एक्स्प्लोर
विराट कोहली... टीम इंडियाची 2000ची नोट!
देशभरात सध्या 500 आणि 1000च्या नोटांवरील बंदीचा विषय बराच गाजतो आहे. तसंच नव्या 2000च्या नोटेचंही साऱ्यांनाच अप्रूप आहे. चलनात 1000 पेक्षा मोठी नोट आल्यानं काही जण त्यावर टीकाही करत आहे. या सगळ्या गदारोळात मात्र, क्रिकेटच्या मैदानावर स्वत:चं मूल्य वाढवणारा एक खेळाडू सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली.
टी-20, वनडे किंवा कसोटी कोणत्याही प्रकारातील सामना असो आज भारतीय संघ विराट कोहलीवरच अवलंबून असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. हा खेळाडू दिवसागणिक आपलं 'मूल्य' वाढवत आहे. पाचशे हजाराच्या जुन्या नोटा रद्द होऊन नव्या नोटा बाजारात आल्या. तसंच विराट प्रत्येकवेळी आपला जुना खेळ पाठी सोडून नवा खेळ समोर घेऊन येतो. त्याचा नवा खेळ कायमच डोळ्यांना सुखावणारा असतो.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच कसोटीतील उदाहरण बघा. पहिल्या डावात लयात आलेला कोहली दुर्देवानं हिट विकेट झाला. अन् त्याचवेळी विकेटकिपर जोनाथननं केलेला जल्लोष जणू काही जग जिंकल्यासारखाच होता. सामना आपल्या पकडीत आला असंच काहीसं त्याला वाटलं असावं.
राजकोट कसोटीत पहिल्या डावात भारत काही धावांनी पिछाडीवर राहिल्यानं या सामन्यावर इंग्लंडनं पकड बनविण्याचा प्रयत्न केला. कर्णधार कूकनं शतकी खेळी करुन पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी 310 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे. पण पाचव्या दिवशी फलंदाजी करणं तेवढं सोपं नव्हतं हे टीम इंडियाला दुसऱ्याच ओव्हरमध्ये कळलं. कारण की, सलामीवीर गंभीर शून्यावर बाद झाला. त्यानंतर थोड्या थोड्या अंतरानं टीम इंडियाचे फलंदाज बाद होत राहिले. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराटनं आपल्या विकेटचं महत्व ओळखलं आणि आपला खेळ बदलला.
पुजारा, मुरली विजय आणि रहाणे एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर विराटनं तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत टीम इंडियाला पराभवापासून वाचवलं. वेगवान खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या विराटनं खेळाचा नूर ओळखून प्रचंड संयमी खेळी केली. दुसऱ्या डावात 98 चेंडूत त्यांनं नाबाद 49 धावा केल्या. ज्यामध्ये त्यांनं फक्त 6 चौकार ठोकले. विराट अशा खेळासाठी कधीही प्रसिद्ध नव्हता. आक्रमक बाणा हाच विराटचा स्थायीभाव राहिला आहे. पण पराभव समोर दिसत असताना सामन्यातील शेवटच्या ओव्हरपर्यंत नाबाद राहण्याची किमया त्यांनं करुन दाखवली.
इंग्लडचा विजय आणि भारताचा पराभव यांच्यामध्ये विराट एखाद्या भिंतीप्रमाणे उभा राहिला आणि भिंत पाडणं इंग्लंडच्या गोलंदाजांना काही शक्य झालं नाही.
सुरुवातीच्या काळात आक्रमक असलेल्या विराटची ही खेळी देखील डोळ्यांना सुखावून गेली. त्यानं मारलेले चौकार, षटकार पाहण्यात जशी वेगळी मजा असते. तशीच मजा काल त्यानं खेळलेल्या बचावात्मक फटक्यातही होती.
त्यामुळेच नावाप्रमाणं विराट कामगिरी करणारा कोहली आता टीम इंडियाचा आधारस्तंभ झाला आहे. थोडक्यात काय तर तो विराट टीम इंडियाची 2000ची नोट झाला आहे! ज्याचं मूल्य दिवसेंदिवस वाढतच आहे...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement