भारतात कोरोनाचे आगमन होऊन जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलाय, रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून 12 लाख रुग्णांचा टप्पा करून पुढे गेलो आहोत. या संसर्गजन्य आजाराने आतापर्यंत 29 हजार 861 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र मेहनत करून रुग्णांना उपचार देत असून बऱ्यापैकी रुग्ण औषधांना प्रतिसाद देत आहेत. या सगळ्या प्रकारात या आजारापासून दूर राहायचे असेल तर प्रशासनाने नागरिकांकरिता काही सुरक्षिततेचे नियम आखून दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे घराबाहेर पडताना नाका-तोंडावर मुखपट्टी (मास्क) लावावी, तसे तर काही तज्ज्ञ आता घरातही मास्क लावा असे सूचित करत आहेत. या मास्कचं एवढंच महत्त्व आहे तर हे सर्व सामान्य नागरिकांना का कळत नाहीये. अजून किती रुग्ण संख्या वाढल्यावर आणि मृतांचा आकडा बघितल्यावर त्यांना मास्कची उपयुक्तता लक्षात येणार आहे. अख्या जगात या आजाराने थैमान घातले आहे, प्रत्येक जण मास्क वापरणे कशी काळाची गरज आहे हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहे. काही महिन्यात या आजारावर लस निघेल अशी अपेक्षा आहे. राज्यातील विविध भागात दिवसागणिक रुग्ण वाढतच आहे आणि आपण आजही 'मास्क' आपल्याला निरोगी राहण्यासाठी किती महत्वाचे आहे यावरच चर्चा करताना दिसतोय.
डेली मेल या इंग्रजी वृत्तपत्रात 22 जुलै रोजी आलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरिया देशात मास्कला घेऊन नवीन नियम बनविण्यात आला आहे. त्यानुसार जा कुणी सार्वजनिक परिसरात फिरताना मास्क घातला नसेल तर त्या तीन सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येणार आहे. कोरोनाचे विषाणूंचा प्रसार होऊ नये याकरिता या देशाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या देशामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत मात्र तरीही प्रतिबंधात्मक उपाय या देशामध्ये हा नियम करण्यात आला आहे. आपल्याकडेही मास्क न घालता मोकाट फिरण्यावर बंधनं आहे अन्यथा 2000 रू दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सोमवारी जम्मू-काश्मीर राज्यात एकाच दिवशी 751 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तेथील रोशनी या उर्दू भाषेतून निघणाऱ्या दैनिकाने काही दिवसापूर्वीच लोकांमध्ये मास्क बाबत जनजागृती यावी म्हणून पहिल्या पानावर खराखुरा मास्क लावून पेपर वितरित केला आहे. या सगळया घटनांवरून आपल्याला लक्षात येईल कि सध्या मास्क ही किती महत्वाची गरज आहे.
कोरोनाची सुरुवात झाली आणि आपल्याकडे बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. कुणी घरच्या घरी कापडाचे मास्क बनवू लागलेत, कुणी सर्जिकल मास्क परिधान करू लागलेत. तर कुणी एन-95 मास्कचा आग्रहाने वापर करू लागलेत तर काही व्हॉल्व असलेले मास्क घालू लागलेत. बरे हे मास्क घालून, त्या वापरण्याच्या प्रत्येकाचा 'तऱ्हा' हे वेगवेगळ्या आहेत. कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर आणि जनजागृती झाल्यानंतर, प्रत्येक जण मास्क घेताना आपणास पाहावयास मिळत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ते कसे वापरावेत याबद्दल मात्र खूप जणांच्या डोक्यात गोंधळच सुरु आहे. कुणी तो गळ्यात, तर कुणी हनुवटीवर, कुणी फक्त नाकाच्या खाली तर कुणी चारही बाजूने हवा मास्क मध्ये शिरेल याची काळजी घेत मास्क लावून फिरत आहे. ज्याला जसे वाटेल त्या पद्धतीने मास्क लावून फिरत आहे. कधी तरी त्या मास्क लावण्याबद्दलचं शास्त्रीय कारणे जाणून घेतली आहेत का? फार कमी टक्के लोकं आहे की त्यांनी मास्क कसा वापरायचा याची माहिती जाणून घेतली असावी. या सगळ्या प्रक्रियेत मास्क कसा ही लावला तर कोरोना होत नाही येवढीच काय ती माहिती अनेकांना माहित आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सध्या काही जण अतिसुरक्षिततेच्या आहारी जाऊन जे एन-95 मास्क डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना घालणेअपेक्षित आहेत, ते मास्क अनेक सर्व सामान्य नागरिक परिधान करत आहेत. त्याचसोबत काही लोकं व्हॉल्व वाले मास्क वापरत आहेत, जे खरं तर वापरू नयेत याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेक वेळा सांगितले आहे.
"व्हॉल्ववाले मास्क वापरू नयेत याबाबत तर आता सरकारने परिपत्रक काढले आहे. हे अनेकवेळा सांगितले गेले आहे. व्हॉल्ववाल्या मास्कमुळे जो परिधान करतो त्याला काही फरक पडत नाही तो सुरक्षित राहतो मात्र त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्याचा धोका संभवू शकतो. कारण त्या व्हॉल्ववाल्या मास्क मधून त्याचा श्वास थेट हवेत सोडला जातो. त्या व्यक्तीला जर काही श्वसनविकाराशी निगडित किंवा अन्य काही संसर्गजन्य आजार असतील तर त्यामुळे तो इतर लोकांना होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना साधा सर्जिकल मास्क किंवा कापडी तीन लेअरचा मास्क वापरण्यास काहीच हरकत नाही." असे डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. डॉ सुपे हे राज्य शासनाच्या मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आहेत.
22 मार्च, 'कोई भी लेलो .... लाल,काला,पिला मास्क' या शीर्षकाखाली बाजारात सडक्या विक्री करणाऱ्या मास्क बद्दल विस्तृत लिहिले होते. मात्र आजही त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामध्ये, राज्यातील बहुधा सर्वच रेल्वे स्टेशनवर, छोट्या-मोठ्या नाक्यावर चड्ड्या-बंड्या, मोबाइलचे चार्जर, एअरफोन विकणाऱ्यांनी मास्क विक्रीचा जोरदार धंदा सुरु केलाय. परंतु आपण जे मास्क तोंडावर लावतोय त्याची काळजी कशी घ्याची हे तरी माहित आहे का? अनेक लोक दिवसभर मास्क बॅगेत किंवा खिशात ठेवून दुसऱ्या दिवशी तसाच परिधान करताना दिसतायत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे संरक्षण होणे तर दूर परंतु मोठे धोके संभवतात. त्यामुळे मास्क घालणे किंवा वापरणे, तसेच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे याला वैद्यकीय क्षेत्रात एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, ती आपण जाणून घेतली पाहिजे.
डॉ अनिल भोंडवे, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र चे अध्यक्ष सांगतात की, "आजही आपल्याकडे मास्क बाबत जी जनजागृती होणे अपेक्षित होती ती झालेलीच नाही. यामुळे अनेक लोकामंध्ये गोंधळ उडालेला पाहावयास मिळत आहे. आजही दूरदर्शनचा आधार घेऊन यावर मोठे अभियान राबिवण्याची गरज आहे. कारण सध्याचा परीस्थित मास्क हे शस्त्र ज्याचा कोरोना पासून बचाव होऊ शकतो. अनेक लोकांचे मास्क बद्दल गैर समाज आहेत. कुणी कसाही, कुठलाही मास्क वापरात आहे. अनेक तोंडाला पदर लावून फिरत असतात. सुरवातीच्या काळात आपण म्हणालो होतो की, साधा रुमाल बांधला तरी चालेल मात्र आताची वेळ सांगते आहे की प्रत्येकाने मास्कच लावला पाहिजे. जर तुम्ही कापडी मास्क वापरात असाल तर रोजच्या रोज अँटिसेप्टिक द्रव्यातून धुऊन घेतला पाहिजे. काही लोक घरी आल्यानंतर तोच मास्क खिशात किंवा बॅगेत काढून ठेवतात आणि पुन्हा तसाच वापरतात. त्यामुले तुमचं संरक्षण होण्यापेक्षा तुम्हाला त्रास होऊ शकतो . कारण दिवसभर त्याच्यावर धुळीचे बारीक कण किंवा अन्य जंतू त्यावर साठण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे तोच न धुता मास्क तसाच वापरल्याने अन्य जंतूंचा शिरकाव तुमच्या शरीरारत होऊ शकतो."
हवेतून कोरोना होतो कि नाही यावर आजही विविध मतांतरे आहेत. त्यामुळे काही तज्ञ घरातही बसताना मास्क घालून बसा असे सांगत आहे. मात्र त्यावर अजूनही अभ्यास सुरु अल्याचे किंवा त्यावर अजूनही पुरावे गोळा सुरु असल्याचे वैज्ञानिकांकडून सांगितले जात आहे. जगभरात या विषयावर अभ्यास सुरु आहे. मात्र मास्क बाबत अनेकवेळा माहिती दिली जात असताना काही जण शहरी आणि ग्रामीण भागात अजिबात नका ना लावता बिनभोभाट फिरत आहेत. या अशा या फाजील आत्मविश्वासामुळे हे 'टगे' स्वतः अडचणीत तर येतीलच परंतु दुसऱ्यांनाही अडचणीत टाकतील. त्यामुळे कुणीही कोरोनाच्या सुरक्षिततेच्या नियमांना हलक्यात घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'
- BLOG | संपता संपेना... कोरोनाकाळ
- BLOG | कोरोनाची वक्रदृष्टी पुरुषांवर अधिक!
- BLOG | व्यर्थ न हो बलिदान...!
- BLOG | कही खुशी... कही गम