Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज परभणीत सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज परभणीत (Parbhani Muk Morcha) सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.
या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी तसेच भाऊ धनंजय देशमुख, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप शिरसागर, ज्योती मेटे यांच्यासह स्थानिक परभणी जिल्हा प्रतिनिधी, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
असा आहे मोर्चाचा मार्ग
या मूक मोर्चाचा मार्ग नूतन महाविद्यालय जिंतूर रोड येथुन निघुन महाराणा प्रताप चौक- शनी मंदिर - नानल पेठ कॉर्नर- शिवाजी चौक- गांधी पार्क- नारायण चाळ मार्गे महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत काढला जाणार आहे.
याआधी बीड येथे निघाला होता मूक मोर्चा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ 28 डिसेंबरला बीडमध्ये मूक मोर्चा निघाला होता. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद ठेवण्यात आले होते. या मोर्चात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे यांच्यासह अनेक नेत्यांचा सहभाग दिसून आला होता. या मोर्चातून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले होते.
वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ
दरम्यान, सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड 22 दिवसांपासून बेपत्ता होता. तो 31 डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे हा देखील पोलीस कोठडीत आहे. विष्णू चाटेने दिलेल्या माहितीनंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटे याने चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे. वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, असे विष्णू चाटे याने म्हटले आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे.
आणखी वाचा