>> संतोष आंधळे


राज्यात काही ठिकाणी या कोरोना काळात आनंदवार्ता मिळत आहे तर काही ठिकाणी धडकी भरेल अशा बातम्या येत आहेत. कोरोनाचं भविष्य वर्तविण्याचं ज्यांनी आतापर्यंत धाडस दाखवलं अशा सर्व जणांचे दावे फोल ठरवण्यात कोरोना यशस्वी ठरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून कोरोनाची रुग्णसंख्या सर्वात जास्त असणाऱ्या मुंबईची तब्बेत हळू-हळू सुधारत असली तरी मुंबई शहराला जोडून असणाऱ्या ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील परिस्थिती म्हणावी तशी समाधानक नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांवर लक्ष केंद्रीत केले तर लक्षात येईल की सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईपेक्षा ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील रुग्णांचीच अधिक आहे. त्यामुळे राज्यातील एक शहराची स्थिती सुधारत असताना दुसऱ्या शहराची स्थिती खराब होत असल्याचे दिसत असले तरी अधिकाधिक चाचण्या करून रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून काढणे या मोहिमेवर भर देण्याची गरज आहे. सुरुवातीला यामुळे रुग्णसंख्या जास्त वाढत असली तरी या मोहिमेचे निकाल नंतर पाहण्यास मिळत असल्याचे मुंबईतील घनदाट वस्ती असणारी 'धारावी आणि वरळी कोळीवाडा' या कोरोनामुक्तीच्या मार्गवर असणाऱ्या परिसरातील आटोक्यात येणाऱ्या रुग्णसंख्येवरुन दिसून येते.


आपल्याकडे अनेकवेळा कोरोना या विषयाला शास्त्रीय नजरेतून बघण्यापेक्षा राजकीय दृष्टीकोनातून बघितलं जात आणि त्याच विषयवार चर्चा केंद्रीत करून मूळ सामान्य रुग्णाचे प्रश्न बाजूला पडतात. कोरोनाचं भविष्य सांगणारा ज्योतिषी अजून जन्माला यायचाय, कुणीही याच्या भवितव्याबाबत अचूक अंदाज बांधू शकलेला नाही. रुग्णांची संख्या कमी करायची असेल तर त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे आहे, त्याचं खरं श्रेय जाते ते 'संवादाला' आपल्याकडे जनतेने आणि प्रशासनात हवा तसा संवाद होताना दिसत नाही. एखादी प्रतिबंधात्मक धोरण आपण जर हाती घेत असू की ज्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होऊ शकते, तर त्याआधी नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे. नागरिकांच्या सहभागाशिवाय कोरोनाला आटोक्यात आणणे शक्य नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे कोरोनासारखा अतिगंभीर विषय हा राजकारणाचा विषय न करता सगळ्यांनी मिळून एकत्रिरीत्या येऊन याकरिता काम करणे गरजेचे आहे.


राज्यात विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर गरज आणि परिस्थिती पाहून लॉकडाउन करण्यात येत आहे, काही ठिकाणी लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. केरळमध्ये मे महिन्यात एक दिवस असा होता की संपूर्ण राज्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. आता मात्र हजारोच्या संख्यने तेथे रुग्ण सापडले असून, त्यांच्या एक जिल्ह्यात दोन गावात इतके रुग्ण सापडले की त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्या दोन गावात समूह संसर्ग झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे या कोरोना काळात कधी कुठल्या परिसरातील रुग्ण वाढतील आणि कुठल्या परिसरातील कमी होतील ते सांगणे मुश्कील आहे. या सगळ्या प्रक्रियेतून एक दिसून आले आहे की रुग्णसंख्या आटोक्यात राहावी म्हणून सातत्याने प्रयत्न करणे हे आरोग्य व्यवस्थेला चालूच ठेवावे लागणार आहे. जराशी ढिलाई दिली तरी रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ठाणे आणि पुणे दोन जिल्ह्यात नुकताच कडक लॉकडाउन पाळण्यात आला आहे. आरोग्य यंत्रण जितके नवीन रुग्ण निर्माण होता आहे त्यांना उपचार देण्याचे काम करत असून त्या रुग्णांना बरे करण्यातही डॉक्टरांना चांगले यश येत आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर 'नागरिकांनी' महत्वपूर्ण योगदान देणे गरजेचे आहे. लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळण्यावाचून गत्यंतर नाही.


कुणीही कितीही काही म्हटलं तरी संपूर्ण भारतात कोरोनाबाधितची रुग्ण संख्या जास्त असलेल्या मुंबईने रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेलं आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर ते प्रयत्न कायम चालूच ठेवावे लागतील. राज्यात सध्या मुंबई शहरात 23 हजार 704 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र मुबंईला प्रथमच ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांनी मागे टाकले आहे. ठाणे जिल्ह्यात 36 हजार 219 रुग्ण तर पुणे जिल्ह्यात 36 हजार 810 रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबई जिल्ह्यात एकूण 1 लाख 3 हजार 368 बाधित रुग्णांची संख्या जास्त असली तरी बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण तेवढ्याच अधिक प्रमाणात आहे. आतापर्यंत मुंबईत 73 हजार 555 रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. त्याचवेळी हे सुद्धा मान्य करावे लागेल की, ज्या तोडीने आरोग्य व्यवस्था मुंबई संहारासाठी उभारली गेली आहे त्या पद्धतीची आरोग्य व्यवस्था राज्यात अन्य कुठेच पहिला मिळत नाही. मुंबई शहरात अत्याधुनिक खासगी रुग्णालयांची संख्या जास्त असून त्याच्या जोडील महापालिकेची 4 वैद्यकीय महाविद्यलये असलेली रुग्णालये तसेच राज्य शासनाची 4 रुग्णालये मुंबईमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोरोना काळात आरोग्याच्या सुविधा वाढवण्याकरिता राज्याच्या इतर भागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.


ज्यापद्धतीने मुंबई शहरात फिल्ड हॉस्पिटल उभारली गेली आहे, काही प्रमाणात ऑक्सिजन बेड्स आणि अतिदक्षता विभागाच्या खाटाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तशाच स्वरूपाच्या सुविधा राज्याच्या अन्य विभागात करणे अपेक्षित आहे. पुणे, ठाणे, नाशिक,औरंगाबाद, नागपूर आणि रायगड तसे राज्यातील मुख्य जिल्हे आहेत. बहुतांश जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहे, मोठं मोठे कारखाने आहेत. मात्र त्या तुलनेत आरोग्य सुविधा कमी असल्याचे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवरून दिसत आहे. एकंदरच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं सबलीकरण करण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण साथीच्या आजाराच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच प्रथम हा प्रश्न हाताळत असते. त्यामुळे ही यंत्रणा सक्षम असणे काळाची गरज आहे. आजही अनेक सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अनके समस्या आहेत ज्याचं निराकरण गेली अनेक वर्षे झालेले नाही. मात्र या कोरोनाच्या या परिस्थितीवरून राज्य शासनाने आणि प्रशासनाने धडा घेण्याची गरज आहे आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी बळकट करता यावर विस्तृत आराखडा बनवणे गरजेचे आहे.


मुंबई शहरातील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने 'चेस द व्हायरस' आणि 'मिशन झिरो' सारख्या महत्वपूर्ण योजना राबवून रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यावर भर दिला आहे. अशाच पद्धतीने इतर शहरातील महापालिकांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी या शहरातील काही मॉडेलचा अभ्यास करून त्या शहरात किंवा जिल्ह्यात काही उपाय योजना करता येतील का याचा विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये सध्या धारावी आणि वरळी कोळीवाडा येथील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला चांगल्या प्रमाणात यश आलेले आहे. मात्र मुंबई म्हणजे राज्य नव्हे हे लक्षात ठेवून राज्यातील इतर भागात आरोग्याच्या व्यव्यस्था पोहचवून तेथील रुग्णसंख्या कशी आटोक्यात ठेवण्यात येईल यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा कायम, कही खुशी... कही गम अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग