्या स्वस्त कटिंगमुळेही असेल पण पुण्यातल्या अमृततुल्य हॉटेलांची संख्या बरीच कमी झाली आहे. तरी जुन्या दुकानांच्या नव्या पिढीने कारभार नव्या जोमानी हातात घेतलाय.
1892 साली पुण्यातल्या (आणि अर्थातच जगातल्या ) पहिल्या ‘आद्य अमृततुल्य’चा जन्म झाला. ह्या दुकानाच्या मालकांच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजे श्री. शैलेश नर्तेकर, ह्यांच्याशी बोलत होतो. एकोणीसाव्या शतकात अगदी समोरच म्हणजे रविवार पेठेत असलेल्या दुधाच्या भट्टीवरून (नंतर ती आत्ता असलेल्या ठिकाणी म्हणजे गणेश पेठेत गेली) आलेलं ताजं दूध, त्यावेळी पुण्यात मिळणारा ‘ममरी’ चहा आणि वेलचीची ‘खुशबू’ असलेल्या ह्या चहाचा आस्वाद, दुकानात आलेल्या क्रांतीकारक चाफेकर बंधू, राजगुरू ह्यांच्यापासून ते पुण्याला भेट दिलेल्या जवाहरलाल नेहरुंपर्यंत सगळ्यांनी प्यायलेला आहे, ही माहिती त्यांच्याशी गप्पा मारताना समजली.
नर्तेकरांच्या पाठोपाठ ओझा, दवे, शर्मा, त्रिवेदी ह्या मंडळींनी पुण्यात निरनिराळ्या भागात आपापली अमृततुल्य उघडून चहाचा व्यवसाय सुरु केला. चहात साखर मिसळावी तसा हा समाज मराठी समाजात एकरूप झाला. हळूहळू मोजकी मराठी मंडळीही ह्या व्यवसायात आली. आमचा जुना मित्र असलेला माणकेश्वर अमृततुल्यचा मालक शेखर चव्हाणच्या वडिलांनी 87 साली नारायण पेठेत रमणबाग चौकात माणकेश्वर भुवन सुरु केलं. सकाळपासून रात्रीपर्यंत सदोदित सुरु असणाऱ्या (1 ते 4 बंद नसणाऱ्या) आणि कधीच सुट्टी न मिळणाऱ्या ह्या व्यवसायात राजस्थानी मुलांसारखीच कष्टकरी मराठी मुलंही टिकून राहू शकतात हे शेखरच्या उदाहरणावरून दिसेल.
चहाच्या जोडीला अमृततुल्यमध्ये आता क्रीमरोल, बिस्कीट, काही ठिकाणी पोहे, उपमा ह्यांच्यासारखे नाश्त्याचे पदार्थ मिळायला लागलेत. अनेक ठिकाणी उन्हाळ्यात लिंबू सरबत, पन्हं, कोकम ह्याबरोबर थंड ताक, लस्सीही मिळायला लागली. ’तिलक’सारख्या हॉटेल्सनी तर अमृततुल्यच्या पुढे एक पायरी पुढे जाऊन दिवसभर चालणारं एक परिपूर्ण नाश्ता सेंटरच सुरु केलं.
मधल्या काळात अनेक ठिकाणी डबघाईला आलेला अमृततुल्यच्या व्यवसायाला पुन्हा बरे दिवस यायला लागलेत. स्टार्टअप म्हणून अमृततुल्य ‘थीम टी’ स्वरूपात देणारी हॉटेल्स सुरु झाली.
चहाचा व्यवसाय चालवणाऱ्या लोकांचे सवयी, कपडे बदलले, कालपरत्वे धोतीकुडते जाऊन फॉर्मल्स, टी-शर्टवर काम करणारी पिढी आता अमृततुल्य चालवायला लागली आहे. आजकाल काही ठिकाणी whatsapp वर ऑर्डर्स दिल्या, घेतल्या जाऊ लागल्या. बदलली नाही ती फक्त ह्या जुन्या अमृततुल्य हॉटेलातल्या चहाची चव. ह्या चवीची सवय ज्यांना लागली ते ह्याचे आयुष्यभराचे ‘फॅन’ होतात.
इराणी चहा म्हणजे ‘मेट्रोची’ सफर, त्याचे बनणे, हिशोब फक्त हॉटेलातल्या किचनमधल्याच लोकांनाच समजते. अमृततुल्य म्हणजे दोन्ही बाजूंनी ओसंडून वाहणाऱ्या ‘पब्लिक ट्रान्सपोर्टच्या’ बससारखा मोकळाढाकळा कारभार. उकळत्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणात चहा पावडर, वेलची जे काही पडतं आणि घडतं ते ग्राहकासमोर एकदम खुलेआम. त्यात सिक्रसी वगैरे कायसुदिक भानगड न्हाई ! त्यामुळेच असेल पण पुण्यात राहिलेल्या लोकांना अमृततुल्यचा चहा विसरणे अशक्य असते.
-अंबर कर्वे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
नाशिक
Advertisement