एक्स्प्लोर
प्रचाराचं सिनेमास्त्र
या सगळ्या सिनेमांचा समान धागा एकच आहे.. तो म्हणजे आपल्या पक्षाचा नायक लोकांपर्यंत पोहचवणं. 2019 या वर्षाची सुरुवातच अशा राजकीय बायोपिक असलेल्या सिनेमांनी होतेय. त्यामुळे प्रचाराचं हे नवं तंत्र येत्या काळात अधिक प्रभावी होत जाणार आहे.
![प्रचाराचं सिनेमास्त्र Amol Kinholkar's blog on Political Biopics प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11083943/Amol-Kinholkar-Blog-Cinema-Prachar-Political-Biopic.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मंडळी, आपला सिनेमा आता प्रौढ झालाय.. वयात आलाय.. 21 व्या शतकातली 18 वर्ष संपली आणि सिनेमा मतदार झाल्यासारखा राजकारणात उतरलाय.. आता सिनेमा थेट अगदी नाव घेऊन राजकारणावर बोलू लागला, वास्तववादी मत मांडू लागलाय...
2019 च्या लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत, आणि अशावेळी accidental prime minister आणि ठाकरे यासारख्या सिनेमांचा उद्देश नेमका काय आहे, हे शहाण्यांना सांगायची गरज नाही. विवेक ओबेरॉय चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. पीएम मोदी हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल हे निश्चित नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसं बोलता येणार नाही. पण येणाऱ्या बायोपिक पैकी हा महत्वाचा सिनेमा आहे..
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084607/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-PM-Narendra-Modi.jpg)
याआधीही अशी राजकीय पार्श्वभूमी असलेले सिनेमे आले मात्र वेळोवेळी त्यांचा आवाज दाबण्यात आला.
1975 साली आलेल्या 'आँधी' या सिनेमावर बंदी आली होती, इंदिरा गांधींसारखी व्यक्तिरेखा या सिनेमात होती, असा आरोप होता. शेवटी इंदिरा गांधी पायउतार झाल्यावर जनता पक्षाच्या कारकीर्दीत हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर आलेल्या 'किस्सा कुर्सी का' या सिनेमालाही काँग्रेसने असाच विरोध केला होता. अगदी आत्ताच आलेल्या इंदू सरकार या सिनेमालाही असाच विरोध झाला. सेन्सॉरने काही बदल सुचवले आणि शेवटी सिनेमा रिलीज झालाच. पण आता काळ बदललाय.. अँक्सिडंटल प्राइम मिनिस्टरचा ट्रेलर बघूनच काँग्रसचा तिळपापड झाला आणि थेट कोर्टात जाण्याची त्यांनी तंबी भरली. पण कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही..
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084134/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Aandhi.jpg)
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084212/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Kissa-Kursee-Ka.jpg)
संजय बारु डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार. अनेक वर्ष त्यांनी सोबत काम केल्यानंतर त्यांचा अनुभव पुस्तकरुपात आणि आता या सिनेमातून समोर येतोय. ट्रेलर बघून सिनेमात काय असेल याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतोच. काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी रिमोट कंट्रोल बनून मनमोहन सिंग यांचा कसा वापर करुन घेतला वगैरे असं हे सगळं कथानक आहे..
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084232/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Accidental-Prime-Minister.jpg)
सध्याची वेळ पाहता या सिनेमाचं प्रदर्शित होणं ही भाजपसाठी सर्वात फायद्याची गोष्ट आहे. अर्थात सिनेमाच्या प्रदर्शनाचं टायमिंग भाजप साधणार आहे. अनुपम खेर यांचं भाजपप्रेम हे काय लपून राहिलेलं नाही. त्यात राज्यात भाजपाच्या सहयोगी पक्ष रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांचे चिरंजीव विजय गुट्टे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. फक्त माहितीसाठी म्हणून... हे तेच रत्नाकर गुट्टे आहेत ज्यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचं कर्ज उचलल्याचा आरोप आहे.. दिग्दर्शक विजय गुट्टे यांच्यावरही 34 कोटींची जीएसटीची बनावट बिलं करुन गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याचा सिनेमाच्या निर्मितीशी काही संबंध नसावा, असा भाबडा समज करुन घेऊया..
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084308/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Sacred-Games.jpg)
असो, या सगळ्यात गम्मत आणली ती सॅक्रेड़ गेम्स या वेबसीरिजनं.. ही सीरिज जरी गुन्हे जगतावर आधारित असली तरी यातला गणेश गायतोंडे आपली राजकीय मतं मांडतांना लोकांच्या मनातलं बोलतो.. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल अनेक संवाद वादाच्या भोवऱ्यात होते.. पण काँग्रेसला सॅक्रेड गेम्स वेब सीरिजचा शोध लागेपर्यंत ती अर्ध्या जगानं बघितलेली होती. पण वेबसीरिजला रोखणं वगैरे हे आता हाताबाहेर गेलंय. सेन्सॉरच्या मर्यादा वगैरे आता राहिलेल्या नाहीत. म्हणूनच सिनेमा थेट प्रचाराच्या आखाड्यात उतरल्यासारखा मत मांडू लागलाय.
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084324/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Thackeray.jpg)
त्यानंतर 25 जानेवारीला ठाकरे सिनेमा येतोय. ठाकरेंच्या ट्रेलरमध्ये शिवसेनेची स्थापना, मराठी माणसाची गळचेपी, बाबरी मशिद, राम मंदीर असे सध्याच्या राजकारणातले मुद्दे सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवणार आहे. बाळासाहेब ठाकरे या नावालाच प्रचंड वलय आहे. त्यामुळे त्याचाच फायदा घेण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असावा.
बायोपिक येणं नवीन नाही पण निवडणुका तीन महिन्यांवर असताना येणं हा निव्वळ योगायोगही नक्कीच नाहीय. सेनेच्या भाषेत सांगायचं तर 80 टक्के राजकारण आणि 20 टक्के मनोरंजन, असा काहीसा हा प्रकार असावा. बरं हे हिंदी मराठीपुरतंच मर्यादित नाही, दक्षिणेत तर थेट युद्धच पेटलंय,
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084342/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-NTR.jpg)
दिवंगत अभिनेते आणि तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक NT रामाराव यांच्यावर बायोपिक येतोय. 'एनटीआर कथानायकुडू' आणि फेब्रुवारीमध्ये 'एनटीआर महानायकुडू' अशा दोन भागात हा सिनेमा रिलीज होईल. एन टी रामाराव यांचे चिरंजीव अभिनेते नंदामुरी बालक्रिष्णा या सिनेमात एनटी रामाराव यांची भूमिका साकारत आहेत, नंदामुरी बालक्रिष्णा सुपरस्टार तर आहेतच पण टीडीपीचे ते नेते आणि स्टार कँपेनपर आहेत, पण यावेळी थेट सिनेमाच्या माध्यमातून आपला नेता मतदारांपर्यंत पोचणार आहे..
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रा बाबू नायडू जे एन टी रामाराव यांचे जावई आहेत त्यांची भूमिका बाहुबलीमधला भल्लाळदेव अर्थात राणा दुगुबत्ती साकारतोय..
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084417/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Yatra.jpg)
एनटीआरचा पहिला भाग जानेवारीत येतोय. तर दुसरा भाग 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. मात्र 8 फेब्रुवारीला काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा जीवनपट उलडणारा 'यात्रा' हा सिनेमा येतोय.. ज्यामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार मामुट्टी हे वायएसआर यांची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे हे दोन्ही सिनेमे फेब्रुवारीमध्ये सिनेमागृहांसोबतच राजकीय आखाडाही तापवणार आहेत. वायएसआर सिनेमाला साथ देण्यासाठी एनटीआर यांची दुसऱ्या पत्नी लक्ष्मी पार्वती यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट येतोय. 'लक्ष्मीज एनटीआर' हा सिनेमा राम गोपाल वर्मा दिग्दर्शित करत आहेत..
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084658/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Lakshmis-NTR.jpg)
लक्ष्मी पार्वती सध्या वायएसआर काँग्रेसच्या नेत्या आहेत. आणि येत्या निवडणुकीत टीडीपीच्या उमेदवाराविरोधात लढण्यासाठी उत्सुक आहेत. आता इतके सगळे सिनेमे ऐन निवडणुकीच्या तोंड़ावर प्रदर्शित होणं हा योगायोग नक्कीच नाहीय.
यात उरी हा सुद्धा एक महत्वाचा सिनेमा आहे. जे काँग्रेसला 70 वर्षात जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं. पाकिस्तानला घरात घुसून मारलं असा काहीसा सूर या सिनेमाचा आहे. यातून सिनेमाला काय सांगायचंय हा विचार प्रत्येकानं आपापल्या परीनं करावा. 2021 च्या आसपास तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका येताहेत. त्या पार्श्वभूमीवर जयललिता यांच्या बायोपिकचं काम सुरु झालंय. ज्यामध्ये जयललिता यांची भूमिका अभिनेत्री नित्या मेनन करणार आहे.
![प्रचाराचं सिनेमास्त्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/11084530/Amol-Kinholkar-Blog-Political-Biopic-Jayalalitha.jpg)
नोव्हेंबर 2018 मध्ये सुपरस्टार विजयच्या सरकार सिनेमातही जयललिता यांच्याबद्दल टिप्पणी होती. ज्यावर प्रदर्शनानंतर टीका झाली आणि त्यानंतर दोन दिवसांनी सरकार सिनेमाला कात्री लावण्यात आली होती.
या सगळ्या सिनेमांचा समान धागा एकच आहे.. तो म्हणजे आपल्या पक्षाचा नायक लोकांपर्यंत पोहचवणं. 2019 या वर्षाची सुरुवातच अशा राजकीय बायोपिक असलेल्या सिनेमांनी होतेय. त्यामुळे प्रचाराचं हे नवं तंत्र येत्या काळात अधिक प्रभावी होत जाणार आहे. या सिनेमांचा वैशिष्ट्य म्हणजे हे सिनेमे थेट उघडपणे बोलू लागले आहेत अधिक खुलेपणानं व्यक्त होत आहेत. याआधीही कधीही सिनेमाचा वापर हा थेट प्रचारासाठी केला गेला नव्हता, तो आता होऊ लागलाय. आपला समाज कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही. राजकीयपट बघताना प्रत्येक व्यक्ती आपली वैयक्तिक मतं जपत त्याच दृष्टीने सिनेमा बघत असतो. त्यामुळे या सिनेमांमुळे मतपरिवर्तन आणि नंतर त्याचं मतपेटीत परिवर्तन किती होईल हा संशोधनाचा विषय आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)