अभिनयाचा ‘सम्राट अशोक’
BLOG : विनोदाचं भन्नाट टायमिंग, शब्दांसोबतच चेहऱ्याने बोलत समोरच्याच्या हृदयात उतरण्याचं अफलातून कौशल्य आणि पडद्यावर किंवा रंगमंचावर एन्ट्री घेताच तो व्यापून टाकण्याची हातोटी या सर्वांची जमलेली उत्तम भट्टी म्हणजे अशोक सराफ, अर्थात असंख्य रसिकांचे लाडके ‘अशोकमामा’. हा अभिनयसम्राट आज वयाची 75 वर्ष पूर्ण करतोय.
रंगमंच, सिनेमाचा पडदा आणि टेलिव्हिजनचा स्क्रीन तिन्हींमधली त्यांची बॅटिंग आपण गेली पाच दशकं अनुभवतोय. म्हणजे आमच्या पिढीने ‘हमीदाबाईची कोठी’मधला त्यांचा रोल पाहिलेला नाही. किंबहुना त्यांचं त्या काळातलं नाटकातलं काम पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं नाही. पण, ‘व्हॅक्यूम क्लीनर’ आमची पिढी पाहतेय.
‘हमीदाबाईची कोठी’बद्दल अशोकमामांनी आमच्या चॅनलच्या ‘चॅट कॉर्नर’मध्ये सांगितलं होतं, त्या रोलने मला माझ्या आतल्या सुप्त कौशल्यांची जाणीव करुन दिली. विजयाबाई तुम्हाला हे असं कर, ते तसं कर असं कधीही सांगत नाहीत. तर, अभिनेत्याकडून त्याच्यातलं बेस्ट नेमकं काय काढून घ्यायचं हे विजयाबाईंना पक्क ठाऊक. माझ्याबाबतीत तसंच झालं.
रंगमंचावर अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या अशोक सराफांच्या कारकीर्दीतील माईल स्टोन चित्रपट अर्थात ‘पांडू हवालदार’. ‘पांडू हवालदार’मध्ये दादा कोंडके नावाचा टायमिंगचा बादशहा त्यांच्यासमोर होता. सखाराम हवालदारच्या या रोलबद्दल अशोक सराफ म्हणतात, हा रोल आणि आमची जोडी हिट ठरण्याचं कारण म्हणजे त्यांचं आणि माझं टायमिंग, गिव्ह अँड टेक परफेक्ट जुळलं.
याच अशोक सराफांनी पुढे आपल्या अभिनयाच्या पक्वानांनी भरलेल्या अनेक रुचकर थाळ्या मग आपल्यासमोर वाढल्या. आपण भरपूर जेवलो तरीही पोट कधी भरलंच नाही. उलट आपली भूक त्यांनी वाढवलीच. त्यांच्या किती रोलबद्दल बोलायचं आणि काय काय लिहायचं?
‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘गंमत जंमत’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘धुमधडाका’ नावं तरी किती घ्यायची?
‘गुपचुप गुपचुप’मधील प्रोफेसर धोंड यांची पँट वर करत टिपिकल हेल काढत बोलण्याची स्टाईल, ‘धुमधडाका’मधील वॅख्खॅ विख्खी, ‘बनवाबनवी’मधला धनंजय माने, ‘लपंडाव’मधलं ‘बाकी सगळे गुण आहेत’वालं वाक्य, ‘नवरी मिळे नवऱ्याला’मधली वेगळी शैली असे अगणित रोल्स मनावर कोरले गेलेत. ‘अरे संसार संसार’ सिनेमातला व्हिलन त्यांनी तितक्याच ताकदीने साकारला.
त्याच वेळी ‘भस्म’सारखा पूर्णत: वेगळा रोल यादगार ठरला. तर ‘एक डाव भुताचा’ मधील दिलीप प्रभावळकरांसोबतची त्यांची जुगलबंदी जी पुढे ‘चौकट राजा’मध्येही पाहायला मिळाली. तशीच अभिनयाची आतषबाजी आपल्याला दोन सिनेमात दिसली. यावेळी कॉम्बिनेशन होतं अशोक सराफ-विक्रम गोखले. एक सिनेमा होता ‘वजीर’ आणि दुसरा ‘कळत नकळत’. ‘वजीर’मधला कावेबाज राजकारणी. यात फक्त नजरेने अशोक सराफ जे बोलतात ते अनुभवणं म्हणजे पर्वणीच. बिटविन द लाईन्स अभिनय म्हणजे काय, याचं दर्शन या सिनेमात त्यांनी आपल्याला भरभरून घडवलंय. त्याच वेळी ‘कळत नकळत’मधला ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ म्हणत गाण्यातून भाचीचा रुसवा पळवणारा मामा आपल्याला भावतो. तसंच. ‘आपली माणसं’मधलं त्यांनी साकारलेलं आशयघन कॅरेक्टर. हे त्यांनी त्यांच्या शिरपेचात खोवलेले मखमली तुरे आहेत, ज्यांनी कधी आपल्याला दिलखुलास हसवलंय, गुदगुल्या केल्यात तर कधी डोळ्यात टचकन पाणी आणलंय. कधी एखाद्या निगेटिव्ह शेडने रागही आलाय. ‘भस्म’, ‘वजीर’सारख्या ताकदीच्या भूमिका जर त्यांना आणखी मिळाल्या असत्या तर असं त्यांच्यातल्या अभिनेत्याच्या आणखी मोठ्या रेंजचं दर्शन आपल्याला घडलं असतं.
असं असलं तरीही काळाची पावलं ओळखत अशोक सराफ यांनी टेलिव्हिजनचा पडदाही आपलासा केला. ‘हम पाँच’सारखी हिंदी मालिका टायटल साँगपासून ते अशोक सराफांसह अन्य कलाकारांच्या रिफ्रेशिंग अभिनयाने आपल्या मनाच्या कप्प्यात आजही घर करुन आहे. ‘करण-अर्जुन’, ‘कोयला’, ‘यस बॉस’सारख्या हिंदी सिनेमातल्या भूमिकाही त्यांनी गाजवल्यात.
रंगमंच, सिनेमा आणि टीव्ही मालिका या तिन्ही माध्यमांची भाषा समजून घेत, त्याची मर्मस्थानं जाणून घेत अशोक सराफ यांच्या अभिनयाचा लखलखाट तुमचं आमचं आयुष्य उजळून टाकत आलाय.
दिनकर द. पाटील, अनंत माने, राजदत्त यांच्यापासून ते समीर पाटील यांच्यापर्यंतचे दिग्दर्शक असोत किंवा मग निळू फुले, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे ते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव अशा विविध पिढ्यांमधील कलाकारांसोबत हा अभिनयाचा बादशहा काम करत राहिलाय. अभिनेत्रींमधील उषा नाईक, उषा चव्हाण, रंजना, निवेदिता, वर्षा उसगावकर, रेखा रावपासून ते सुरेखा कुडची, सारिका नवाथे अशा विविध पिढ्यांसोबत त्यांनी अदाकारी केलीय.
अभिनयाचे अनंत गगनचुंबी टॉवर बांधणाऱ्या या कलाकाराची एनर्जी, त्यांचं झपाटलेपण थक्क कऱणारं तर आहेच शिवाय चिखलवाडीतील वास्तव्याचे दिवस आठवताना ‘डाऊन टू अर्थ’ असणं हेही तुम्हा आम्हाला बरंच काही शिकवून जाणारं आहे. चिखलवाडीत सुनील गावसकर त्यांचे मित्र झाले. एकत्र अभिनयही केला आणि क्रिकेटही खेळले. चिखलवाडीच्या मातीतून दोन सम्राट निपजले. एक अभिनयाचा आणि दुसरा क्रिकेटचा.
चिखलवाडी तसंच गावसकरांशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दलही चॅट कॉर्नरमध्ये ते माझ्याशी संवाद साधताना भरभरुन बोलले होते.
अशोक सराफ हा अभिनयाचा असा अविरत प्रवाह आहे, ज्यामध्ये तुम्हाला मनसोक्त डुंबायला आवडतं, त्याच वेळी त्याच्या खोलीचा प्रचंड आवाका पाहून तुम्ही अचंबित होता. त्याच्या निखळपणातलं, सच्चेपणातलं सौंदर्य पाहून तुम्ही स्तिमित होता.
अशा या बहुआयामी कलावंताला उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि आपल्याला तृप्त करणाऱ्या आणखी असंख्य भूमिका साकारण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.