एक्स्प्लोर
सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे काय रं भाऊ...!
हा एका हॉस्टेलमध्ये भेटला. कौतुक वाटलं याचं. दर सुट्टीत भारतात येतो. एकटाच.काही युरोपियन, रशियन मुलीही भेटल्या ज्या सोलो ट्रॅव्हल करत होत्या.आता कोणी विचारलं की भीती नाही वाटत का, की हसू येतं.या प्रवासात आपल्यालाच संस्कृतीचे पैलू ही नव्याने उमजले.
“एकट्यानेच भटकायला वेड लागलंय का?”
“भीती नाही वाटत?”
“इतके दिवस एकटंच फिरायचं बोअर नाही होत तुला?”
सोलो ट्रॅव्हल म्हटलं की या प्रतिक्रिया येतात.
अभिजीत गांगुली नावाचा एक स्टँडअप कॉमेडीयन आहे. त्याचा सोलो ट्रॅव्हलिंगवरचा एपिसोड नुकताच पाहिला. शेजारच्या गल्लीत फोटो काढून इन्स्टावर #wanderlust पोस्ट करणाऱ्या हौशा-नवशांची मस्त घेतलीय त्याने.. पण सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकी काय भानगड आहे आणि त्याचं काय कौतुक असा प्रश्न अनेकांना पडतो त्यांच्यासाठी...
पहिला प्रश्न..
“एकट्याने फिरायला भीती नाही वाटत का?”
नाही. कारण ती कधीच मेलीय आणि त्याला कारण ठरला एक छोटासा (!) अनुभव…
आधी सोलो ट्रॅव्हल नावाचा काही प्रकार असतो हेही माहीत नव्हतं.
ज्ञानप्रबोधिनीला इयत्ता पाचवीत असताना पहिल्यांदा ट्रेकिंगला जायचा योग आला.
महेंद्रभाईंबरोबर आम्ही सगळेजण लोहगडावर गेलो होतो. रात्री लोहगडावरच्या गुहेत मुक्काम केला.
पावसाळ्यातलं सह्याद्रीचं सौंदर्य पाहिल्यावर कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.
त्यानंतर ट्रेकिंग कधी थांबलं नाही.
पुण्यात गेल्यावर ट्रेकिंगची भूक वाढली.
एकदा असाच ट्रेकिंगला जायचा प्लॅन केला. चौघं जण होतो.
आणि नेहमीप्रमाणे एकाने प्लॅनची वाट लावली. प्रत्येक ग्रुपमध्ये असतंच एक बेणं असं.
काहीही झालं तरी मी जाणारच म्हणून रागाच्या भरात एकटाच निघालो.
तेव्हा गडांवर मुक्काम करायची मुभा होती म्हणून आम्ही कॅम्पिंग करायचो.
टेन्ट घेऊन गडावर पोहचायला संध्याकाळ झाली आणि वर गेल्यावर लक्षात आलं की गडावर माझ्याशिवाय कोणीच नाही. अस्ताव्यस्त पसरलेला गड, पायथ्याला घनदाट जंगल आणि त्यापलीकडे गाव. गावात आणि माझ्यात दोन तासांचं अंतर. परतायचं असेल तर माझ्याकडे एक तास बाकी होता. कारण एकदा का अंधार झाला की पायवाटा दिसेनाशा होतात. तेव्हा खाली उतरणं धोक्याचं असतं. खासकरुन घनदाट जंगल असताना. अंधारात पायवाटेने गड उतरायचा प्रयत्न केल्यास काय होतं याचा वाईट अनुभवही होता.
पण शेवटी ठरवलं की रात्र इथेच काढायची आणि टेन्ट लावला. अंधार पडेपर्यंत सर्वकाही ठीक चाललं होतं.पण रात्री सोसाट्याचा वारा सुटला. वादळ आलं. पाऊस आणि वाऱ्याच्या कुस्तीत टेन्टची मात्र वाट लागली. वारा इतका की टेन्ट उखडला जातो की काय वाटू लागलं. सुसाट वाऱ्याच्या रेट्याने टेन्ट अक्षरशः जागेवरुन थोडा थोडा सरकत होता. काही बरंवाईट झाल्यास ढोल वाजवला तरी ऐकायला कोणी नव्हतं. खरं सांगायचं तर त्या वादळानं जाम फाटली होती.
जरा वाऱ्याने उसंत घेतली तसा मी बाहेर जाऊन हाताला येतील ती मोठमोठी दगडं घेऊन टेंटमध्ये घुसलो. याच दगडांनी रात्री वादळात सुखरुप ठेवलं. जेव्हा वाऱ्याचा वेग जास्त असतो तेव्हा स्वस्तातल्या टेन्टचा टिकाव लागत नाही. रात्री एकच्या आसपास जसं वादळ सरलं तसा मी टेन्टच्या बाहेर आलो. बाहेर लख्ख चांदणं पडलं होतं. पौर्णिमेचा दिवस जवळच होता बहुतेक. चंद्राच्या प्रकाशातलं किल्ल्याचं ते अनोखं रुप पहिल्यांदाच बघत होतो.
त्यानंतर किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माचीवर गेलो. त्या माचीच्या टोकावरुन जो नजारा पाहिलाय तो आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. डोक्यावर चंद्र आणि चांदण्यांनी भरलेलं आकाश होतं तर पायाखाली ढगांची चादर पसरली होती. ते अद्भुत दृष्य चंद्राच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होतं. या नजाऱ्याला कोणतं विशेषण देऊ हा प्रश्न पडावा इतका तो अद्भुत अनुभव होता. जर मीपण प्लॅन कॅन्सल केला असता तर कोणत्या गोष्टीला मुकलो असतो याची जाणीव मला झाली. तेव्हाच ठरवलं की आता एकटं तर एकटंच सही. सोलो ट्रॅव्हलिंगचा प्रवास सुरु झाला तो इथूनच.
या अनुभवानंतर भीती मेली.
पण याचा अर्थ एकट्यानं फिरणं प्रत्येकवेळी सुरक्षित असेलच असं नाही. अशा वेळी स्वतःच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी पेलता आली पाहीजे.
आता दुसरा प्रश्न, एकट्याने प्रवास करायला बोअर नाही होत का…?
सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे एकट्यानेच फिरायचं हा मोठा गैरसमज आहे.
आपण 12 महिने 24 तास काही ठराविक लोकांच्या बरोबर असतो.
मग त्यात आपले मित्र, पाहुणे, शेजारी, ऑफिसवाले, कॉलेजवाले हे सगळे आले.
याच लोकांचा आपल्यावर, आपल्या मतांवर, आपल्या विचारसरणीवर प्रभाव असतो.
सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला याच लोकांना काही दिवसांसाठी रिप्लेस करायचंय.
नवे लोक जोडायचेत. वेगळी पार्श्वभूमी, वेगळी संस्कृती असलेले.
असा प्रवास माणसाला समृद्ध बनवतो. मानसिकदृष्ट्या कणखरही बनवतो. वैचारिक विहिरीतून बाहेर पडण्यासाठी दोनच पर्याय आहेत पुस्तकं आणि प्रवास.
प्रवासात भन्नाट नमुने भेटले. तेही वरायटीमध्ये…
सोलो ट्रॅव्हल करायचंय तर पहिली गोष्ट म्हणजे हॉटेलिंग टाळायचं आणि हॉस्टेलची वाट धरायची.
आता सर्व ठिकाणी बॅगपॅकर्स हॉस्टेल झाली आहेत. उत्तरेत तरी..
असं ह़ॉस्टेल म्हणजे सोलो ट्रॅव्हलर्सचा हक्काचा अड्डा..
अशा वेगवगळ्या हॉस्टेल्सवर भन्नाट लोकं भेटली.
हा आहे बेन..
हा एका हॉस्टेलमध्ये भेटला. कौतुक वाटलं याचं. दर सुट्टीत भारतात येतो. एकटाच.
काही युरोपियन, रशियन मुलीही भेटल्या ज्या सोलो ट्रॅव्हल करत होत्या.
आता कोणी विचारलं की भीती नाही वाटत का, की हसू येतं.
या प्रवासात आपल्यालाच संस्कृतीचे पैलू ही नव्याने उमजले.
आपल्याला योगाचं महत्व अजूनही नाही पटलं जितकं ते विदेशी लोकांना पटलंय.
हिमालयात अनेक जणं खास योगा करायला येतात.
या हॉस्टेलमध्ये भारतीयही होते पण योगा करायला आले फक्त युरोपियन आणि अमेरिकन.
कहर म्हणजे त्यांना शिकवणारी रशियन. काय हा योगायोग!
एका अमीर इस्राईलीला विचारलं की बाबा तू स्विसलाही जाऊ शकतो तर भारतात का येतो?
तो बोलला “I like India because its indisciplined.” शब्दावर जाऊ नका पोराच्या भावना समजून घ्या.
एकही समान भाषा नसलेली काही माणसं भेटली. तेव्हा भाषेविना सुद्धा संवाद साधता येतो हे समजलं.
शास्त्रीय संगीतातलं मला काही कळतं नाही. बोरिंग वाटायचं ते.
पण एका मित्राने माझा दृष्टीकोन बदलला.
शास्त्रीय संगीतामुळे मराठी कुठंवर आणि किती खोलवर रुजलंय याची जाणीव झाली.
हा गुजराती आहे. याला मराठी बिलकुल येत नाही. हा शास्त्रीय संगीत शिकवतो. पं. भीमसेन जोशींना हा आदर्श मानतो.
प्रवासात अशी अनेक तऱ्हेची माणसं भेटत गेली. प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी अनुभव वेगळे.
या अनुभवात एक वेगळचं नावीन्य होतं.
काही दिवसांसाठी का होईना पण मी विहिरीच्या बाहेर पडलो.
स्टीव मॅक्युरी नावाचा ट्रॅव्हल फोटोग्राफर आहे.
त्याचं एक वाक्य खूप भावतं.
“Life is too short not to be doing something which you really believe in.”
जग खूप मोठंय आणि सुंदरही.
ते पहायला आधी विहिरीतून बाहेर पडावं लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement