BLOG | मुंबईत दुसरा सचिन तेंडुलकर कसा निर्माण होणार?
बीसीसीआयनं दिलेल्या सवलतीचा फायदा उठवून अर्जुन तेंडुलकरचा एकविसावा खेळाडू म्हणून मुंबईच्या ट्वेन्टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. पण त्यामुळं अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या ट्वेन्टी20 संघात मागच्या दारानं एन्ट्री देण्यात आल्याची कुजबूज मुंबईच्या मैदानांमध्ये सुरु आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याच्या उभ्या कारकीर्दीत कोणत्याही संघात निवड होण्यासाठी कधीही निवड समिती सदस्यांची मेहेरनजर होण्याची गरज भासली नाही. त्याचं कारण होतं सचिन तेंडुलकरचा खणखणीत परफॉर्मन्स. वयाच्या चौदाव्या वर्षापासून सचिनची बॅट बोलत होती आणि त्याला बालवयातच सीनियर संघांची दारं उघडत गेली. पण सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरच्या बाबतीत आपल्याला हे म्हणता येईल का? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सीनियर निवड चाचणी सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकरनं बजावलेली कामगिरी पाहता या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असंच येईल. तरीही बीसीसीआयनं दिलेल्या सवलतीचा फायदा उठवून अर्जुनचा एकविसावा खेळाडू म्हणून मुंबईच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात मागच्या दारानं एन्ट्री देण्यात आल्याची कुजबूज मुंबईच्या मैदानांमध्ये सुरु आहे.
बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेला 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या म्हणजे एमसीएच्या निवड चाचणीत अर्जुननं चार ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये मिळून 113 धावांत फक्त चार विकेट्स घेतल्या. त्याला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण पुढच्या तीन सामन्यांमध्ये त्यानं अनुक्रमे 3, 4 आणि शून्य धावा केल्या. अर्जुनला फलंदाजीची पुरेशी संधी मिळावी म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात त्याला सलामीला बढती देण्यात आली होती. पण अर्जुनला त्या बढतीचा लाभ उठवता आला नाही आणि त्याची कामगिरी सपशेल निराशाजनकच ठरली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन तेंडुलकरच्या निराशाजनक कामगिरीनंतरही सलिल अंकोला यांच्या सीनियर निवड समितीला तो संघात हवाच होता. त्यादृष्टीनं निवड समितीच्या बैठकीत चाचपणीही करण्यात आली. पण नव्या निवड समितीवर पहिल्याच बैठकीनंतर जाहीर टीका होण्याच्या भीतीपोटी अर्जुनचा वीस सदस्यीय संघात समावेश करण्याचं जाणीवपूर्वक टाळण्यात आलं. पण त्यानंतर बीसीसीआयनं कोरोनाच्या संकटात प्रत्येक संघाला वीस ऐवजी बावीस खेळाडूंची निवड करण्याची मुभा दिली. आणि त्याच सवलतीचा फायदा उठवून अंकोला यांच्या निवड समितीनं अर्जुनचा एकविसावा खेळाडू म्हणून मुंबई संघात समावेश केला आहे.
मुंबईच्या सीनियर ट्वेन्टी ट्वेन्टी संघात कुणाला घ्यायचं हा निवड समिती अध्यक्ष सलिल अंकोला यांच्यासह संजय पाटील, रवी ठक्कर, झुल्फिकार परकार आणि रवी कुलकर्णी या चार सदस्यांचा अधिकार आहे. पण चार सामन्यांमध्ये मिळून सात धावा आणि चार विकेट्स घेणारा अर्जुन तेंडुलकर कोणत्या निकषावर मुंबईच्या सीनियर ट्वेन्टी ट्वेन्टी संघात हक्काचं एकविसावं स्थान मिळवतो, हा प्रश्नच आहे. एमसीएच्या कार्यपद्धतीनुसार प्राथमिक संघाच्या निवडीसाठी निवड समितीची बैठक होते. तशी बैठक मुंबईचा वीससदस्यीय ट्वेन्टी ट्वेन्टी संघ निवडण्यासाठी झाली होती. पण अतिरिक्त खेळाडूंच्या निवडीचा थेट अधिकार निवड समितीच्या अध्यक्षांना असतो. त्यामुळं मुंबईच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात एकविसावा आणि बाविसावा खेळाडू निवडण्यासाठी अंकोला यांनी ती व्हेटो पॉवर वापरली की, त्यांनी अन्य सदस्यांचं मतही जाणून घेतलं?
मुंबईच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात अर्जुन तेंडुलकरची निवड अध्यक्षांच्या व्हेटो पॉवरनं झाली असो किंवा पाचही सदस्यांच्या चर्चेतून झाली असो, त्यामुळं काही प्रश्न नक्कीच निर्माण झाले आहेत. सचिनच्या पावलावर पाऊल ठेवून अर्जुननं मुंबईकडून कोणत्या वयोगटात खेळताना असामान्य कामगिरी बजावली होती की, ती लक्षात घेऊन त्याला थेट सीनियर संघात संधी देण्यात आली? रमाकांत आचरेकर, वासू परांजपे, राजसिंग डुंगरपूर, दिलीप वेंगसरकर आणि कपिलदेव यांच्यासारख्या दिग्गजांनी सचिनच्या सर्वोच्च दर्जावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली होती. मुंबई किंवा भारतीय क्रिकेटमधलं असं सर्टिफिकेट कुणी अर्जुन तेंडुलकरच्या दर्जाला दिलं आहे का? अंकोला अँड कंपनीनं अर्जुन तेंडुलकरला कडेवर घ्यायचं ठरवलंच असेल, तर त्यामुळं गुणी मुलांवर होणाऱ्या अन्यायाचं एमसीए परिमार्जन कसं करणार? एमसीएकडे या प्रश्नांची उत्तरं आहेत का?
मुंबई क्रिकेटच्या दुर्दैवानं आज एमसीएच्या पालखीचे भोई झालेल्या मंडळींमध्ये ‘स्वान्त सुखाय स्वान्त हिताय’ जगणाऱ्या मंडळींची संख्या अधिक आहे. त्यामुळं मुंबई क्रिकेटचा ढासळणारा दर्जा या विषयावर एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा अन्य बैठकांमध्ये चर्चा होत नाही. म्हणूनच प्रश्न पडतो की, एमसीएच्या निवड समितीच्या कामगिरीचं कधी तरी मूल्यमापन होत का? असंच जर असेल तर रथीमहारथींचा वारसा सांगणाऱ्या या मुंबईत दुसरा सचिन तेंडुलकर निर्माण होणार कसा?
सय्यद मुश्ताक अली करंडकासाठी झालेल्या एमसीएच्या निवड चाचणीत रवींदर सोलंकी, सागर मिश्रा, रौनक शर्मा, केविन अल्मेडा यांच्यासारख्या काही खेळाडूंनी अर्जुन तेंडुलकरपेक्षा समाधानकारक कामगिरी बजावली होती. पण त्यांच्या कामगिरीनं अंकोला अँड कंपनीची मनं का जिंकली नाहीत, हा प्रश्न आहे. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे, तर रवींदर सोलंकी हा उजव्या हातानं मध्यमगती मारा करतो. अर्जुननं चार सामन्यांमध्ये 113 धावांत चार विकेट्स घेतल्या, तर सोलंकीनं त्याच्या वाट्याला आलेल्या दोन सामन्यांमध्ये 54 धावा मोजून चार फलंदाजांना माघारी धाडलं. अर्जुनसारखाच डावखुरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या अतिफ अत्तरवालानं तीन सामन्यांमध्ये नऊ षटकांत 85 धावा मोजून एक विकेट काढली होती. पण तो अनुभवी असूनही त्याच्या नावावर फुली मारण्यात आली.
डावखुरा स्पिनर सागर मिश्रा आणि लेग स्पिनर रौनक शर्मानं निवड चाचणीत अष्टपैलू कामगिरी बजावली. मिश्राच्या नावावर तीन सामन्यांमध्ये 23 धावांत दोन विकेट्स आणि एका अर्धशतकासह 79 धावा अशी कामगिरी आहे. शर्माला दोन सामन्यांमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही, पण त्याच्या खात्यात एका अर्धशतकासह 67 धावा आहेत. केविन अल्मेडा या सलामीच्या फलंदाजानं तीन सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह 80 धावा केल्या आहेत. ही झाली वैयक्तिक अकडेवारी, पण क्रिकेटच्या मैदानात कधी कधी आकडेवारीच्या तुलनेत खेळाडूची गुणवत्ता आणि त्याची मॅचविनिंग क्षमता यांना झुकतं माप दिलं जातं. सलिल अंकोला यांच्या निवड समितीनं रवींदर सोलंकी, सागर मिश्रा, रौनक शर्मा आणि केविन अल्मेडा यांच्यासारख्या गुणी खेळाडूंवर अन्याय करताना अर्जुन तेंडुलकरच्या गुणवत्तेला आणि त्याच्या मॅचविनिंग क्षमतेला झुकतं माप दिलं आहे का? तसं नसेल तर या मुंबईत दुसरा सचिन तेंडुलकर निर्माण होणार कसा, या प्रश्नाचं उत्तर सध्या मी शोधतोय. तुम्हाला सापडलं तर मलाही सांगा.