Guru Purnima 2024 : गुरु: साक्षात् परब्रह्म! 20 की 21 जुलै यंदाची गुरुपौर्णिमा नेमकी कधी? जाणून घ्या अचूक विधी आणि शुभ मुहूर्त
Guru Purnima 2024 : गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करण्याबरोबरच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करण्याची परंपरा आहे.
Guru Purnima 2024 : आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमेचा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करण्याबरोबरच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करण्याची परंपरा आहे. यासाठी आषाढ पौर्णिमेला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. मान्यतेनुसार, या दिवशी महाभारत आणि वेदांचे रचनाकार महर्षी व्यास यांचा जन्म झाला. यासाठी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. त्यानुसार, यावर्षीची गुरु पौर्णिमा नेमकी कधी ते जाणून घेऊयात.
आषाढ पौर्णिमा 2024
हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी 20 जुलै रोजी संध्याकाळी 05 वाजून 59 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, याचं समापन 21 जुलै 2024 रोजी दुपारी 03 वाजून 46 मिनिटांनी होणार आहे. त्यानुसार, 21 जुलै रोजी गुरु पौर्णिमा साजरी केली जाईल. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जाते. या दिवशी चंद्राला अर्घ्य दिलं जातं. या पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी होणार आहे.
गुरु पौर्णिमा पूजा विधी
आषाढातील पौर्णिमेचं व्रत 21 जुलै 2024 रोजी ठेवलं जाणार आहे. याच दिवशी गुरु पौर्णिमा देखील साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करण्याला फार महत्त्व आहे. जर तुम्ही गंगा स्नान करू शकत नसाल तर घरातच पाण्यात गंगाजल घालून स्नान करा. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करून आपल्या गुरुंना, आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. त्यांना वंदन करा. सर्व देव-दैवतांना फळ, फूल, धूप, दिवा, अक्षता आणि हळद यांसारख्या गोष्टी अर्पण करा.
'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः'
या मंत्राचं पठण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: