Kanya Pujan 2025 : चैत्र नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर करा कन्या पूजन; जाणून घ्या पूजा, विधी आणि या दिवसाचं महत्त्व
Kanya Pujan 2025 : नवरात्रीत कन्या पूजनाला देखील तितकंच महत्त्व आहे. शास्त्रानुसार, काही ठिकाणी अष्टमी तिथी आणि काही घरांत नवमी तिथीत कन्या पूजन केलं जातं.

Kanya Pujan 2025 : देशभरात चैत्र नवरात्रीचा उत्सव अगदी आनंदात आणि जल्लोषात सुरु आहे. या नवरात्रीच्या (Navratri 2025) नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या विविध रुपांची पूजा करतात. तसेच, नवरात्रीत कन्या पूजनालाही विशेष महत्त्व आहे. याशिवाय कन्येला देवी लक्ष्मीचं रूपही मानलं जातं. कन्या पूजन हे सहसा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केलं जातं. शास्त्रानुसार, काही ठिकाणी अष्टमी तिथी आणि काही घरांत नवमी तिथीत कन्या पूजन केलं जातं. मात्र, यंदा अष्टमी आणि नवमी तिथी नेमकी कधी आणि कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कन्या पूजन नेमकं कधी?
कन्या पूजन वर्षातून दोनदा किंवा नवरात्रीत अष्टमी किंवा नवमी तिथीला केलं जातं. शास्त्रानुसार, चैत्र नवरात्रीत कन्या पूजनासाठी 10 कन्याचं पूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. प्रत्येक वयोगटाच्या कन्याचं पूजन केल्याने इच्छित फळ ललवकर मिळते तसेच देवीचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे.
अष्टमी तिथी कन्या पूजन
चैत्र नवरात्रीत अष्टमी तिथीची सुरुवात 4 एप्रिल रोजी रात्री 08.12 वाजल्यापासून होणार आहे. तर, अष्टमी तिथीचं समापन 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 07.26 वाजता होणार आहे. अष्टमी तिथीला यंदा भद्र वास योग निर्माण होतोय. त्याचबरोबर अष्टमी मध्येच शुक्रमा योग आणि पुनर्वसु नक्षत्र फार खास ठरणार आहे. कन्या पूजनासाठी 5 एप्रिल रोजी दुपारी 11.59 पासून 12.49 पर्यंतचा अभिजीत मुहूर्त फार खास ठरणार आहे.
नवमी तिथी कन्या पूजन
पंचांगानुसार, चैत्र नवरात्रीची नवमी तिथी 5 एप्रिल 2025 रोजी शनिवारी रात्री 07.26 वाजता सुरु होणार आहे. ते 6 एप्रिल 2025 रोजी रविवारी रात्री 07.22 वाजता समाप्त होणार आहे. नवमी तिथीत कन्या पूजनासाठी अभिजीत मुहूर्त दुपारी 11.58 पासून ते 12.49 पर्यंत आहे.
2 ते 10 वर्षांच्या वयोगटातील मुलींचं महत्त्व नेमकं काय?
शास्त्रानुसार कन्या पूजेमध्ये 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. खरंतर 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुली देवी दुर्गेच्या विविध रूपांचं प्रतिनिधित्व करतात. दोन वर्षांच्या मुलीला कुमारी म्हणतात. तीन वर्षांच्या मुलीचं नाव त्रिमूर्ती, चार वर्षांच्या मुलीचं नाव कल्याणी, पाच वर्षांच्या मुलीचे नाव रोहिणी, सहा वर्षांच्या मुलीचं नाव माता कालिका, सात वर्षांच्या मुलीचं नाव चंडिका, आठ वर्षांच्या मुलीचं नाव शांभवी आणि नऊ वर्षांच्या मुलीला देवी दुर्गा आणि दहा वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात.
कन्या पूजा हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे. कन्येची पूजा केल्याने दुर्गामाता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दु:ख दूर करते, अशी मान्यता आहे, यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी देखील टिकून राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















