एक्स्प्लोर
जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

बाहेर जेवायला जाणं ही काहींसाठी गरज असते, पण कुटुंबात राहणाऱ्यांसाठी मात्र ती कधीतरी करण्याची चैन असते. कारण कुटुंबात आई, आजी, आजोबा, बाबा असे सगळे असतात, एकमेकांची काळजी घेत असतात. मोठ्या कुटुंबात तर किमान तीन पिढ्या एकत्र राहतात, एकत्र मजा करतात, बाहेर जातात आणि एकत्र चविष्ट पदार्थांवर तावही मारतात. अगदी याच एकत्र कुटंबपद्धतीला आणि कुटुंबातल्या लहान थोरांना सलाम कऱणारी, कुटुंब संस्था सेलिब्रेट करणारी थिम आहे ठाण्यातल्या एका शाकाहारी रेस्टॉरन्टची. ‘फॅमिली ट्री’ म्हणजेच कुटुंबवृक्ष असं या फॅमिली रेस्टॉरन्टचं नाव.
आत शिरल्यापासून इथे कुटुंबसंस्थेचं महत्त्व पटवून देणाऱ्या आकर्षक खुणा दिसत जातात. सगळ्यात आधी नजर पडते ती बसण्याच्या टेबल खुर्च्यांकडे, टेबलं साधीच पण त्यावरची टेबल मॅट मात्र खूप काही सांगून जाणारी. प्रत्येक टेबलमॅटवर एक वेगळा संदेश. एकावर लिहिलेलं ‘stay together, eat together’ तर दुसऱ्यावर लिहीलेलं.. ‘together is our favourite….place to be’.
पण या टेबलमॅट्सप्रमाणेच आकर्षक संदेश देतात त्या फॅमिली ट्रीमधल्या खुर्च्या किंवा खुर्च्यांच्या पाठी म्हणूया हवं तर. प्रत्येक खुर्चीची पाठ म्हणजे एक चित्र, पुरुषाचं किंवा महिलेचं, त्या चित्रातही महिला पुरुषांची वयं वेगवेगळी दिसतात आणि झटकन कळतं की प्रत्येक खुर्चीमागच्या चित्रातून कुटुंबातील व्यक्ती दाखवायची आहे त्यांना. आजी, आजोबा, आई, बाबा अशा सगळ्यांची हक्काची खुर्ची.
कुटुंबातल्या या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन इथल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी इच्छाच यातून व्यक्त केली जाते. बाकीची सजावटही तितकीच आकर्षक आणि या फॅमिली थिमला साजेशी. भिंतींवर दिसतात ते फ्रेम केलेले कौटुंबिक फोटो. तीन पिढ्या आनंदात उभ्या आहेत असे कितीतरी फोटो या रेस्टॉरन्टचं सौदर्य वाढवतात.
तर दुसऱ्या भिंतीवर दिसतात तितक्याच आकर्षक फ्रेममधील आरसे, अर्थातच आपल्या कुटुंबाचं प्रतिबिंब पाहण्यासाठी. त्याचबरोबर ‘होमली’ वाटावं म्हणून प्रत्येक घरात अगदी सहज दिसतील अशा घड्याळं, जुनी इस्त्री, पुस्तकांचं कपाट, जुन्या चमच्यांचा सेट अशा कितीतरी वस्तूंची ठिकठिकाणी केलेली मांडणी त्या जागेचं सौदर्य खुलवतात.
आता संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा यासाठी इतकी छान मांडणी केल्यानंतर मेन्यूकार्ड आणि त्यातला मेन्यू तरी मागे कसा राहणार?, मेन्यू कार्ड हातात येतं तेव्हा एखादा जुना फॅमिली फोटो अल्बम हातात आला आहे असाच भास होतो. कारण मेन्यूकार्डच्या मुखपृष्ठावरच एका हसऱ्या फॅमिलीचा फोटो आणि पुढे प्रत्येक पानावर डावीकडे एका छान कुटुंबाचा फोटो तर उजवीकडे पदार्थांची यादी असा क्रम. पदार्थांचं वैविध्यही आबालवृद्धांचा विचार करुनच ठरवलेलंय हे मेन्यूकार्डावर नजर मारल्याबरोबर लक्षात येतं. कारण संपूर्ण शाकाहारी असलेल्या या रेस्टॉरन्टमध्ये कॉन्टिनेन्टल, युरोपियन, एशियन आणि सरतेशेवटी इंडियन अशा सगळ्या प्रकारच्या खाद्यसंस्कृतीतील पदार्थांची रेलचेल दिसते अगदी.
तसंच या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीतील सरमिसळीतून शेफने तयार केलेल्या नव्या कोऱ्या पदार्थांचीही त्याला जोड दिलेली दिसते. म्हणून तर एकाच टेबलवर कुटुंबातील एखादी व्यक्ती चक्क दालखिचडी किंवा पुलावसारखा अगदी पारंपरिक खाताना दिसते तर त्याच टेबलवर दुसरी व्यक्ती मात्र मेक्सिकन टॅकोजची चव चाखताना दिसते. तसंच एखाद्या टेबलवर नातू आजोबांना पास्ता खाताना फोर्क कसा धरायचा हे शिकवतो असंही सुखावणारं चित्र इथे सर्रास बघायला मिळतं.
भारतीय पदार्थांमध्ये पनीरचे स्टार्टर्स, पुलाव किंवा बिर्याणीसारखे पदार्थ लोक खातातच, पण युवा पिढी इथे गर्दी करते ते इथल्या काही हटके पदार्थांसाठी, मग पाव भाजी फॉन्द्यू असो किंवा नान्झा असो किंवा पास्त्यासारखे पदार्थ असोत या सगळ्याच पदार्थांना इथे जबरदस्त डिमांड असते. शेकडो पदार्थांच्या फॅमिली ट्रीच्या मेन्यूकार्डमध्ये प्रत्येकाच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही ना काही पदार्थ आहेच, पण तरीही सगळ्यात मोठी गंमत आहे ती त्यांच्या मॉकटेल्स आणि मिल्कशेक्सच्या मेन्यूमध्ये.
एरव्ही अशा मल्टीक्युझिन अर्थात विविध खाद्यसंस्कृतीतील पदार्थांचा मेन्यू असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये मद्याव्यतिरिक्त पेयांचा मेन्यू फारच तोकडा असतो. अगदी नेहमीच्या ८-१० प्रकारांपैकी काहीतरी आपल्याला मागवावं लागतं. मग फ्रुटपंच, पिनाकोलाडा किंवा कोल्डकॉफीसारखे ड्रिंक्स आपल्या पुढ्यात येतात. पण इथे मात्र ५०–६० तरी चित्रविचित्र नावांची मॉकटेल्स आणि मिल्कशेक्स फॅमिली ट्रीच्या यादीत दिसतात. प्रत्यक्षात ऑर्डर केल्यानंतरही त्या चित्रविचित्र नावाला जागत प्रत्येक मॉकटेल अगदी हटके पद्धतीनं आपल्या पुढ्यात आणून ठेवलं जातं. त्यातलंच एक रास्पबेरी चिजकेक. नाव वाचून लालसर चिजकेकचा त्रिकोणी तुकडा आपल्या डोळ्यासमोर येतो, पण प्रत्यक्षात मात्र हा चिजकेक नावाचा पदार्थ येतो एका छोट्या बाटलीत. आणि हा चिजकेक स्ट्रॉने पिण्याचा असतो, पण चवीला मात्र हुबेहुब चिजकेकच.
तसाच एक भन्नाट प्रकार म्हणजे ‘अनारकली डिस्को चली’ नावाचं एक पेय. हे मागवल्यावर तर खरोखर लालरंगाचं मॉकटेल असलेला ग्लास एका दुसऱ्या पारदर्शक भांड्यात नाचत नाचत येतो. गारगार वाफांच्या त्या पारदर्शक भांड्यात लालचुटूक रंगाच्या पेयाचा ग्लास अक्षरश: तरंगत असतो. तो ग्लास टेबलवर आल्यावर त्याचं रुपच इतकं देखणं वाटतं की प्यावं की नाही असा क्षणभर प्रश्न पडतो. चाखल्यावर मात्र ग्लास खाली ठेवावासा वाटत नाही एवढं नक्की.
मागवलेला पदार्थ सर्व्ह करण्याची पद्धतही या रेस्टॉरन्टनी फार आकर्षक केली आहे. मग प्रत्येक मॉकटेल वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लासात येतं. तर मिल्कशेक थेट वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये. तोच प्रकार इतर पदार्थांच्या बाबतीत. त्या-त्या खाद्यसंस्कृतीला शोभतील अशा पद्धतीच्या सर्व्हिंग प्लेटसमधून आपल्यापुढे पदार्थ आणले जातात. भारतीय मेन्यूतला स्टार्टर मागवल्यास दुरुन पाहिल्यावर लाकडाच्या ओंडक्याचा तुकडा वाटावा अशा एका प्लेटमधून तो वाढला जातो तर पास्तासारखा आंतरराष्ट्रीय पदार्थ मात्र शुभ्र पांढऱ्या बोन चायनाच्या प्लेटमध्ये येतो. दाल खिचडी, बिर्याणी मात्र तांब्याचा बेस असलेल्या स्टीलच्या भांड्यातून आपल्यापर्यंत येते. पनीरची किंवा तत्सम पंजाबी भाजी सर्व्ह करायलाही आकर्षक कढयांचा वापर केला जातो.
कुटुंबसंस्थेची थिम अगदी शेवटी बिलापर्यंत आपल्याला दिसेल अशी व्यवस्था आहे. फॅमिली ट्रीची कारण जेऊन तृप्त झाल्यावर बिल मागवलं की ते बिलही एका लाकडी डब्यातून आपल्यापर्यंत येतं आणि त्या डब्यावरही फोटो असतो एका फॅमिलीचा. दिवसेंदिवस दुरावत चाललेली नाती अधिक घट्ट करण्यासाठी एखाद्या फॅमिली लंच किंवा डिनरची कल्पना खरोखर चांगली आहे, अशा फॅमिली गेट टूगेदरसाठी घरगुती वातावरण असलेलं, आंतरराष्ट्रीय पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि रेस्टॉरन्टच्या थिममधून कुटुंबमूल्य जपण्याची एकप्रकारे प्रेरणा देणारं हे ठिकाण नक्कीच आनंददायी पर्याय ठरु शकतो.
सध्या ठाणेकरांमध्ये तर फॅमिली ट्री चांगलंच लोकप्रिय झालं आहे. त्याला कारण ही हटके थिम तर आहेच पण खिशाला परवडणारे विविध पदार्थ हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. लहानांसाठी वयोमर्यादा असलेल्या आणि ज्येष्ठांना भावण्यासारखं काहीच नाही अशा रेस्टोपब आणि रेस्टोबारची सगळीकडे क्रेझ असताना सगळ्या कुटुंबानी सोबत यावं असा संदेश देणारं आणि त्यासाठी तशी वातावरण निर्मिती करणाऱ्या रेस्टॉरन्टला खरोखर एकदा तरी सहकुटुंब भेट द्यायलाच हवी.











‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :
जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची
जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास
जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’
जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती
जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू
जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस
जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’
जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार
जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !
जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
