एक्स्प्लोर
माझा सन्मान : डॉ. संजीव धुरंधर
11 फेब्रुवारी 2016 ला ‘लायगो’ या जगप्रसिद्ध लॅबमधून त्या लॅबच्या संचालकांकडून एक मोठी घोषणा केली गेली. गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा शोध लागल्याची ती घोषणा होती. अशा गुरुत्वीय लहरी अस्तित्वात असतील असं भाकीत बरोब्बर 100 वर्षापूर्वी खुद्द आईन्स्टाईननं केलं होतं.. व्यापक सापेक्षतावाद किंवा जनरल रिलेटीव्हिटीची थियरी मांडतांना आईन्स्टाईननं गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाबद्दल सांगितलं होतं.. तेव्हापासून बरोब्बर 100 वर्ष जगभरातले शेकडो शास्त्रज्ञ भौतिकशास्त्रातल्या या महत्त्वपूर्ण शोधाचा माग घेत होते. गेल्या तीस वर्षांपासून तर लायगोच्या माध्यमातून जगभरातील 1000 शास्त्रज्ञांचा एक समूह याचा एकत्रित अभ्यास करत होते. तीस वर्षांच्या मेहनतीनंतर जगभरातील शास्त्रज्ञांनी 100 वर्षापूर्वी वर्तवण्यात आलेलं ते भाकीत निरीक्षणं आणि विश्लेषणांच्या आधारावर सिद्ध केलं.
100 वर्षापूर्वी व्यापक सापेक्षतावादाचा (जनरल रिलेटीव्हिटी)सिद्धांत मांडला गेला तेव्हा कदाचित त्याचं महत्त्व तितकंस कळलं नसेल, पण त्या शोधाचे फायदे आज आपण उपभोगतोय. आपल्या मोबाईलमधल्या जीपीएसचं उदाहरण घेतलं तर व्यापक सापेक्षतावादाच्या वापराशिवाय जीपीएस कामच करू शकत नाही. आपले मोबाइल, गाडय़ा, विमाने, जहाजे हे सर्वच याचा वापर करतात. सध्याचे दळणवळण आणि दूरसंचार हे सगळं जनरल रिलेटीव्हीटीच्या सिद्धांतावर आधारित आहे. पण 100 वर्षापूर्वी आईन्स्टाईनकडून जेव्हा हा सिद्धांत मांडला गेला तेव्हा त्याचा पुढे कसाकसा वापर होणार याची स्वत: या महान शास्त्रज्ञालाही कल्पना नसेल. अगदी त्याच तोडीचा हा गुरुत्वीय लहरींचा शोध आहे. त्याचा कसा वापर केला जातो हे कळायला पुढचे किमान पन्नास वर्ष तरी जातील.
अशा या ऐतिहासिक शोधात भारतातल्या 60 हून अधिक शास्त्रज्ञांचा सहभाग होता ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती..पण त्या भारतीय शास्त्रज्ञांमध्येही मराठमोळे शास्त्रज्ञ डॉ संजीव धुरंधर यांची मोलाची भूमिका होती..त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूने या गुरुत्वीय लहरींबाबत अचूक नोंदीचे तंत्र विकसित केले आहे,गुरुत्वीय लहरींचा शोध आणि त्यांची निरीक्षणे हा त्यांचा मुख्य विषय आहे. गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या डिटेक्टरवर मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण आणि त्याबाबतचे कम्प्युटर मॉडेलिंग विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
स्वत: डॉ. संजीव धुरंधर हे विख्यात खगोल भौतिकशास्त्रज्ञ आहेत. विख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे धुरंधरांचे गुरु. शालेय जीवनापासूनच विज्ञानातल्या संकल्पना समजून घेण्याकडे त्यांचा ओढा होता. म्हणूनच तर इंजिनीयर होण्याची संधी असतानाही त्यांनी विज्ञानाची पदवी घेणं पसंत केलं. पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणानंतर परदेशी जाऊन रिसर्च करण्याची संधी असतानाही धुरंधर यांनी मात्र पुण्यात आयुकामधूनच त्यांचा अभ्यास करणं पसंत केलं..गुरुत्वीय लहरीवंर प्रत्येक्षपणे डॉ धुरंधर यांनी 1987 सालापासून काम सुरु केलं..गुरुत्वीय लहरींचा अचूक वेध घेण्यासाठी आवश्यक गणितावर आधारित मॉडेल तयार करण्याचं काम डॉ धुरंधर आणि त्यांच्या टीमनं केलं..त्यांच्या मॉडेलनी अतिशय अचूक निरीक्षण नोंदवली ज्याचा फायदा लायगो ला त्या लहरींच्या अस्तित्वापर्यंत पोहोचण्यासाठी झाला. या विषयाशी संबंधित पेपर जेव्हा प्रकाशित केले जातात तेव्हा डॉ धुरंधरांच्या कामाचा अगदी सुरुवातील उल्लेख केला जातो. डॉ धुरंधरांची पीएचडी ब्लॅक होल किंवा कृष्णविवर या विषयात आहे. भौतिकशास्त्राबरोबरच गणित आणि अंकशास्त्राचा अभ्यास त्यांना आवडत असल्याने रुरत्वीय लहरींच्या शोधासाठी मॉडेल तयार करण्याचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलं. जवळपास तीन दशकं केलेल्या कामाचं गेल्या वर्षी चिज झालं..
अर्थात भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र अशा विषयात काम करणारे डॉ संजीव धुरंधर रुक्ष मात्र अजिबात नाहीत, त्यांच्या कामाच्या विषयांशिवाय त्यांना संगीताची खूप आवड आहे. संगीताप्रमाणेच विज्ञानाच्या अभ्यासातही एक ट्यून आहे आणि म्हणूनच त्यांना विज्ञानाचा अभ्यास, प्रश्न सोडवणं आवडतं, असं स्वत: डॉ धुरंधर सांगतात. भौतिकशास्त्रातल्या जगाला माहीत नसलेले सिद्धांत जसे त्यांना साद घालतात अगदी तसाच निसर्गही त्यांना साद घालतो. आयुकातील त्यांचे सहकारी अभिमानाने सांगतात की आयुकातील गुलाबांचा बगिचा पूर्णपणे डॉ धुरंधरांच्या प्रयत्नाने साकारला गेलाय. सध्या डॉ धुरंधर आयुकामध्ये नवीन शास्त्रज्ञ घडवतात आहेत. त्यांच्या विषयाशी संबंधीत काम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे ते पीएचडी गाईड आहेत..एकीकडे मूलभूत विज्ञानाकडे विद्यार्थी वळत नाही अशी आजची ओरड असताना डॉ धुरंधरांचं काम मात्र सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement