BLOG | आयुष्मान भव:
कधीकधी वाटतं ह.भ.प. आयुष्मानबुवा खुराना यांनी समाज सुधारणेचा ठेकाच घेतलाय की काय! एवढे सगळे आव्हानात्मक गंभीर विषय. पण आयुष्मानच्या सिनेमात हे विषय लोक हसत हसत स्वीकारतात आणि अंतर्मुख होतात हे विशेष. येत्या काळात ही लिस्ट अशीच वाढत जाईल.
मुंबईत आल्यावर आयुष्मान आपल्या एका मित्राकडे गेला. तो मित्र बिचारा एका मुलीसोबत लिव्ह इन मध्ये राहायचा. १०*१० च्या रुममध्ये तो दोघांच्या मध्ये झोपला, त्याला वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी बॅग पाठीवर घेऊन आयुष्माननं दुसऱ्या मित्राला गाठलं. हा एमबीबीएस करणारा मित्र तेव्हा केईएम हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये राहायचा. बाहेरच्या कोणालाही हॉस्टेलमध्ये अलाऊड नव्हतं. पण जुगाड करून आयुष्मान तिथे राहायला गेलाच. येता-जाताना तो मेडिकल स्टुडंटचा लॅबसूट घालायचा जेणेकरून कोणालाही शंका येणार नाही. हॉस्टेलच्या त्या छोट्या रूम. त्यात तिघे जण, घामट वातावरणात पंखा तसंही काही कामाचा नसतोच. अंतरवस्रांवर फिरणारी पोरं. टॉयलेटच्या बाहेर रांग लावणं किंवा मग मेसमध्ये जेवण.. तुम्हाला वाटत असेल की, किती मोठा स्ट्रगल आहे वगैरे वगैरे. पण आयुष्मानला असं कधी वाटलंच नाही. त्यानं हे सगळं एन्जॉय केलं. जगण्यात अनेक वळणं येत असतात. त्यामधला हा एक टप्पा आहे असं मानून हे दिवसही आयुष्मान भरभरून जगला. त्याचं सकारात्मक नजरेतून बघणंच त्याच्या यशाचं गमक बनलं.
खरं तर आयुष्मान खुराना सुखी संपन्न कुटुंबातला मुलगा. आई वडिलांनी कष्टानं संसार उभा केला. पण मुलांना चुकीच्या सवयी लावल्या नाही. चंडिगडमध्ये शाळेत शिकत असताना इतर मुलांना त्यांचे आई वडिल कारमधून सोडायचे, शाळा सुटल्यावर घ्यायला यायचे. आयुष्मानच्या वडिलांनी मात्र त्याला सायकल घेऊन दिली. सायकल पंक्चर झाली तर बसने जायला सांगितलं. स्वतःची कामं स्वतः करायला शिकलं पाहिजे, असा शिस्तीचा कारभार आयुष्मानच्या वडिलांचा होता.
अत्यंत किडकिडीत शरीरयष्टीचा, डोळ्यावर चष्मा आणि दात खालीवर असलेला हा मुलगा एक दिवस हिंदी सिनेसृष्टीचा देखणा अभिनेता होईल असं कोणालाच वाटत नव्हतं. पण आयुष्मानचे वडिल प्रचंड महत्वाकांक्षी होते. त्यांनी त्याला कायम प्रोत्साहन दिलं. विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावले आणि त्याचा आत्मविश्वास जागवला. दातांना सरळ करण्यासाठी आयुष्मान डेन्टिस्टकडे गेला. डॉक्टरांनी दातांना क्लीप लावली. मग दात मस्त एका रेषेत आल्यावर त्याला अप्रुप वाटलं. मग त्यानं ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं. बारावीनंतर तो मेडिकलकडे वळलाही, मात्र नंतर त्याला आर्ट्स घ्यावसं वाटलं, हे तेच वय असतं ज्या वयात तुम्हाला हे करू की ते करू? असे प्रश्न सातत्यानं पडत असतात. आयुष्माननं जेव्हा त्यांच्या वडिलांना सांगितलं की, "मला आता थिएटरकडे वळायचं आहे आणि अभिनेता व्हायचंय". तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं की, "असं काही चालणार नाही. तुला थिएटर करायचं असेल तर कर पण एका अटीवर.. दरवर्षी तू कॉलेजमध्ये टॉपर असायला पाहिजे." आयुष्मान पुढचे तीनही वर्ष टॉपर होता. अनेक नाट्यस्पर्धांमध्ये बक्षीसही मिळवत होता. अनेक नाटकं गाजत होती. धर्मवीर भारती यांच्या अंधायूग या नाटकात अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. एमटीव्ही रोडिजचा २००४ चा विजेता म्हणूनही तो निवडला गेला होता. मास कॉम जर्नलिझ्मचं शिक्षणही त्यानं पूर्ण केलं. पण निकाल लागल्यावर वडिलांनी बॅग पॅक करत आयुष्मानला थेट मुंबईला पाठवलं. “तू आता मुंबईला गेला नाहीस तर पुढची दोन वर्ष तुला कुठलंच काम मिळणार नाही.” असं सांगत अक्षरश: घरातून हकलून लावलं. आयुष्मानचे वडिल ज्योतिषी होते. ग्रह ताऱ्यांवर त्यांचा विश्वास तर होताच पण अभ्यासही होता. Ayushmann Khurrana या नावात दोन वेळा n आणि दोन वेळा r हे त्यामुळेच आहेत. त्यांनी मुहूर्त काढूनच आयुष्मानला मुंबईला पाठवलं आणि झालंही तसंच. आयुष्मानच्या वडिलांचं भविष्य खरं ठरलं. मुंबईत पाऊल ठेवल्यावर आठवडाभरात आयुष्मानला एका सीरियलमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली आणि रेडिओमध्ये RJ होण्याचीही संधी चालून आली. अशा परिस्थितीत कोणीही सीरियलमध्ये काम करणं पसंत केलं असतं. पण आयुष्माननं रेडिओला निवडलं. ट्रेनिंगनंतर त्याला दिल्लीला पाठवलं गेलं. आयुष्मान असा पहिला RJ होता ज्याचं होर्डिंग दिल्लीच्या रस्त्यांवर लागले. BIG FMचा ‘’मान ना मान मै तेरा आयुष्मान’’ हा रेडिओ शो प्रचंड गाजला. त्यासाठी त्याला यंग अचिव्हर अवॉर्डही मिळाला. त्याचदरम्यान MTVनं नव्यानं लॉन्च केलेल्या शो चं अँकरिंग करण्याची संधी त्याला मिळाली. आयुष्मान छोटा पडदाही गाजवू लागला.
पण तरीही तो समाधानी नव्हताच. तुम्हाला काय हवंय हे नेमकं उमगलेलं असेल तर मग अशावेळी मनाची चलबिचल वाढते. आयुष्माननं पक्कं ठरवलं होतं की मला सिनेमात काम करायचं आहे. अभिनेताच व्हायचंय.. पण त्यासाठी तो योग्य संधीच्या शोधात होता. MTVचा तो शो करताना अनेक संधी चालून आल्या पण त्यानं त्या नाकारल्या. नवीन कलाकार म्हटल्यावर खरंतर चॉईस नावाचा प्रकार नसतो. त्यातही तुम्ही त्या सर्कलमधले नसाल तर तुम्हाला कुठलीही संधी मिळवून आत शिरण्याची घाई असते. पण संयम ठेवत आयुष्माननं योग्य संधीची वाट पाहिली.
इंडस्ट्रीत जेव्हा तुम्ही आऊटसाईडर असता, किंवा तुमचा कोणी गॉडफादर नसतो. तेव्हा तुमच्या सिनेमाचा विषय प्रभावी असायला हवा. हे आयुष्मानला माहित होतं. आयुष्मान अशा एका कॅरेक्टरच्या शोधात होता जे त्याच्या आयुष्यात हिरोसारखं असेल. शेवटी इंतजार की घडिया खत्म हुई.. आयुष्मानला ते कॅरेक्टर मिळालं. 2012 साली दिग्दर्शक शुजित सरकार यांच्या ‘विक्की डोनर’नं हिंदी सिनेमात क्रांती घडवली. विर्यदान या विषयावर आपण बोलणं टाळतो. पण विक्की डोनरनं हा समाजातला न्यूनगंड घालवला. लोकांनी विक्की डोनर झालेल्या आयुष्मानला भरभरून प्रेम दिलं. हिंदी सिनेमाची परिभाषा, विषय हाताळण्याची कला आणि टिपिकल प्रेमी युगलांच्या गरीबी अमिरीच्या कथांना छेद देत रिअलिस्टिक पण तितकाच कमर्शिअली यशस्वी सिनेमा कसा असू शकतो याचे नवे मापदंड विक्की डोनरनं प्रस्थापित केले. विक्की डोनर ही तर फक्त सुरूवात होती. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक वळणांवरून तितक्याच यशस्वीपणे सुरू आहे. आयुष्मानच्या सिनेमांचं आणि त्यातल्या विषयांचं वैविध्य तर कमालीचं आहे. अत्यंत गंभीर विषयांवर तितक्याच हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीनं (विषयाचं गांभिर्य न घालवला) आयुष्मानचे सिनेमे सुपरहिट होत गेले.
2015 साली शरत कटारियाच्या ‘दम लगा के हैश्शा’ सिनेमानं आयुष्मानच्या लोकप्रियतेला चार चांद लावले. महिलांच्या बॉडी शेमिंगवर अत्यंत सटिक भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. अर्थात या सिनेमात आयुष्मानला मात देत भूमी पेडणेकरची भूमिका वरचढ ठरली. भूमी-आयुष्मान ही जोडी मात्र लोकांना आपलीशी वाटली. त्यानंतर 2017 साली 'बरेली की बर्फी'मधल्या चिराग दूबेनं सगळ्यांना हसवलं. तर त्याच वर्षी आलेल्या 'शुभ मंगल सावधान'मध्ये लिंग शिथिलतेसारख्या विषयाला व्यंगात्मक पद्धतीनं रंगवताना कुठेही बिभत्सपणा आयुष्माननं येऊ दिला नाही. 2018 मध्ये 'अंधाधून' सिनेमातल्या भूमिकेसाठी आयुष्मानला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर ‘बधाई हो’ या सिनेमातून वृद्धापकाळात प्रेग्नंट राहिलेल्या आईच्या तरूण मुलाची मानसिक अवस्था आयुष्माननं रंगवली. ‘ड्रिम गर्ल’ सिनेमातून क्रॉस जेंडरचा विषय अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळला. 'बाला' सिनेमातून टक्कल पडलेल्यांच्या मनातला न्यूनगंड घालवला. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मधून पुरूषांच्या समलैंगिक संबंधांवर खुलेपणानं बोलायला लावलं. तर 'आर्टिकल १५' मधल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यानं बलात्कार, सामाजिक विषमता, जातियवादीला वाचा फोडली. कधीकधी वाटतं ह.भ.प. आयुष्मानबुवा खुराना यांनी समाज सुधारणेचा ठेकाच घेतलाय की काय! एवढे सगळे आव्हानात्मक गंभीर विषय. पण आयुष्मानच्या सिनेमात हे विषय लोक हसत हसत स्वीकारतात आणि अंतर्मुख होतात हे विशेष. येत्या काळात ही लिस्ट अशीच वाढत जाईल. आपण खाजगीतही ज्या विषयांवर बोलायला घाबरतो ते विषय आयुष्मान आपल्यासमोर आणत जाईल आणि आपल्याला बोलतं करत राहिन.