Nirjala Ekadashi : भगवंताची प्राप्ती करून देणारी ज्येष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशी, काय आहे महिमा...
Nirjala Ekadashi 2022 : निर्जला एकादशी व्रताला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीच्या व्रताचे पुण्य सर्व तीर्थयात्रा आणि दानापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.

Nirjala Ekadashi 2022 : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यात जलपूजन करणे महत्वाचे आहे कारण या महिन्यात सूर्यदेवाची तेज तीव्र असते त्यामुळे उष्णता अधिक वाढते. निर्जला एकादशी व्रताला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीच्या व्रताचे पुण्य सर्व तीर्थयात्रा आणि दानापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. जेष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशीची उपासना थोडी अवघड असली तरी या एकादशीच्या व्रताने वर्षभराच्या सर्व एकादशीचे पुण्य लाभते अशी वारकरी संप्रदायात मान्यता आहे.
निर्जला एकादशीचे पौराणिक महत्त्व :
निर्जला म्हणजे जलविना केलेली उपासना आणि म्हणूनच निर्जलचे व्रत थोडेसे कठीण असले तरी सर्वात जास्त फळ देणारे असते. महाभारतात महाशक्तीशाली अशा भीमाला उपवास करणे हे अशक्यप्राय गोष्ट होती. एकदा महर्षी व्यास यांनी भीमाला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. आपल्याला भूक सहन होत नसल्याने आपण वर्षातील 24 एकादशी कशी करणार असा प्रश्न केल्यावर महर्षींनी भीमाला निर्जला एकादशीचे व्रत करताना संपूर्ण एकादशीचा दिवस जलाविना उपवास केल्यास तुला 24 एकादशीचे फळ प्राप्त होईल असे सांगितल्याचे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे.
एकादशी म्हणजे एक दिवसाचे लंघन, शरीर सत्रात देखील अशा लंघनाचे महत्व सांगताना उपवासामुळे शरीरचक्र व्यवस्थित काम करते असे सांगण्यात आले आहे. खरे तर उप-वास या शब्दाची फोड करताना उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे होय. देवाच्या जवळ चिंतनात राहणे म्हणजे उपवास अशी वारकरी संप्रदायाची मान्यता आहे. माणूस अखंड चिंता करीत राहतो मात्र एकादशीचा एक दिवस चिंतन केल्यास सर्व चिंतांचे हरण होते. निर्जला एकादशी म्हणजे भगवंताचे चिंतन करण्याचा दिवस..
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
