BLOG : बारसी लाईट रेल्वे कंपनीचा इतिहास
महाराष्ट्रात लातूर ते मिरज यादरम्यान धावणारी बारसी लाईट रेल्वे ही स्वातंत्र्यपूर्व काळातील खाजगी कंपनी असून बार्शीला मुंबई मद्रास लोहमार्गाला जोडण्यासाठी कुर्डूवाडी ते बार्शी या 34 किमीसाठी एव्हरार्ड कॅल्थरॉप या बुद्धिमान इंजिनीअरने ईस्ट इंडिया कंपनीचा राजीनामा देऊन 11 जुलै 1795 ला ‘बारसी लाईट रेल्वे कंपनी लिमिटेड, लंडन ( BLR )’ नावाने 7,014, 477 रुपयाचे भागभांडवल उभा करून खाजगी कंपनी स्थापन केली. कंपनीचे कार्यालय कायमस्वरूपी विंचेस्टर हाऊस ब्रॉडस्ट्रीट लंडन येथे राहिले.
कुर्डूवाडी बार्शी रस्त्यालगत फक्त 9 फुट रुंदीवर 2 फुट 6 इंच रुंदीची नॅरोगेज रेल्वे 1 मार्च 1897 ला सुरू झाली. कंपनीचे भारतातील कार्यालय सुरूवातीला बार्शीत तर पुढे कुर्डूवाडीला राहिले. ए. एल. अलेक्झांडर यांची मुख्य व्यवस्थापक आणि एजंट म्हणून नियुक्ती झाली. अलेक्झांडर आणि कॅल्थरॉप या जोडगोळीने रात्रीचा दिवस करून BLR ला सोन्याचे दिवस आणले. त्यांचा पगार होता 2200 आणि 1500 रुपये महिना.
सुरूवातीला फक्त बार्शी रोड ( कुर्डूवाडी ) ते बार्शीसाठी तयार झालेली ही रेल्वे वाढत वाढत 1927 साली लातूर ते मिरज याप्रमाणे 323 किमी म्हणजे भारतातील सर्वात मोठी खाजगी नॅरोगेज रेल्वे झाली. सुरूवातीला प्रवाशाकडून कंपनीने किती तिकीट घ्यावे याचे दरही निश्चित केलेले असून त्यानुसार, फर्स्ट क्लास – 24 पैसे प्रती मैल, सेकंड – 12 पैसे, थर्ड – 8 पैसे, फोर्थ – 3 पैसे , घोड्यासाठी – 24 पैसे प्रती मैल , कुत्रे – 8 आणे प्रती 50 मैल, धान्य – 7 शेराखालील वजनासाठी 8 आणे प्रती 50 मैल, सोबत लगेज असेलतर 4 आणे असे दर होते. सुरूवातीला कंपनीने प्रती मैलासाठी 3585 युरो एवढा खर्च केला. यावेळी 1 रुपयाची किंमत 16 डॉलर एवढी होती. दरवर्षी या कंपनीची इंग्लंडमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा भरत असून विशेष म्हणजे 1908 पासून या सभेचे वृतांत तेथील ‘द टाइम्स’सारख्या वर्तमान पत्रात छापून आलेले आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमुळे या गाडीला देवाची गाडी म्हटले जायचे. आषाढी एकादशीला तर अगदी मालगाडीचे डबे सोडले तरी रेल्वेच्या टपावरच नाहीतर इंजिनच्या पुढच्या बाजूलाही लोक बसलेले असायचे. यावेळी तिकीटधारक किती हा विषय गौन असायचा. याचा कंपनीला एकदा फटकाही बसला. त्यानुसार 20.11. 1939 ला धुळ्यावरून कुर्डूवाडीमार्गे पंढरपूर असे आगाऊ तिकीट काढलेल्या शंकर नारायण यांना यात्रेमुळे मालगाडीच्या डब्यात उभे राहून प्रवास करावा लागला. त्यांनी कोर्टात केस ठोकली. तेव्हा 11/4/1946 साली कोर्टाने कंपनीला 9 आणे व्याजासह 5 रुपये दंड ठोठावला. दिवसेंदिवस कंपनीचा विस्तार वाढत गेला. त्यामुळे 1911 च्या अहवालानुसार या गाडीने जून ते डिसेंबर 1911 या सहामाहीत 3, 87,070 एवढ्या प्रवाशांची वाहतूक करत 126. 03 पैसे प्रती मैल प्रती आठवडा या दराने 3, 19, 550 रुपये जमा केले. कंपनीचा प्रशासकीय वार्षिक खर्च 51 % पर्यन्त असून त्यांनी नेहमीच फक्त 4 % एवढाच नफा अपेक्षित धरला होता.
सुरूवातीला ही गाडी पंढरपूरला नदीच्या अलीकडेच थांबायची. त्यानंतर भीमा नदीवरील पूल आणि पुढील लाइनसाठी 8,66,000 रुपये खर्च केला, त्यामुळे पंढरपूरच्या रेल्वे पुलाचे ‘विलीग्टन पूल’ असे नाव होते. या कंपनीमुळे आपणास इतिहासातील काही रंजक गोष्टी समजायला मदत होते. त्यानुसार केवळ बार्शी लाइट रेल्वे आली म्हणूनच कुर्डूवाडी गावाची निर्मिती झाली. खरंतर 23 आक्टोबर 1914 पर्यंत कुर्डूवाडीला बारसी रोड असे नाव असून इंग्रजांनी बार्शीचा उच्चार शेवटपर्यंत Barsee व 1870 नंतर Barsi असाच केला.
BLR कंपनीच्या 1912 च्या प्राप्त वार्षिक अवहालानुसार नोव्हेबर 1911 ला होणारी कार्तिकी एकादशीची पंढरपूर यात्रा प्लेगमुळे तर त्यानंतर जुलै 2012 ची आषाढी यात्रा कॉलरामुळे रद्द करावी लागली होती. म्हणजे 1911 ते 12 असे वर्षभर पंढरपूरचे मंदिर साथीच्या रोगामुळे बंदच असून नव्वद वर्षापूर्वीही लॉकडाउन ही संकल्पना होती हे समजण्यास मदत होते. त्यामुळे अपेक्षित 4, 53, 768 एवढे प्रवाशी न आल्यामुळे कंपनीला 41650 रुपयाचा तोटा झाला. इंग्रज किती प्रगत होते हे पुढील उदाहरणावरून दिसून येते. त्यानुसार 1897 ला एखादी कंपनी काढून मोठा उद्योग उभा करण्यासाठी लोकामधून शेअरच्या माध्यमातून भांडवल उभे केले. 10 युरोच्या प्रती शेअरसाठी 4 % बोनस दिला जायचा. 1911 -12 ला साथीच्या रोगामुळे तर लगेच 1914 च्या पहिल्या महायुद्धामुळे कंपनीला आर्थिक नुकसान झाले तेव्हा लंडन सरकारच्यावतीने उभारलेल्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स फंडा’तून बार्सी लाइट रेल्वे कंपनीला 500 युरोची आर्थिक मदत झाली.
कंपनीसाठी लागणारी जमीन शासनाच्यावतीने मोफत देण्यात आली होती. 1930 ला कुर्डूवाडीला मोठे वर्कशॉप काढण्यात आले. तर किंगस्टन कंपनीचे इंजिन लंडनचे असलेतरी मराठी माणसासाठी त्याचे मौखिक नाव रुक्मिणी वगैरे प्रमाणे मराठी ठेवण्याची प्रथा होती. कोळशावर चालणार्या इंजिनमुळे वाफ तयार व्हायला वेळ लागायचा म्हणून कधीकधी एखाद्या स्टेशनवर गाडी तासनतास थांबायची. तर येडशीच्या रामलिंग घाटात डबल इंजिन लागायचं. पूर्वी गाडी येण्यापूर्वी विशेषत: जंगल परिसरात रेल्वेलाइनवर काही अडथळातर नाही ना हे पहाण्यासाठी एक घोडेस्वार रेल्वे येण्यापूर्वी पुढे धावत जावून पाहणी करायचा. रामलिंगच्या घाटात गाडीची गतीच एवढी कमी होती की, कधी कधी जनावरे आडवी आली तर ड्रायव्हर खाली उतरून जनावरे बाजूला हाकून मग गाडी पुढे जायचा. कुसळंब ते तडवळा या लाइनचे काम पाठक आणि वालचंद कंपनीकडून सुरू असताना कंपनीचे चीफ इंजिनीअर ए. एल. अलेक्झांडर यांना पिंडीच्या आकाराचा रामलिंगनजिक दुर्गादेवीचा डोंगर पसंत पडला आणि त्यांनी इंग्लंडवरून साहित्य मागवून अतिशय देखणे विश्रामगृह 1907 साली बांधले. आजही ते तेवढेच मजबूत असून त्याची प्रकाश, बैठक, स्वयंपाक, शिकार, थंडपाणी अशा सर्व व्यवस्था पाहण्यालायक आहेत.
1 जानेवारी 1954 ला भारतीय रेल मंत्रालयाने बार्शी लाइट रेल्वे कंपनी विकत घेतली. पुढे काही ठिकाणी तिचा मार्ग बदलला मात्र लातूर उस्मानाबाद परिसरातील लोकांना रामलिंगच्या स्टेशनशिवाय या गाडीत बसल्याची मजा कधीच येणार नाही. आजही काही ठिकाणी जुने रूळ, स्टेशनच्या नावाचे फलक तसेच पडून आहेत. त्याकडे पाहिल्यानंतर तो कळाकुट्ट धूर, इंजिनची शिट्टी, कोळसा टाकतानाचा ड्रायव्हर आणि इंजिनमधले निखारे आठवले की, देवाच्या गाडीच्या आठवणी ताज्या होतात. या यादगार क्षणाचे सर्व श्रेय जाते, एव्हरार्ड कॅल्थरॉप नावाच्या ध्येयवेड्या इंजिनीअरला, ज्याने भारतात 2.6 इंच रुंदीच्या रेल्वेचा प्रयोग करून तो सत्यात उतरविला.
प्रा. डॉ. सतीश कदम
अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद