(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | ...तरंच शरद पवारांचा पिंपरी चिंचवड दौरा सार्थकी ठरेल!
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरुये, परिणामी कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ पसरली आहे. म्हणूनच शहरातील पक्षाला एकजूट करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी, दस्तुरखुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीच लक्ष घातलं. यासाठी त्यांनी 16 आणि 17 ऑक्टोबर असा दोन दिवसांचा शहराचा दौरा केला. यात शनिवारी म्हणजे पहिल्या दिवशी आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. तर रविवारी सायंकाळी पवार साहेबांनी स्वतः कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. पक्षातील अंतर्गत गटबाजी मिटविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्यासाठी पवारांना लक्ष घालायला लागणं हे नक्कीच खेदाचे आहे. पण पिंपरी चिंचड राष्ट्रवादीमधील पक्षांतर्गत सावळा-गोंधळ दूर करण्यासाठी स्वतः पवारांना का लक्ष घालावं लागलं आणि त्यांनी हा दौरा केला म्हणून महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल का? असे प्रश्न साहजिकच यामुळे उपस्थित झालेत.
बारामती नंतर पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. म्हणूनच 2002 ते 2017 अशी सलग पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने इथं एकहाती सत्ता राखली. राष्ट्रवादीचा इथं दबदबा निर्माण करण्यात सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं योगदान आहे. त्यांनी शहराचं पालकत्व स्वीकारलं आणि काही कठोर अन तातडीचे निर्णय घेतले. म्हणूनच पिंपरी चिंचवडचा अक्षरशः कायापालट झाला, हे कोणी नाकारू नये किंबहुना नाकारून चालणार ही नाही. पण 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि इतिहासात पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीने शहराची देशात विकासाची नगरी अशी ओळख बनवली असताना जनतेने राष्ट्रवादीला नाकारलं. यामागे स्थानिक नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार आणि भाजपशी केलेला घरोबा या बाबी देखील पराभवाला कारणीभूत ठरल्या. पण ही सल अजित पवारांना आज ही कायम आहे, ती त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून ही दाखवली आणि ते पुढची दोन वर्षे तरी शहराकडे फारसे फिरकलेच नाहीत. पण अशात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं अन दादांचे पुत्र पार्थ पवार अनपेक्षितपणे मैदानात उतरले. मावळ लोकसभेतून पार्थने उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघात पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. महापालिका निवडणुकीत जरी शहराने भाजपला कौल दिला असला तरी लोकसभेत शहरवासीय आपल्या मुलाला मताधिक्य देतील अशी भाबडी अपेक्षा दादांना लागून होती. पण पार्थ पवारांचा स्वभाव म्हणा की, स्थानिक नेत्यांनी पार्थना निवडून आणण्यासाठीचा केलेला ढोंगीपणा म्हणा, हे पाहून शहरवासीयांनी पार्थना दिल्लीला न पाठविण्याचा निर्णय घेतला. किमान माझा मुलगा आहे म्हणून तरी स्थानिक नेते झोकून प्रचार करतील असं दादांना वाटत होतं पण यावेळी ही अनेकांनी त्यांचा भ्रमनिरास केला. आधीच महापालिका निवडणुकीची सल आणि त्यात लोकसभेत पार्थचा झालेला दारुण पराभव दादांच्या भलताच जिव्हारी लागला. मग तर काय आधी मुंबई वरून पुण्याला जाताना पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या दादांनी शहरात येणं जाणीवपूर्वक टाळलंच. आता ही दादा पुणे शहरात प्रत्येक शुक्रवारी बैठकीला येतात पण पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीला काही वेळ देत नाहीत. किंबहुना 2017 महापालिका निवडणूक आणि 2019 लोकसभा निवडणुकीत पराभवाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या स्थानिक नेत्यांना कोणत्या तोंडाने दादाला शहरात बोलवायचं असा प्रश्न आज ही पडतोच. म्हणूनच की काय पक्षविरहित कार्यक्रमांसाठी अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये आल्याचं अनेकदा पहायला मिळतं.
2022 च्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकारण तापलंय. म्हणूनच पिंपरी चिंचवड महापालिकेची भाजपकडे असलेली सत्ता पुन्हा काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे आहेत. पण या मनसुब्यांना स्थानिक पातळीवरील गटबाजी सुरुंग लावत आहे. माजी विरुद्ध आजी नगरसेवक विरुद्ध पदाधिकारी असा काहीसा अंतर्गत संघर्ष सध्या शहर राष्ट्रवादीत सुरुय आहे. तसेच राष्ट्रवादीचे काही जण भाजपसोबत आर्थिक गणितं साधत असल्याची ही जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच स्थानिक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करा अशी मागणी जोर धरून आहे. महापालिका निवडणुकींची घोषणा होण्यापूर्वी हा सावळा गोंधळ मिटवणे राष्ट्रवादीच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. यासाठी जो तो स्वतःची बाजू घेऊन अजित दादांपर्यंत जाऊन ही आलाय. पण दादा अद्याप ही या नेत्यांना पूर्वीसारखा 'भाव' देईनात. म्हणून या मंडळींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना साकडं घातलं, पण त्यांनी ही अजित दादांच्या कोर्टात चेंडू टाकला. त्यामुळं स्थानिक नेत्यांची चांगलीच गोची झाली. मग शेवटी पर्याय उरला तो पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांचा. विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आणि माजी नगरसेवकांचे प्रतिनिधी पवार साहेबांना भेटले. तुमच्यापर्यंत आम्हाला का यावं लागलं हे सांगतानाच, स्थानिक पदाधिकारी कसे निष्क्रिय आहेत, इथं पासून ते ठेकेदारी पर्यंतचा इत्यंभूत वृत्तांत त्यांनी दिला. 'त' म्हणता ताक ओळखणाऱ्या साहेबांना पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीतील सावळा-गोंधळ पाहून, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली असणार हे ही लक्षात आलं. म्हणूनच त्यांनी दोन दिवसांचा दौरा आखला.
शरद पवारांनी वेळ देताना आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा स्वतंत्र वेळा दिल्या. 16 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी पवार साहेबानी आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवली. तत्पूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि पिंपरी चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीचं धोरण हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन नेते ठरवतील, असं स्पष्ट केलं. मगच ते बैठकीच्या ठिकाणी पोहचले. जयंत पाटील हे अजित दादांच्या निर्णयांना डावलत नाहीत याची कल्पना स्थानिक नेत्यांना आधीच आलेली आहे. त्यामुळं काही झालं तरी इथले सगळे निर्णय अजित दादाच घेणार, हे बैठकीपूर्वीच स्थानिक नेत्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळं बैठकीत दादा शहराकडे दुर्लक्ष करतायेत असं तक्रार वजा मत देखील साहेबांसमोर व्यक्त करणं चुकीचं ठरणार होतं. म्हणूनच तो मुद्दा वगळून आधी माजी नगरसेवक मग आजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. चार-पाच तास चाललेल्या या बैठकीचा सूर क्षणार्धात समोर आला. आजी नगरसेवक माजींना हुंगून ही विचारत नाहीत. पदाधिकारी पक्षाचे निरोप कळविताना काहींना जाणीवपूर्वक डावलतात. आपलेच काही महाभाग भाजपचे 'लाभार्थी' झालेत. गावकी-भावकीच्या राजकारणात आपलेच विरोधकांचं काम करतात. असे आरोप काहींनी केले. तर काहींनी मी स्वतःच कसा खरा हे पटवून देण्यासाठी टेंभा मिरवला. साहेबांनी सर्वांचं ऐकून घेतलं अन् माजींचा आदर राखा, अशी सूचना करताना काहींचे मात्र कान चांगलेच शेकले.
आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना एकजूट केल्यावर पवारांनी दुसरा दिवस कार्यकर्त्यांसाठी दिला होता. 17 ऑक्टोबरच्या सायंकाळी स्वतः शरद पवार कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी पोहचले. गटबाजी, धुसफूस यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा असा एकमेव हेतू पवार साहेबांचा होता. पण त्यांची मार्गदर्शन करण्याची वेळ आली तेव्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कहर केला. पवार साहेबांसमोर स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचाच गौरव करवून घेण्याचं ठरवलं. तेंव्हा मात्र साहेब संतापले, सन्मानाची यादी संपता संपेना त्यामुळं ते खुर्चीवरून उठले अन माईक समोर जाऊन उभे राहिले. तरी निवेदक थांबायचं काय नाव घेईना, शेवटी साहेबांना आता बास झालं, अशी म्हणायची वेळ आली. या घोळात काही पक्षप्रवेश घ्यायचे होते ते मात्र राहून गेले. काल झालेल्या बैठकीतून पदाधिकाऱ्यांनी काही घेतलं नसल्याचं यावरून साहेबांच्या लक्षात आलं असावंच. अखेर साहेबांनी मार्गदर्शनाला सुरुवात केली. देशावर भाजपद्वारे संकट आलंय आणि यातून सर्वांना मुक्त करायचंय. त्यामुळं आधी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अन मग केंद्राच्या सत्तेतून भाजपला पायउतार करा. हे सांगतानाच महाराष्ट्र दौरा करून केंद्राची चुकीची धोरणं जनतेसमोर मांडणार असं म्हणत साहेबांनी रणशिंग फुंकलं. आता या वयात स्वतः साहेब मैदानात उतरलेत म्हट्लायवर कार्यकर्ते मागे कसे हटणार. साहेबांनी दिलेला हा कानमंत्र घेऊन येत्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी केला.
शरद पवारांनी या दोन दिवसीय दौऱ्यात मतदारांना सत्ता परिवर्तनाची साद घातली. तसेच पक्षात गटबाजी, धुसफूस अन आर्थिक लाभ घेणाऱ्यांना शेलक्या शब्दात ही सुनावलं. प्रत्यक्षात त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही, पण म्हणतात ना "समजनेवालो को इशारा काफी होता है". तसा इशारा ज्याला द्यायचा त्याला साहेबांनी दिलाय. त्यामुळं 'तो मी नव्हेच" अशा आविर्भावात ते नेते यापुढे राहणार नाहीत. असं अपेक्षित आहे. अन् असं झालं तरंच शरद पवारांच्या या दोन दिवसीय दौऱ्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. शिवाय साहेब येऊन गेले म्हणून आता मतदार राष्ट्रवादीला मतदान करतील अन सत्ता ही मिळवून देतील. अशा गोड गैरसमजात ही मुळीच राहू नये. त्यासाठी स्थानिक नेत्यांनी मतदारांना गृहीत न धरता, त्यांच्यापर्यंत पोहचायलाच हवं. अन सर्वात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित दादांनी आता नाराजी सोडून शहरात यायला हवं. तर आणि तरंच पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकेल अन् बालेकिल्ल्याची ओळख ही अभेद्य राहील.