BLOG | 20 वर्षात कसा बदलला बॉलिवुडचा चेहरा-मोहरा
बॉलिवुडमध्येही या 20 वर्षात खूप बदल घडले असून या कालावधीतच बॉलिवुडला क्रिशच्या रुपाने पहिला सुपरहीरो मिळाला तर अनेक नव्या नायक, नायिकांनी रुपेरी पडदा गाजवत चित्रपट तरुण केला. नेपोटिझमचीही चर्चा झाली आणि कोरोनाने ओटीटी प्लॅटफॉर्मलाही सशक्त बनवण्यास मदत केली. बॉलिवुडच्या या 20 वर्षांवर धावती नजर-
नव्या शतकाचा आरंभ होऊन आता लवकरच 20 वर्ष पूर्ण होतील. बॉलिवुड नेहमी नवनवीन प्रयोग करीत असतो. नवीन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक येत असतात. नवी पिढी आपापल्या पद्धतीने चित्रपटसृष्टीची सेवा करीत असते. 20 वर्ष हा फार मोठा कालावधी असतो. यात अनेक जण कधी येतात आणि कधी जातात ते कळत नाही. बॉलिवुडमध्येही या 20 वर्षात खूप बदल घडले असून या कालावधीतच बॉलिवुडला क्रिशच्या रुपाने पहिला सुपरहीरो मिळाला तर अनेक नव्या नायक, नायिकांनी रुपेरी पडदा गाजवत चित्रपट तरुण केला. नेपोटिझमचीही चर्चा झाली आणि कोरोनाने ओटीटी प्लॅटफॉर्मलाही सशक्त बनवण्यास मदत केली. बॉलिवुडच्या या 20 वर्षांवर धावती नजर-
सगळ्यात आधी पाहूया इंटरनेटने आणलेल्या क्रांतीकडे. सुरुवातीला चित्रपट फक्त चित्रपटगृहातच जाऊन पहावा लागे. पण इंटरनेटने मनोरंजन घरातच उपलब्ध करून दिले. इंटरनेटकडे फक्त माहितीचे आदान प्रदान करण्याचे, ईमेल पाठवण्याचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले होते. परंतु इंटरनेटची ताकद आणि व्याप्ती पाहाता बॉलिवुडमधील काही कंपन्यांना यात उद्योग दिसला. त्यांनी आपले सर्व चित्रपट यूट्यूबवर टाकले. 1940 पासूनचे चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध करुन देण्यात आले असून निर्माते, वितरक यापासून चांगला पैसा कमवू लागले आहेत. एका कंपनीने दक्षिण भारतीय भाषेतील चित्रपट हिंदीत डब करून यूट्यूबवर टाकले आणि त्यातून कोट्यावधी रुपये कमवले. हेच चित्रपट विविध चित्रपट वाहिन्यांवरही दाखवण्यास सुरुवात झाली आणि प्रेक्षकांना दक्षिणेतील हाणामारीच्या चित्रपटांचा आस्वाद घेता आला.
याच कालावधीत नेटफ्लिक्सने ऑनलाईन चित्रपट दाखवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. आज जगभरात नेटफ्लिक्सचे कोट्यावधी सदस्य असून कंपनी चित्रपट निर्मितीतही उतरली असून अनेक तयार झालेले चित्रपट विकत घेण्यासही सुरुवात केली आहे. आज नेटफ्लिक्सकडे जगभरातील चित्रपट आणि मालिकांचे प्रचंड जाळे आहे. या यादीत अमेझॉनही असून त्यांनीही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची ताकद बघून झी, सोनी, स्टार यांनीही यात उडी घेऊन चित्रपट, मालिका दाखवण्यास सुरुवात केली आहे. आता तर मोबाईलवरही चित्रपट पाहता येऊ लागला आहे. मात्र यासाठी सगळ्यात महत्वाचे कारण ठरले आहे रिलायन्स जिओ. जिओने अत्यंत कमी दरात भारतीय नागरिकांना इंटरनेट उपलब्ध करून दिले आणि प्रत्येक मोबाईल हा स्मार्ट झाला. फक्त स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध असलेले कंटेट प्रेक्षक घरी-दारी, प्रवासात सगळीकडे पाहू लागला. एवढेच नव्हे तर त्याला यामुळे जगभरातील चित्रपट, लघुपट आणि वेबसीरीजचा आस्वाद घेण्याची संधी मिळू लागली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे स्मार्ट टीव्हीचा खप तर वाढलाच, मोबाईलही स्मार्ट झाला आणि खपाच्या उड्या कोट्यावधीवर गेल्या. जिओमुळेच अन्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनाही स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी इंटरनेटचे दर कमी करावे लागले आहेत.
याच इंटरनेटचा वापर करून यूएफओच्या संजय गायकवाड यांनी निर्मात्याचा रिळांचा खर्चच संपवून टाकला. इंटरनेटच्या माध्यमातून एकाच वेळी हजारो चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी यूएफओनं निर्मात्यांना दिली. त्यामुळे निर्मात्याचा रिळांवर होणारा खर्च वाचला आणि एकाच वेळी चांदा ते बांदा चित्रपट प्रदर्शित होऊ लागला आणि चित्रपट पाहाण्यासाठी अनेक महिने वाट पाहणाऱ्या दूरदूरच्या भागातील प्रेक्षकांना पहिल्या दिवशी पहिला शो पाहाण्याची संधी मिळू लागली. केवळ चांदा ते बांदाच नव्हे तर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये यूएफओने एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी निर्मात्यांना दिली.
यामुळे या दशकात आणखी एक गोष्ट झाली आणि ती म्हणजे, सिल्व्हर ज्युबली, गोल्डन ज्युबली आणि डायमंड ज्युबलीचे युग संपले आणि तीन दिवसांचे युग सुरु झाले. यूएफओमुळे एकाच वेळेस हजारो चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होऊ लागल्याने 25, 50 आणि 75 आठवड्यात गोळा होणारा बॉक्स ऑफिस गल्ला तीन दिवसात गोळा होऊ लागला. केवळ तीन दिवसात चित्रपट पाचशे ते सातशे कोटींचा गल्ला गोळा करू लागला. एवढेच नव्हे तर चांगला चित्रपट काही दिवसातच हजार, दीड हजार कोटींचाही पल्ला गाठू लागला.
इंटरनेट क्रांतीने या 20 वर्षात जसा आमूलाग्र बदल एंटरटेनमेंटच्या क्षेत्रात घडवला तसाच तो चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही घडवला. चित्रपटांचा विचार केला तर पूर्वी चित्रपट एका फॉर्म्युल्यावरच बनत असत. आई-बापाच्या हत्येचा बदला, फाईट, कॉमेडी, सुंदर नायिका, परदेशात चित्रित केली जाणारी गाणी असा ठरलेला फॉर्म्युला होता. मात्र गेल्या 20 वर्षात फॉर्म्युल्याबाहेर जात मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होऊ लागली. गेल्या काही काळात तर चित्रपटातून गाणीही गायब झाल्याचे दिसून आले. इंटरनेटमुळे प्रेक्षकांना जगभरातील उत्तमोत्तम सिनेमे घरबसल्या पाहायला मिळू लागल्याने निर्मात्यांना स्वतःला बदलावे लागले आहे. त्यामुळेच गेल्या 20 वर्षात चित्रपटांनी खरोखर कात टाकली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
90 च्या दशकातील आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगन आजही यशस्वी असले तरी यापैकी कोणाही एकाला सुपरस्टार मानता येणार नाही. याचे कारण गेल्या 20 वर्षात ऋतिक रोशनपासून रणबीर कपूर, रणवीर सिंह, शाहीद कपूर असे अनेक नवे नायक हिट चित्रपट देऊ लागले आहेत. त्यामुळे आज कुठल्याही एका नायकाला सुपरस्टार म्हणता येणार नाही. वेगळ्या पठडीच्या चित्रपटात आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी. राजकुमार राव, इरफान खान ही स्टार झाले असून आर्टिकल 15, बाला, बधाई हो, अंधाधुन, स्त्री, शाहिद, बर्फी, जग्गा जासूस असे वेगळे चित्रपट येऊ लागले आहेत. आज कंटेटवर आधारित चित्रपट तयार होऊ लागलेत आणि गेल्या 20 वर्षात बॉलिवुडने हेच यश मिळवले आहे.
2000 पूर्वी नायिकाधान चित्रपट फार कमी बनत असत. परंतु गेल्या 20 वर्षात नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या प्रचंड वाढलेली दिसून येते. कंगना रनौत, दीपिका पादुकोण, करीना कपूर, प्रियंका चोपड़ा आलिया भट्ट, विद्या बालन अशा काही नायिका आहेत ज्यांच्यासाठीच चित्रपट तयार केले जाऊ लागले आहेत. तनु वेड्स मनुचे दोन भाग, राजी, नीरजा, कहानी, तुम्हारी सुलु, इश्किया, बेगम जान, नो वन किल्ड जेसिका, मर्दानी, वीरे दी वेडिंग, सात खून माफ हे काही उल्लेखनीय नायिकाप्रधान चित्रपट.
वेगळ्या विषयावरच्या चित्रपटासोबतच गेल्या 20 वर्षात बायोपिकही मोठ्या प्रमाणावर तयार झाले. आनंद कुमारसारख्या एका सामान्य माणसाच्या जीवनावर कधी चित्रपट तयार होईल असे कोणालाही वाटले नसते. पण सुपर 30 तयार झाला. विशेष म्हणजे ऋतिकने आनंद कुमारची भूमिका साकारली. शकुंतला देवीच्या जीवनावर शकुंतलाही तयार झाला ज्यात विद्या बालनने शकुंतला देवीची भूमिका साकारली होती. 20 वर्षांपूर्वी असा विचार कोणीही केला नसता. सरबजीत, नेताजी सुभाष चंद्र बोस- द फॉरगॉटन हीरो, पान सिंह तोमर, मांझी द माउंटनमैन, नीरजा, रंग रसिया, पॅडमॅन, अलीगढ़सोबत मेरीकॉम, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरीज, बुधिया सिंह बोर्न टू रन, चक दे इंडिया असेही चित्रपटही तयार झाले. यासोबतच विकी डोनर, मद्रास कॅफे, इंग्लिश विंग्लिश, पान सिंह तोमर, गैंग ऑफ वासेपुर, लंच बॉक्स, क्वीन, हैदर, पीकू, पिंक, मसान, एनएच 10, उड़ान, नील बटे सन्नाटा, न्यूटन असेही चित्रपट तयार झाले ज्याचा 20 वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसता. एकूणच गेल्या 20 वर्षात बॉलिवुडने कात टाकली असून त्याचे हे नवे रुप इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नक्कीच घेऊन जाईल यात शंका नाही.