(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : खराब फलंदाजी, ढिसाळ क्षेत्ररक्षण!
क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग, बॉलिंगसोबतच फिल्डिंग हा किती महत्त्वाचा घटक आहे, आणि तो सामन्यात कशी निर्णायक भूमिका बजावू शकतो, हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं. पर्थच्या मैदानात 134 चं माफक लक्ष्य आपण दक्षिण आफ्रिकन (South Africa) टीमसमोर ठेवलं होतं. तेव्हा प्रत्येक धाव ही जिवाच्या आकांतानं वाचवणं आणि प्रत्येक कॅच हा 100 पेक्षा जास्त टक्के प्रयत्न करुन घेणं हे गरजेचं होतं. आपल्या दुर्दैवानं आपल्याकडून दोन चुका झाल्या, कोहलीच्या (Virat Kohali) क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण सारेच जाणून आहोत, तरीही त्याच्याकडून एक कॅच सुटला, तर दुसरीकडे रोहित शर्माकडून (Rohit Sharma) रनआऊट मिस झाला. मारक्रम आणि मिलर या दोघांनी मग जखमेवर मीठ चोळत विजयी भागीदारी करत आफ्रिकन टीमला विजयपथावर नेलं. मिलर डावखुरा आणि मारक्रम उजवा असल्यानेही त्यांचं काम सोपं झालं. त्याचवेळी अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाला मोक्याच्या क्षणी मिलरने षटकार ठोकत भारताच्या आव्हानाची हवाच काढून टाकली. रोहित शर्माने अश्विनऐवजी वेगवान गोलंदाजाला 18 वी ओव्हर द्यायला हवी होती का? याचं कारण भुवनेश्वर आणि शमीची एकेक ओव्हर बाकी होती. त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रोहितच्या निर्णयाबद्दल त्यानेच पोस्ट मॅच कमेंट्समध्ये सांगितलं, तो म्हणाला, अखेरच्या ओव्हरमध्ये फिरकी गोलंदाजांची काय स्थिती होते हे आपण पाहिलंय. त्याचा रोख भारत-पाक सामन्यातील अखेरच्या ओव्हरकडे होता. तेव्हा मोहम्मद नवाझला अखेरच्या ओव्हरमध्ये 16 धावा डिफेंड करता आल्या नव्हत्या.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच्या खेळाचं विश्लेषण करायचं झाल्यास वेग आणि बाऊन्सशी नातं सांगणाऱ्या पर्थच्या खेळपट्टीवर आपण टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतली. जिथे भुवनेश्वर कुमार आणि पंड्याचेही चेंडू खेळपट्टीवरुन मध्येच फणा काढत होते, तिथे अधिक उंचेपुरे असलेल्या दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजीची परीक्षा होणार हे नक्की होतं. एन्गिडीने तिखट मारा करत टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीची चव घालवली आणि स्कोरबोर्डचीही. आपण पाच बाद 49 असे कोसळलो होतो. सूर्यकुमारच्या आधाराने आपण नेस्तनाबूत होण्यापासून वाचलो. त्याचं नजरेत भरणारं सातत्य यावेळी राहिलं नसतं तर आपण 100 च्या आत आटपण्याची भीती होती. सूर्यकुमारने अफलातून बॅटिंग केली. ज्या खेळपट्टीवर अन्य भारतीय फलंदाजांची त्रेधा उडाली, तिथे सूर्यकुमार ऐटीत खेळत होता. जणू तो निराळ्याच खेळपट्टीवर खेळतोय, असं वाटावं अशा सफाईने तो खेळत होता. त्याच्या इनिंगने आपण सन्मानजनक नाही पण, समाधानकारक स्थितीत पोहोचलो. तिथून पुढे ऑलआऊट करुन दक्षिण आफ्रिकेला रोखणं हा एकच पर्याय आपल्यासमोर होता. त्यासाठी अर्शदीप सिंगने झकास सुरुवातही केली होती. त्याचा चेंडू मूव्ह होत होता आणि त्याला बाऊन्सही अप्रतिम मिळत होता. त्याने डीकॉक आणि धोकादायक ठरु शकणाऱ्या रोसूचा अडथळा दूर केला. पाठोपाठ शमीने बवुमालाही परत पाठवलं. मग तीन बाद 24 अशा खिंडीत दक्षिण आफ्रिका सापडली. ज्यातून मिलर-मारक्रम जोडीने लढवय्याच्या थाटात संघाला बाहेर काढलं. ज्याला आपल्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने मोलाचा हातभार लागला. 134 चं लक्ष्य इतकं कमी होतं की, एक बरी पार्टनरशिप आणि टीमची नैया पार. तसंच झालं. एकूण स्पर्धेचा विचार केल्यास या पराभवानंतरही आपण समाधानकारक स्थितीत असलो तरी आपल्या फिल्डिंगमधील चुका तातडीने सुधाराव्या लागतील. नॉकआऊट स्टेजला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्याच वेळी राहुलचं फलंदाजीतील सातत्य नसण्याबद्दल पुन्हा एकदा विचार होणं गरजेचं आहे. इथून पुढचा प्रत्येक सामना सेमी फायनलच्या दरवाजाकडचं पाऊल असेल. पहिला सामना आपण पाकिस्तानच्या जबड्यातून ओढून काढल्यावर आणि दुसरा आरामात जिंकल्यावर आता कामगिरी उंचावत नेणं गरजेचं आहे. आपली टीम समतोल आहे, फलंदाजी, गोलंदाजी दोन्हीत ताकद आहे. क्षेत्ररक्षणही आज जितकं खराब झालं, तसं अजिबात खराब नाही. या साऱ्याची भट्टी तात्काळ जुळून येणं आवश्यक आहे.