BLOG : मनसेत लोकप्रतिनिधी का टिकत नाहीत?
वसंत मोरेचं काय होणार हा छोटा प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे तो राज ठाकरेंवर ही वेळ का ओढवलीय हा. वसंत मोरे मनसे सोडणार का? सोडल्यास कुठल्या पक्षात जाणार याच्या चर्चा सुरु आहेतच, पण मोरेंनी अशाप्रकारचं बंड कशामुळं केलंय हे आधी बघावं लागेल. अर्थात नजीकच्या काही वर्षांमध्ये मनसेमधून अनेक नेते बाहेर पडलेत. 2009 ला निवडून आलेल्या 13 आमदारांपैकी बाळा नांदगावकर वगळता राज ठाकरेंसोबत कोणीही उरलेलं नाही. पुण्यातील त्यांच्या वसंत मोरेंसारख्याच जुन्या सहकारी रुपाली पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केलाय. पण वसंत मोरेंचं बंड इतरांपेक्षा वेगळं आहे. कारण मनसेला नव्या रूपात, हिंदुत्वाच्या नव्या आवरणात लोकांसमोर सादर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज ठाकरेंना त्यांच्या अतिशय जवळच्या शिलेदाराकडून पक्षात राहूनच देण्यात आलेलं हे आव्हान आहे. हे का घडतंय याचा विचार करताना मनसेच्या प्रवासाचा धांडोळा घ्यावा लागेल.
राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना-भाजप या चौकोनामध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला पाचवा कोन प्राप्त झाला. कोरी पाटी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मिळतीजुळती शैली आणि मराठी पत्रकारितेतील धुरिणांसोबत असलेल्या मैत्रीच्या बळावर मनसेची घोडदौड जोरात सुरु झाली. नाशिकमध्ये महापालिकेची सत्ता आली. पुणे महापालिकेत मनसे दुसरा सर्वात मोठा पक्ष बनून विरोधी पक्षनेतेपद वसंत मोरेंना मिळालं. 2009 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे 13 आमदार निवडून आले. शिवसेनेला जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष कष्ट घ्यावे लागले होते, संघटन बांधावं लागलं होतं, ते मनसेला सुरुवातीच्या टप्प्यात अगदी सहज मिळालं. सहज मिळालं हे यासाठी म्हणायचं की, मनसेच्या या यशात मराठी पत्रकारितेतील धुरिणांनी राज ठाकरेंना दिलेल्या प्रसिद्धीचा मोठा वाटा होता. राज ठाकरेंची प्रत्येक सभा लाईव्ह होत होतीच. पण त्यांच्या पक्षाची मराठीच्या मुद्द्यवरची आंदोलनंही माध्यमांनी उचलून धरली. 2009 त्याच्या आसपासच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेला पण शिवसेना-भाजप युतीचा भरवसा वाटत नसलेला मतदार मनसेकडे वळला. 2009 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेत येण्यात आणि शिवसेना-भाजपचा दारुण पराभव होण्यात राज ठाकरेंच्या मनसेची निर्णायक भूमिका राहिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंना उद्देशून 'दो ही मारा लेकिन सॉलिड मारा' हे राज ठाकरेंनी केललं वक्तव्य उद्धव ठाकरेंना त्यावेळी जिव्हारी लागलं होतं. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शहरी भागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून येण्यात मनसेच्या उमेदवारांनी केलेल्या मतविभागणीचा मोठा वाटा होता.
राज ठाकरे आणि मनसेसाठी हा भरभरटीचा काळ होता. पण अल्पावधीत मिळालेलं यश पचणं अवघड असता म्हणतात. प्रसिद्धीला आणि त्यापासून मिळलेल्या राजकीय यशाला गृहीत धरण्यात आलं. राज ठाकरेंच्या वक्तृत्वामुळं त्यांच्याबद्दल वाटणारा आपलेपणा त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र पदाधिकाऱ्यांना जाणवेनासा झाला आणि एक एक आमदार मनसे सोडून जाऊ लागला. दुसरीकडे मराठीच्या मुद्द्या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांसाठी ठोस असा कार्यक्रम नव्हता. टोल नाके बंद पडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, पण त्यात सातत्य नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंची शैली राज ठाकरेंनी घेतली होती. पण फक्त शैलीपुरते मर्यादित न राहता प्रति बाळासाहेब होण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता. बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्व शैलीबरोबरच त्यांची कार्यशैली घेण्याचाही राज ठाकरेंनी प्रयत्न केला. पण राज ठाकरेंनी ती कार्यशैली अंगिकारू शकले न स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करू शकले. बाळासाहेब ठाकरेंना सर्वच बाबतीत कॉपी करण्याच्या सापळ्यात ते अडकत गेले. या उलट उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मर्यादा ओळखल्या. आपण बाळासाहेब होऊ शकत नाही हे स्वीकारलं आणि स्वतःची वेगळी कार्यशैली अंगिकारली. अडीच वर्षांपूर्वी आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा घेतलेला निर्णय हा त्याचाच एक भाग होता. राज ठाकरे मात्र विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करून त्याची अंमलबजावणी करू शकले नाहीत.
अनेक सहकारी सोडून गेल्यानंतर मात्र अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या स्वभावात आणि कार्यशैलीत बदल झाल्याचं दिसून येतंय. पक्षातील लहानसहान कार्यकर्त्यांच्या घरी ते भेटी देतायत. तिथे चहा-नाष्टा घेतायत, त्यांच्यात मिसळतायत. वैयक्तिक करिष्म्यावर मतदारांना भुरळ घालणं हे राज ठाकरेंच्या यशाचं गमक राहिलंय. पण 2014 पासून नरेंद्र मोदींचा करिष्मा देश पातळीवर पसरल्यामुळे राज ठाकरेंसारख्या राज्य पातळीवरील नेत्यांचा करिष्मा मोदींच्या त्या करिष्म्याखाली झाकोळला गेलाय. ही कोंडी कशी फोडायची याच कोडं त्यांना सुटत नाहीये. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींच्या त्या करिष्म्याला राज ठाकरेंनी आव्हान देऊन पाहिलं. त्यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'ची देशभर चर्चा झाली. पण निकाल आले त्यावेळी मोदींच्या भाजपने तीनशे जागांचा टप्पा पार केला होता. पुढे यथावकाश राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली आणि त्यांचा मोदी विरोध मावळला.
राज ठाकरेंचं राजकारण हे सतत विरोधी प्रतिक्रिया देण्यावर अवलंबुन राहिलंय. मराठीची गळचेपी होतेय म्हणून त्यांच्या पक्षाने केलेल्या आंदोलनाला शहरी भागातील मतदारांनी त्यावेळी स्वीकारलं. पण मोदींच्या कारभाराच्या विरोधी जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देऊन पहिली तेव्हा मात्र ते स्वीकारण्यात आलं नाही. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील पाचवा कोन ठरलेल्या, पाळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मनसेला स्वतःचा सूर सापडत नसल्याने हिंदुत्वाचा जो कोण आधीच भाजपने व्यापलाय तो कोन स्वीकारण्याची गरज वाटली. त्यासाठी राज ठाकरेंनी काटकोनात वैचारिक वळण घेतलं. आधीचा चार रंगांचा ध्वज बदलला आणि भगवा ध्वज घेतला. त्यातूनही भाजपसोबत युती करण्याचा इरादा स्पष्ट दिसत होता. युतीतील आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यवरील शिवसेनेची जागा आपण भरून काढू असं राज ठाकरेंना वाटतंय का? पण त्यांच्या या वाटण्यावर वसंत मोरेंना विश्वास ठेवावा वाटला नाही आणि मशिदीवरील भोंग्यांचे, मुस्लिम विरोधाचे कारण देत त्यांनी वेगळी वाट चोखाळायचं ठरवलं. मनसेच्या निवडणुकीतील यशात राज ठाकरेंच्या करिष्म्याबरोबरच स्थानिक पातळीवर लोकांमध्ये काम करून निवडून येणाऱ्या वसंत मोरेंसारख्या नेत्यांचा वाटा होता. आता एकीकडे राज ठाकरेंचा करिष्मा पहिल्यासारखा चालत नाहीये, तर स्वतःच्या बळावर, केलेल्या कामाच्या जोरावर निवडून येणारे वसंत मोरेंसारखे लोकप्रतिनिधी पक्ष सोडणार का याची चर्चा होतेय. अनेकजण लोकप्रतिनिधी तर आधीच गेलेत. मग फक्त संघटनेतील नेत्यांच्या बळावर मनसेची वाटचाल कशी होणार. सध्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा नरेंद्र मोदी चेहरा आहेत. या चेहऱ्याच्या समोर किंवा त्या चेहऱ्याच्या शेजारी नवं हिंदूहृदयसम्राट म्हणून राज ठाकरेंचा चेहरा उठून दिसेल?