BLOG : एकांकिका करणाऱ्यांचा स्ट्रगल वेगळाच, त्यांना प्रोत्साहन नको का?
अरे आवाज कुणाचा...करंडक कोणाचा? येऊन येऊन येणार कोण..? अशा विद्यार्थ्यांच्या जल्लोषमय वातावरणात एकांकिका स्पर्धा दरवर्षी होत असतात. पण गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत. पण यावर्षी पुन्हा एकदा एकांकिका स्पर्धांना सुरुवात झाली आहे. नुकत्याच 'पुरुषोत्तम करंडक' आणि 'आयएनटी' या मानाच्या स्पर्धा पार पडल्या आहेत.
महाविद्यालयीन नाट्यप्रेमी विद्यार्थ्यांसाठी रंगभूमी म्हणजे एकांकिका स्पर्धा. एकांकिका स्पर्धांमुळे विद्यार्थी नाटकाशी जोडले जातात. सध्या पुण्याची 'पुरुषोत्तम करंडक' ही एकांकिका स्पर्धा एका ऐतिहासिक निर्णयामुळे चर्चेत आहे. 'पुरुषोत्तम करंडक'चा परीक्षकांनी घेतलेला निर्णय एक एकांकिकेची माजी स्पर्धक म्हणून मला तरी पटलेला नाही.
'पुरुषोत्तम करंडक' ही स्पर्धा म्हणजे ऑस्कर नव्हे. एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्यापासूनच विद्यार्थ्यांची कसरत सुरू होते. आजही नाटक, सिनेमा म्हणजे वाईट धंदा असं समजणारा एक वर्ग आहे. त्यामुळे घरच्यांची परवानगी मिळवायची. जर परवानगी मिळाली नाही तर त्यांना खोटी कारणं सांगून एकांकिकेत काम करायचं. कॉलेजचा अभ्यास, लेक्चरला बंक मारून नाटकाची तालीम करायची, दिवसरात्र एकांकिकेच्या संहितेचा अभ्यास करायचा, कॉलेजच्या सिनिअर्स मंडळींसोबत चर्चा करायची असा हा एकांकिका जगण्याचा प्रवास महाविद्यालयीन नाट्यवेडी तरुणमंडळी करत असतात.
एकांकिका ही अनेकांना सोपी गोष्ट वाटते. पण तसं नसतं. एकांकिका करताना विद्यार्थ्यांची निवड करणं. एकांकिकेच्या तालमीसाठी जागा बघणं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे बजेट. आणि इथूनच खरं रडगाणं सुरू होतं. कारण विद्यार्थींनी ठरवलेलं बजेट त्यांना कधीच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी एक वडा पाव खाऊन, इकडून-तिकडून पैसे मिळवून कशी-बशी एकांकिका उभी करतात.
अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर, घेतलेल्या मेहनतीला फळ मिळत नसेल तर मग त्या कष्टाचा काय उपयोग? एकांकिकेत काम करायचंय म्हणून घरच्यांशी अबोला धरलेल्या मंडळींपासून ते एकांकिकेने आयुष्य बदलेल्या अनेकांचा प्रवास मी जवळून अनुभवला आहे. अनेक नामांकित मंडळींचा प्रवास एकांकिकेपासूनच सुरू झाला आहे.
एकांकिका स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी हे कलाकार नसून विद्यार्थी आहेत. त्यामुळे ते करत असलेली एकांकिका ही व्याससायिक नसून प्रायोगिक आहे. त्यामुळे एकांकिकेच्या प्रयोगाला 'प्रयोग' म्हटलं जातं. म्हणूनच परीक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांच्या कलेला, प्रयोगाला समजून घेऊन त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे.
असं म्हणतात की, एक एकांकिका करुन विद्यार्थाला वाटतं की आपण कलाकार झालो आणि तो मालिकांकडे वळतो. पण असे काही निम्मे विद्यार्थी आहेत. खरंतर एकांकिका केल्यानंतर मालिकेत मुख्य भूमिका मिळालेली सोडलेले मी 'अनेकजण' पाहिलेत. या विद्यार्थांना फक्त एकांकिका महत्त्वाची वाटते. त्यांचा आनंद एकांकिका, नाटकातच असतो. मग अशा विद्यार्थांना प्रोत्साहन द्यायला हवं की नको..?
संबंधित बातम्या