एक्स्प्लोर

Bharat Ek Khoj : 32 वर्षांपूर्वी आलेली वेब सीरिज बघा...अख्खा भारत कळेल!

'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पंडित जवाहरलाल नेहरू लिखित ग्रंथावर आधारित ही मालिका होती. त्यामुळेच या मालिकेचे सूत्रधार स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूच दाखवण्यात आले आणि ती भूमिका स्वीकारली रोशन सेठ यांनी.

ऑफिसमध्ये नव्या दमाची फळी आली होती, त्यांना तयार करणं आणि मुख्य प्रवाहात आणणं हे नेहमीचंच काम. परिचय करून घेताना आतापर्यंत काय काम केलंय? आवडी-निवडी काय? काय काय वाचलंयस असे प्रश्न हे नेहमीचेच, म्हणजे मुलगी दाखवायचा कार्यक्रम घरी असला की जितके ऑबव्हियस प्रश्न येतात तितकेच हे पण निरर्थक असतात. पण त्यातल्या एका प्रश्नावर मात्र क्वचितच समाधानकारक उत्तर मिळतं, तो प्रश्न म्हणजे काय वाचतोयस किंवा वाचतेयस? यावर काहीच उत्तर न येणं किंवा पेपर वाचतो हे उत्तर येणं हे सद्यस्थितीत चिंताजनक असले तरी धक्कादायक मात्र नक्की नाही. म्हणूनच माझा पुढचा प्रश्न असतो आतापर्यंत काय काय पाहिलंय? मग मुलं खुलू लागतात आणि मग बोलू लागतात.

अर्थातच वेब सीरिज हे पहिलं उत्तर असतं आणि मग वेब सीरिज कोणती? या उपप्रश्नावर पोरं तुटून पडतात. मग मिर्झापूर, सेक्रेड गेम्स, गेम ऑफ थ्रोन्स, द क्राऊन अशी नावं बाहेर पडतात. अर्थात हे सगळं मनोरंजन म्हणूनच पाहिलं जातं हे सत्य आहे. एखाद्या पुस्तकातून मिळणारा बोध, पुस्तकातून भेटणारी माणसं ही वेबसीरिजमध्ये भेटतीलच असं नाही. अर्थात हे विषयांतर झालं, पण पुस्तकापासून दूर गेलेली पिढी वेब सीरिजच्या जवळ गेली आहे हे वास्तव आहे. ती पुन्हा पुस्तकाकडे वळतील की नाही याचीही शंका येते. त्यामुळे आहे ते वास्तव स्वीकारूनच या मुलांना तयार करावं लागतं.

त्यांच्याशी बोलताना 'इतिहासाची जाण आणि वर्तमानाचं भान असणं किती गरजेचं आहे' असं एक वाक्यही मी चिपकवलं आणि आपसूकच आठवण आली. एका 32 वर्षांपूर्वीच्या मालिकेची, तेव्हाची वेब सीरिजच म्हणा ना! ही सीरिज होती...

भारत एक खोज

"सृष्टि से पहले सत नहीं था असत भी नहीं अंतरिक्ष भी नहीं

आकाश भी नहीं था छिपा था क्या, कहाँ किसने ढका था उस पल तो अगम अतल जल भी कहां था"

70 ते 80 च्या दशकात जन्मलेल्या मुलांना या ओळी नक्की आठवत असतील. अहो इतकंच काय ती चालही तुम्ही आता वाचता वाचता गुणगुणत असाल. दूरदर्शनवर प्रसारित झालेली ही 53 भागांची मालिका. तत्कालीन स्थितीतली ही सर्वात मोठी मालिका होती. ज्यात मानवाच्या उत्क्रांतीपासून गांधींपर्यंतचा इतिहास अगदी लिलया आणि मुख्य म्हणजे कोणतीही आदळआपट न करता सांगितला होता.

'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पंडित जवाहरलाल नेहरू लिखित ग्रंथावर आधारित ही मालिका होती. त्यामुळेच या मालिकेचे सूत्रधार स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूच दाखवण्यात आले आणि ती भूमिका स्वीकारली रोशन सेठ यांनी. सीरिजच्या श्रेयनामावलीतली माणसं ही दिग्गज होतीच पण भविष्यात त्याच लोकांचं नाणं फिल्म इंडस्ट्रीत खणखणीत वाजलं. स्वतः श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शनाचं शिवधनुष्य पेललं होतं, त्यांचे सहाय्यक होते गोविंद निहलानी आणि अभिवाचनाची जबाबदारी करारी आवाज असलेल्या ओम पुरी यांची.

अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, कुलभूषण खरबंदा, आलोक नाथ, इरफान खान, सुधीर मिश्रा, मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर, पल्लवी जोशी, पंकज बेरी, टॉम अल्टर, सलीम घोष, ईला अरुण, अंजन श्रीवास्तव, मिता वशिष्ठ अशी नावं पुढच्या तीन दशकांमध्ये घराघरातल्या टीव्ही सेट्सवर, फिल्मच्या पडद्यांवर दिसली.

पण या संपूर्ण मालिकेमध्ये सर्वाधिक दिसले आणि प्रत्येक भूमिकेत रुचले ते म्हणजे ओम पुरी. दुर्योधन, रावण, सम्राट अशोक, कृष्णदेवराय, अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब, चोल राजा, नबाकृष्ण बॅनर्जी अशा अनेक भूमिकांमध्ये ओम पुरी यांनी जीव ओतला. पद्मावतमधला खिलजी आणि भारत एक खोजमधला खिलजी याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण खिलजीतली क्रूरता दाखवण्यासाठी भन्साळींना खिलजीला विकृत दाखवावं लागलं. स्पेशल इफेक्ट, म्युझिक आणि बऱ्याच तंत्रांचा वापर करावा लागला, पण भारत एक खोजमधला खिलजी असो किंवा औरंगजेब, ओम पुरी यांनी फक्त आपल्या भेदक नजरेनं निभावला आहे. त्यांना कोणत्याही अंगविक्षेपाची किंवा अतिरंजितपणाची गरज पडली नाही दुर्योधन आणि रावण साकारतानाही ओम पुरी यांचा तटस्थपणा भावतो. कृष्णदेवराय आणि चोल राजाची श्रीमंतीही ओम पुरी यांनी अगदी सहजरित्या पेश केली.

आजवर शिवरायांच्या भूमिका अनेक दिग्गजांनी केल्या पण सौंदर्यीकरणाच्या भरामध्ये शिवरायांना सुंदर दाखवण्याचा खटाटोप प्रत्येकाने केला. देखणे शिवाजी महाराज, बलदंड शिवाजी महाराज बऱ्याच ठिकाणी साकारले गेले. पण शिवराय स्वस्तः म्हणाले होते आमची आई सुंदर असती, तर आम्हीही सुंदर झालो असतो. त्यामुळे शिवराय जसे होते तसे दाखवण्याचं धाडस केवळ आणि केवळ भारत एक खोजमध्येच झालं आणि ती भूमिका साकारली होती अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी. नसीर यांची भाषा, नजरेतला करारीपणा, चालण्याची लकब, सगळं काही शिवरायांच्या अगदी जवळ जाणारं. त्यामुळे चंद्रकांत मांढरेंपासून शरद केळकरपर्यंतचे शिवाजी महाराज बघितले, पण नसीरसारखे शिवराय पुन्हा दिसले नाहीत.

आपण हृतिक रोशनने साकारलेल्या अकबरला डोक्यावर घेतलं, पण खरंच अकबर हृतिकसारखा होता का? याचं उत्तर नाही असंच द्यावं लागतं. जे जसं होतं ते तसं दाखवणं यावरच बेनेगल यांचा भर होता. सादरीकरणातल्या भव्यतेपेक्षा भूमिकेतल्या खोलीला त्यांनी महत्त्व दिलं आणि म्हणूनच अकबरच्या भूमिकेत 'भारत एक खोज'मध्ये दिसले ते कुलभूषण खरबंदा. आवाजातलं वजन आणि इतक्या वर्षात गाठीशी असलेला कसदार अभिनय इतकंच पुरेसं होतं.

इरफान खानच्या अभिनयात इतकी सहजता आली कुठून याचं उत्तर याच मालिकेत मिळतं. अस्खलित उर्दू आणि सहज वावर हे त्याचं वैशिष्ट्य कदाचित या मालिकेतच खुललं असावं. वागळे की दुनियातले अंजन श्रीवास्तवही मधूनमधून दिसतात. वसंतसेना आणि चारुदत्त भागातला धनानंद, महाभारतातला धृतराष्ट्र, रामायणातला यम, कृष्ण देवरायचा पंतप्रधान अप्पाजी आणि ब्रिटिशांसमोर नांगी टाकणारा वाजिद अलि शाह त्यांनी साकारला आहे.

अंदाज अपना अपनामधले लॉज मालक असलेले हरीश पटेल इथे अकबरचे खजिनदार तोडरमल होतात. रॉबर्ट क्लाईव्हची भूमिका साकारणारे जलाल आगा दिसतात. भारतीयांसाठी एकमेव इंग्रज असलेले टॉम अल्टर वेगवेगळ्या भागात वेगवेगळे इंग्रज बनतात. सरकार फिल्ममध्ये ओपनिंग शॉटला दिसणारे विरेंद्र सक्सेना इशं बिरबल होतात. साराईभाईमधल्या रत्ना पाठक इथं झाशीच्या राणी होतात. गेल्या 20 वर्षात भन्नाट आणि हिट गाणी देणारा लकी अली इथं सम्राट अशोकचा भाऊ तिस्सा होतो. गंगाधर टिपरेतल्या शुभांगी गोखले सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसतात आणि सदाशिव अमरापूरकर फुल्यांच्या भूमिकेत दिसतात. थोडक्यात सीरिज बघताना आता दिग्गज बनसलेली माणसं, तेव्हा अगदी छोट्या छोट्या भूमिका साकारताना तुम्हाला नक्की दिसतील.

अनुराग देसाईंनी साकारलेल्या भूमिकांची नुस्ती रेंज बघा, संत अप्पार, दादोजी कोंडदेव, अस्लम बेग, गौतम बुद्ध, इब्राहिम लोधी, नानासाहेब पेशवे, राजाराम मोहनरॉय, वज्रबंधू आणि सुमंत्र, रवी झांकल नावाचे अभिनेते तुम्हाला आठवणार नाहीत. पण गुगल करुन पाहिलंत तर यांना तुम्ही चटकन ओळखाल. त्यांनीही बलराम, चंद्रगुप्त मौर्य, लक्ष्मण, पृथ्वीराज चौहान, राणा सांगा अशा अनेक भूमिका यात साकारल्या. अलिकडेच आलेल्या 1992 स्कॅम बघितली असेल तर त्यात फेरवानीची भूमिका केलेल्या के के रैना यांनीही अनेक भूमिका साकारल्या आहेत. हा सगळा वृत्तांत देण्यामागचं कारण सुमारे 32 वर्षांपूर्वी श्याम बेनेगल यांनी तेव्हाच्या काही दिग्गज आणि काही स्ट्रगलर्सची मोट बांधून ही मल्टीस्टारर सीरिजच साकारली होती.

कदाचित आता बघताना ही सीरिज तुम्हाला काही वेळा बाळबोधही वाटेल. लढायांमध्ये थोडा लुटूपुटूपणाही दिसेल पण आपण 32 वर्षे काळाची तफावत आणि 32 वर्षातली तंत्रज्ञानाताली तफावत ध्यानात घेतली पाहिजे. अख्खी सीरिज ही गोरेगावातल्या फिल्मसिटीमध्येच शूट झाली आहे, यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण कला दिग्दर्शनात आणि डीटेलिंगमध्ये कुठेही कमी दिसली नाही. फक्त एका सीनमध्ये रस्त्यावर खडी टाकलेली दिसली तितकाच काय तो फाऊल दिसला. पण समकालीन पेहराव, समकालीन दागिने, भाषा, घरे, वाडे, शस्त्रे, सगळं काही परफेक्ट होतं, स्थानिक लोककलांचाही यात भरपूर वापर केला होता.

आता ही सीरिज का बघायची? हेही जाणून घ्या

या सीरिजमध्ये भारताच्या जन्मापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतच्या सगळ्या ठळक टप्प्यांना चित्रित केलंय. त्यामुळे विशेषतः नवोदितांनी भारत कसा घडला? हे जाणून घेण्यासाठी वाचन करायचं नसेल तर किमान या मालिकेचं दर्शन तरी करावं! वेद, उपनिषिदे, महाकाव्य महाभारत आणि रामायण इथे आटोपशीर पद्धतीने बघायला मिळेल.आर्य आणि द्रविड संस्कृतीचा मिलाफ दिसेल, मौर्य, चालुक्य, नंद, राष्ट्रकूट, सातवाहन, मुघल अशा वंशांची घडण्या-बिघडण्याची कहाणी थोडक्यात कळेल. मुघलांशी भिडणारे शिवाजी महाराज, चोल राजा, टीपू सुलतान इथे कळतील. इंग्रजांनी भारतात कसे हातपाय पसरले याचं षडयंत्र समजेल. इंग्रजांना भिडणारा मंगल पांडे, झाशीची राणी, तात्या टोपे, बाळगंगाधर टिळक असे क्रांतिकारी दिसतील. राजाराम मोहन रॉय, ज्योतिबा फुले, विवेकानंद यांच्यासारखे समाजसुधारक दिसतील.

अर्थात हे सगळं आपण शाळेत शिकलोय पण तेही परीक्षेपुरतंच. त्या घोकमपट्टीवरही आता धूळ साचली आहे ती झटकायला पाहिजे. थोडं मागे वळून बघायला पाहिजे, अख्खा भारत समजून घ्यायचा असेल, भारताची जडणघडण पहायची असेल, वर्तमानामध्ये इतिहास जगायचा असेल तर 'भारत एक खोज' बघायलाच पाहिजे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, झी फाईव्ह, मॅक्स प्लेअरवर नाही यू ट्यूबवर आहे अन् फुकट आहे. वेळ काढा आणि भारत कसा घडला... ते बघा!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget