एक्स्प्लोर
मुंबईकर पदवीधरांनो, हे जाणून घ्या....
शिक्षित, पदवीधर मतदार लोकशाही प्रक्रियेबद्दल सजग आणि सक्रिय होणं महत्त्वाचं आहे. मतदार जागरुक झाला तरच लोकशाही व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम होऊ शकेल. मुंबई पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी हा मुंबईचाही प्रतिनिधी आहे. त्यामुळे मुंबई शहरातल्या पायाभूत सुविधांपासून पर्यावरण आणि जीवनमानाच्या प्रश्नांपर्यंत सर्व प्रश्नांचा किमान मागोवा घेण्याचा प्रयत्न या उमेदवाराने केला पाहिजे. तसं झालं तरच या मतदारसंघाला न्याय दिल्यासारखं होईल.
मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढील वर्षी जुलैमध्ये होणार आहे. त्यासाठीची मतदार नोंदणी सध्या सुरू आहे. एव्हाना प्रस्थापित राजकीय पक्षांनी पदवीधर मुंबईकरांकडे मतदार नोंदणीसाठी फेऱ्या मारायला सुरुवातही केली असेल. आपल्यापैकी काहींनी तशी नोंदणी केलीही असेल. ज्यांनी नोंदणी केली आहे असे आणि ज्यांनी ती अद्याप केली नाही असे, अशा साऱ्यांनाच पदवीधर मतदारसंघाविषयी पुरेशी माहिती असेलच असेही नाही. याचे कारण विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे पदवीधर निवडणुकांना पुरेसे ‘ग्लॅमर’ प्राप्त झालेले नाही. त्यामुळेच पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय? या मतदारसंघाचं महत्त्व काय? या मतदारसंघाच्या निवडणुका कशा होतात? आणि अधिकाधिक पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याची गरज का आहे? याबद्दल अगदी सुशिक्षित पदवीधरांनाही माहिती नसते हे वास्तव आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोग, शासन आणि प्रसारमाध्यमांकडून व्यापक प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे.
घटनात्मक तरतूद
भारतीय घटनेच्या १७१ व्या कलमामध्ये विधानपरिषदेचा उल्लेख आहे. विधानपरिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. ज्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे, तिथल्या विधानपरिषदेच्या एकूण संख्येपैकी जवळजवळ एक बारांश सदस्य हे भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही विद्यापीठाचे किमान तीन वर्षे आधी पदवीधर झालेले किंवा विद्यापीठाच्या पदवीधरांशी समकक्ष असलेल्या पदव्या असलेले नागरिक निवडून देतात.महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. त्यापैकी सहा सदस्य पदवीधर मतदारसंघातून येतात. मुंबई पदवीधर मतदारसंघ हा त्यापैकीच एक मतदारसंघ आहे. सबंध मुंबई शहर मिळून हा मतदारसंघ तयार होतो. म्हणजे मुंबई शहरासह पश्चिम उपनगरांमध्ये दहिसरपर्यंत, पूर्व उपनगरांमध्ये मुलुंडपर्यंत आणि हार्बर मार्गावर मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. एवढ्या मोठ्या टापूत विधानसभेचे ३६ मतदारसंघ येतात. मतदारसंघ पदवीधरांचा असला तरीही उमेदवार पदवीधरच असला पाहिजे अशी सक्ती नाही.
मतदाराची अर्हता
पदवीधर मतदारसंघामध्ये शिकल्यासवरलेल्या मंडळींचं मतदार म्हणून नोंदणी करण्याचं आणि प्रत्यक्षात मतदानासाठी बाहेर पडण्याचं प्रमाण अत्यल्प असतं. या निवडणुका सहा वर्षांतून एकदा होतात. त्यांचं आणि इतर सार्वत्रिक निवडणुकांचं वेळापत्रक जुळत नाही. या निवडणुकांसाठी निवडणुकांची अधिसूचना जाहीर झालेल्या तारखेआधी तीन वर्षे (यंदासाठी १ ऑक्टोबर २०१४) पदवीधर झालेला / झालेली कोणीही व्यक्ती मतदार म्हणून चालते.
दरवेळेस नव्याने नोंदणी
सर्वोच्च न्यायालयाने १२ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाप्रमाणे या निवडणुकीसाठीची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीत नव्याने करायची आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदार नोंदणीची अधिसूचना २८ सप्टेंबर २०१७ रोजी जाहीर झाली. या अधिसूचनेप्रमाणेच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणी सुरू झाली आहे. त्याचा पहिला टप्पा अलीकडेच 6 नोव्हेंबर रोजी पार पडला. आता दुसरा टप्पा २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान पार पडणार असून त्यातही ज्यांच्या नावांची नोंदणी करायची राहिलेली असेल त्यांच्यासाठी जानेवारीपासून पुढे अगदी पुढील वर्षीच्या जुलैमधील निवडणुकीपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या जाहिरातीनुसार मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणीसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदार नोंदणीसाठी एवढं कराच
या निवडणुकीच्या मतदार नोंदणीचा तपशील https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नाव नोंदण्यासाठीचा अर्ज क्र. १८ सोबत दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहे. (अर्ज क्र. १८ - https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/pdf/Form18_Marathi_English.pdf )
सध्या मुंबई शहरात राहणारा, तीन वर्षे आधी (१ ऑक्टोबर २०१४ आधी) पदवी मिळालेला कोणीही पदवीधर मतदार म्हणून पात्र आहे. आपल्याला मिळालेली पदवी, पदविका या पात्रतेत बसते की नाही हे ज्या मतदारांना तपासून पाहायचे असेल त्यांनी https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/Instruction_Graduate_2017oct.pdf या दुव्यावर जाऊन तिथे दिलेल्या पदव्यांच्या यादीमधून खातरजमा करून घ्यायची आहे. बरेचदा पदवीधर मंडळी मतदार नोंदणीसाठी आणि त्यातही विशेषतः अर्ज भरण्यासाठी आळस करतात. विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर हा फरक आपल्याला प्रकर्षाने लक्षात येईल.
उदासीनता सोडूया
मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये विजेत्या उमेदवाराला सरासरी ५० ते ८० हजार मतं मिळतात. म्हणजे सर्व विजेत्या मतदारांच्या मतांची बेरीज पंचवीस लाखांहून अधिक होते. मात्र सबंध मुंबईभर पसरलेल्या पदवीधरांच्या मतदारसंघामध्ये २०१२ च्या निवडणुकीमध्ये विजेत्या उमेदवाराला १५ हजारांहून कमी मतं मिळाली होती. याचा अर्थ शिकलेला वर्ग या मतदान प्रक्रियेपासून माहितीअभावी किंवा उदासीनतेमुळे कमालीचा दूर आहे.
मतदानाची पद्धत
मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने कालमर्यादा घालून दिलेली असली तरी प्रत्यक्षात संघटीत राजकीय पक्षांकडून होणारी नोंदणी वगळता स्वतंत्रपणे केली जाणारी नोंदणी फारच किरकोळ असते. इतर निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मतदार जागृतीचे कार्यक्रम सातत्याने हाती घेतले जातात तसे या निवडणुकीच्या बाबतीत घडत नाही. अनेक पदवीधरांकडे त्यांची प्रमाणपत्रं नीट ठेवलेली नसतात, किंवा या मतदानाचा अर्ज भरावा यासाठी ती शोधणं त्यांना महत्त्वाचं वाटत नाही. त्याचाही परिणाम मतदार नोंदणीवर होतो. एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ही निवडणूक मतदान यंत्रावर होत नाही, तर मतपत्रिकेवर होते. मतपत्रिकेवर असलेल्या उमेदवारांच्या नावापुढे १, २, ३ असा पसंती क्रम देऊन मतदान करायचे असते.
ही असावी उमेदवाराची कार्यकर्मपत्रिका
घटनाकारांनी समाजातल्या शिक्षित वर्गाचं प्रतिनिधित्व संसदीय व्यासपीठावर व्हावं यासाठी विचारपूर्वक या मतदारसंघाची रचना केली आहे. मात्र गेली काही वर्षे आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याच्या प्रयत्नांत असलेल्या राजकीय पक्षांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त प्रतिनिधींच्या जागांप्रमाणेच पदवीधर मतदारसंघही बळकावून टाकले आहेत. त्यामुळे शिकलेल्या तरुणांचे नोकरी, रोजगार धंद्याचे प्रश्न, मातृभाषेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांसमोर उभी राहणारी आव्हानं आणि जागतिकीकरणानंतर शिक्षितांपुढे निर्माण झालेले प्रश्न यांसारख्या कळीच्या प्रश्नांची चर्चाच विधिमंडळात होत नाही. पदवीधर मतदारसंघातनं होणाऱ्या प्रतिनिधित्वाची अशा रीतीनं झालेली कोंडी फुटायला हवी. शिक्षित, पदवीधर मतदार लोकशाही प्रक्रियेबद्दल सजग आणि सक्रिय होणं महत्त्वाचं आहे. मतदार जागरुक झाला तरच लोकशाही व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम होऊ शकेल. मुंबई पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी हा मुंबईचाही प्रतिनिधी आहे. त्यामुळे मुंबई शहरातल्या पायाभूत सुविधांपासून पर्यावरण आणि जीवनमानाच्या प्रश्नांपर्यंत सर्व प्रश्नांचा किमान मागोवा घेण्याचा प्रयत्न या उमेदवाराने केला पाहिजे. तसं झालं तरच या मतदारसंघाला न्याय दिल्यासारखं होईल.
डॉ. दीपक पवार हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत.
संपर्क - drdeepakpawarofficial@gmail.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement