Shani Chandra Grahan 2024 : तब्बल 18 वर्षांनंतर आज शनि चंद्रग्रहण; आकाशात किती वाजता दिसणार दुर्मिळ दृश्य?
Saturn Lunar Eclipse 2024 : चांदोबा आज शनिसोबत लपाछपी खेळणार आहे. चंद्र आज काही काळ शनीला स्वतःच्या मागे लपवेल. तब्बल 18 वर्षांनतर हे विस्मयकारक दृश्य आकाशात पाहायला मिळणार आहे. तुम्ही कुठे आणि कधी हे दृश्य पाहू शकता? जाणून घ्या
Shani Chandra Grahan 2024 : आज आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. तुम्हाला चंद्रग्रहणाबद्दल तर माहितीच असेल, पण आज रात्री शनि चंद्रग्रहण (Saturn Lunar Eclipse 2024) होणार आहे. जर तुम्हाला आकाशातील लुकलुकणारे तारे पाहून किंवा चंद्र पाहून आनंद होत असेल, तर तुम्ही रात्री एक विलक्षण दृश्य पाहू शकता. अशी संधी 18 वर्षांनंतर आली आहे, ज्यात शनि (Shani) आणि चंद्र लपंडाव खेळताना दिसतील.
24 जुलै 2024 च्या रात्री आपण सर्वजण या घटनेचे साक्षीदार होऊ शकतो. या काळात चंद्र 80 टक्के दिसेल. त्यावेळी शनी कुंभ राशीत असेल. पहाटे 1:30 च्या सुमारास एक तासापर्यंत शनि आणि चंद्राचा लपंडाव पाहता येईल.
शनि चंद्रग्रहण वेळ
शनि चंद्रग्रहण 24 जुलै 2024 च्या मध्यरात्रीनंतर, म्हणजेच 25 जुलै रोजी पहाटे 1.30 च्या सुमारास सुरू होईल आणि 25 जुलै 2024 रोजी पहाटे 2.25 च्या सुमारास समाप्त होईल.
शनि चंद्रग्रहण कसं दिसेल?
तुम्हाला ही दुर्मिळ खगोलीय घटना पहायची असेल, तर ही उत्तम संधी आहे. खगोल तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या वेळात शनि अंगठीच्या रूपात दिसेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, शनी चंद्रग्रहणाचं हे दृश्य फक्त दुर्बिणीने किंवा DSLR कॅमेऱ्याने दिसू शकतं.
'या' देशांत दिसणार शनी चंद्रग्रहण
हे अद्भूत शनी चंद्रग्रहण भारतात तर दिसणारच आहे. पण, भारता व्यतिरिक्त श्रीलंका, म्यानमार, चीन आणि जपानमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. शनीच्या चंद्रग्रहणाच्या या घटनेला 'लूनार ऑकल्टेशन ऑफ सॅटर्न' असं नाव देण्यात आलं आहे. आपल्या गतीने चाललेले दोन ग्रह जेव्हा आपला मार्ग बदलतात तेव्हा शनी ग्रह चंद्राच्या मागून उगवतो. यामध्ये सर्वात आधी शनीचे वलय स्पष्ट दिसतात. हा अद्भूत योग खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी फार उत्सुकतेचा विषय आहे.
भारतात कुठे दिसेल?
एका तासासाठी दिसणारं शनि चंद्रग्रहण बेंगळुरू, कोलकाता, गुवाहाटी अशा अनेक शहरांमध्ये पाहता येणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: