एक्स्प्लोर
Advertisement
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
नाक कापलं जाणं म्हणजे बेइज्जती होणं आणि नाक कापणं म्हणजे एखाद्याच्या अब्रूचे धिंडवडे काढणं. याखेरीज देखील नाकाविषयीचे म्हणी आणि वाक् प्रचार भारतीय भाषांमध्ये मुबलक आहेत. चेहऱ्यावरचा हा उठून दिसणारा अवयव, त्यामुळे नाक गेलं की चेहरा सपाट होणार – कुरूप दिसणार याची खात्री. म्हणून नाक महत्त्वाचं. शत्रू असलेल्या पुरुषांचे शिरच्छेद करायचे, त्यांचे हात-पाय छाटायचे, डोळे काढायचे अशा आपल्याकडच्या प्राचीन शिक्षा होत्याच.
पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन अजून लांबणीवर पडलंय. दरम्यान धमक्या वाढताहेत. “लक्ष्मणाने जसं शूर्पणखेचं नाक कापलं होतं, त्याप्रमाणे करणी सेनेचे सैनिकही तुझं नाक कापू शकतात”, अशी धमकी करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी दीपिकाला दिली. दीपिकाच्या नाकाची किंमत मात्र कुणी जाहीर केली नाहीये; ते अमूल्य असणार बहुतेक.
नाक इतकं महत्त्वाचं का असतं? डोक्याहूनही महत्त्वाचं? याचा अर्थ असा नाही की, डोक्याला काही किंमतच नाही. संजय लीला भन्साळीचं डोकं छाटून आणणाऱ्यालाही मकराणा तब्बल पाच कोटी देऊ करताहेत की. ताज्या बातमीनुसार हरियाणा भाजपचे चीफ मीडिया कॉर्डिनेटर सुरज पाल या अजून एका महात्म्याने दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा शिरच्छेद करणाऱ्यास 5 कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा करणाऱ्या युवकाला शाबासकी दिली आणि शिरच्छेद करणाऱ्याला 5 कोटी नाही तर आम्ही 10 कोटी रुपये देऊ आणि त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेऊ असंही म्हटलं. अलाउद्दीन खिलजीची भूमिका करणाऱ्या रणवीरने आपले वक्तव्य मागे न घेतल्यास त्याचे दोन्ही पाय तोडून हातात देऊ अशी धमकीही दिली. आता अखिल भारतीय क्षत्रिय महासभा हा धमकीबहाद्दरांच्या स्पर्धेत उतरली असून त्यांनी दीपिकाला जिवंत जाळणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. “राणी पद्मावतीने राजवंशाच्या हितार्थ जौहर केला होता, त्यावेळी तिच्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या याची जाणीव दीपिकाला त्यामुळे होईल,” असं या महान क्षत्रियांचं म्हणणं आहे.
( पद्मिनी, लघुचित्रशैलीतील एक चित्र )
या धमक्यांवर सरकार काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता गप्प आहे. ही एका अर्थी मौन संमतीच मानायला हवी. चित्रपटाशी संबंधित लोकांना संरक्षण पुरवणं ही निराळी गोष्ट आणि समाजात जी सांस्कृतिक दहशत फैलावते आहे त्याबाबत भूमिका घेणं ही निराळी गोष्ट; सरकार सोयीस्करपणे मूग गिळून गप्प आहे. नाक कापलं जाणं म्हणजे बेइज्जती होणं आणि नाक कापणं म्हणजे एखाद्याच्या अब्रूचे धिंडवडे काढणं. याखेरीज देखील नाकाविषयीचे म्हणी आणि वाक् प्रचार भारतीय भाषांमध्ये मुबलक आहेत. चेहऱ्यावरचा हा उठून दिसणारा अवयव, त्यामुळे नाक गेलं की चेहरा सपाट होणार – कुरूप दिसणार याची खात्री. म्हणून नाक महत्त्वाचं. शत्रू असलेल्या पुरुषांचे शिरच्छेद करायचे, त्यांचे हात-पाय छाटायचे, डोळे काढायचे अशा आपल्याकडच्या प्राचीन शिक्षा होत्याच. स्त्री ही जन्मदात्री; खेरीज वंशसातत्य टिकवण्यासाठी आणि लैंगिक उपभोगासाठी ती ‘उपयुक्त वस्तू’ मानली जातेच; आणि खरं म्हणजे तिच्या दैवतीकरणाने पिढ्यानुपिढ्या मनात भयही रुजलेलं असतंच. परिणामी स्त्रीहत्या हे पातक मानलं गेलं. तिला वेसण घालण्यासाठी शेकडो प्रयोग झाले, आजही होताहेत. कारण ती घराण्याचं, जातीचं, धर्माचं, गावाचं व देशाचंही ‘नाक’ असते; तिला परक्यांनी काही करणं म्हणजे या सगळ्यांच्या अब्रूला हात घालणं ठरतं. त्यामुळे तिला सुरक्षेच्या नावाखाली घरात कोंडायचं; बुरख्यात / पडद्यात / घुंघटात झाकायचं; हजारो नीती नियमांचे, कर्मकांडांचे, व्रतवैकल्यांचे दोरखंड वळून बांधून ठेवायचं... हे सुरू आहेच. ज्या राजस्थानातलं पद्मावतीचं कथानक ऐतिहासिक आहे असं मानलं जातं ( प्रत्यक्षात ते केवळ एक काव्य आहे ), तिथली स्त्रियांची स्थिती काय आहे? स्त्री शिक्षणाचं प्रमाण पाहिलं तर केवळ ५३ टक्के स्त्रिया साक्षर आहेत, ४७ टक्के असाक्षर. ५१ टक्के स्त्रियांचे बालविवाह झालेले आहेत आणि वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आई बनलेल्या स्त्रिया आहेत ५० टक्के. मुलींचा जन्मदर भारतात सगळीकडेच कमी आहे; राजस्थानात १००० मुलांमागे फक्त ८८३ मुली जन्मतात. ही आकडेवारी अजून अनेक अंगांनी वाढवता येईल, पण अंदाज यायला इतका मासला पुरे.( राजा रवि वर्मा यांचं चित्र )
बरं, पद्मावतीचा गौरव का करायचा? तर तिनं अब्रूरक्षणार्थ आत्महत्या केली म्हणून; ती लढून मेली नाही, घाबरून मेली; पण ‘आत्महत्येचं धाडस’ केल्यानं तिचा गौरव! पण “जो रोज बदलतीं शौहर वे क्या जाने जौहर!” हे या लोकांचं उत्तर तयार आहेच. पुन्हा राजपुत स्त्रिया हे कृत्य ‘स्वेच्छे’ने करत अशीही चर्चा सुरू झालेली आहेच; ‘सती’सारखंच हे ‘जौहर’चं उदात्तीकरण. एकीकडे या स्वत:ला जाळून घेऊन मारणाऱ्या स्त्रियांचं कौतुक आणि दुसरीकडे स्त्रियांना जाळून मारायचे, त्यांची नाकं कापायचे फतवे! आपल्यातल्या या ठसठशीत विसंगती देखील या सेना, सभा म्हणवणाऱ्या टोळ्यांच्या ध्यानात येत नाहीत. पुन्हा यात लोकांना आवाहन! म्हणजे आपण पैसे मोजून घरात सुखरूप, सुरक्षित; पण दुसऱ्यांनी यांच्या अब्रूसाठी कायद्याचा बळी ठरायचं. लोकही इतके मूर्ख असतात की, हे साधे डावपेच त्यांना कळत नाहीत. एकुणात दुटप्पी लोक आपल्याकडे खूपच. अनेक चेहऱ्यांचे, चेहऱ्यावर मुखवटे घालणारे, दोन जिभांचे अशी त्यांची वर्णनं केली जातातच, त्यात दोन नाकांच्या माणसांचीही भर पडलेली आहे. हरिशंकर परसाई यांनी तर ‘दोन नाकांची माणसं’ नावाची एक अप्रतिम विनोदी कथा आहे. त्यातला हा उतारा – “मला वाटतं की नाकाची सर्वात जास्त काळजी आपल्याच देशात घेतली जाते. खेरीज नाक एकतर अगदी मुलायम गोष्ट असणार किंवा सुरी फार धारदार असणार; कारण एवढ्याशा गोष्टीनं देखील नाक सहज कापलं जातं. छोट्या माणसांचं नाक खूप नाजूक असतं, ते नाक लपवून का ठेवत नाहीत कोण जाणे? काही मोठी माणसं, ज्यांची ऐपत असते, ते कातडीचा रंग चढवलेलं स्टीलचं नाक लावून घेतात. ते कसं कापणार? स्मगलिंग करताना पकडले गेलेत, हातात बेड्या पडल्यात, बाजारातून वरात निघालीये; लोक नाक कापायला उत्सुक आहेत, पण कापणार कसं? नाक तिजोरीत ठेवून स्मगलिंग करायला गेले होते. पोलिसांना खाऊपिऊ घालून परतले की नाक लावतील पुन्हा. जे अधिक हुशार आहेत, ते नाक मुठीत ठेवतात. सगळं शरीर शोधलं तरी नाक काह्ही सापडत नाही. सापडलं तरी मुठीतलं नाक कापून काय फायदा? चेहऱ्यावरचं नाक कापलं तरच त्याला काही अर्थ प्राप्त होतो. आणि ज्यांना नाकच नसतं, त्यांना कसलं भय? नाकाजागी केवळ दोन छिद्रं असतात, त्यांनी श्वास घेत राहायचा!” हे सभा, संघ, सेना, संस्था म्हणवणारे टोळीवाले फतवेबहाद्दर असे दोन नाकांचे आहेत. आपलं एक नाक तिजोरीत सुरक्षित ठेवून, दुसरं स्टीलचं नाक लावून बसलेत आणि इतरांच्या नाकांच्या उठाठेवी करताहेत. यांची दोन्ही नाकं जप्त करून श्वासापुरती दोन छिद्रं राहू द्यावीत, असा फतवा कलावंत काढताहेत असं ऐकलंय बुवा आत्ता... खरंखोटं दीपिका, भन्साळी आणि रणबीर यांनाच ठाऊक! संबंधित ब्लॉग चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंबअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement