Datta Jayanti 2023 : आज दत्त जयंती; जाणून घ्या महत्त्व, मुहूर्त आणि पूजा विधी
Datta Jayanti 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, याच दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.
Datta Jayanti 2023 : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा (Datta) जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. यंदा, आज मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती (Datta Jayanti 2023) आहे. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केल्याने, उपासना केल्याने दत्ततत्त्वाचा अधिक लाभ मिळतो, अशी मान्यता आहे.
भगवान दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात, त्यांना दत्त असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांमध्ये, त्यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. देशात भगवान दत्ताची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. पुराणानुसार, त्यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. या दिवशी दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त पूजा आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
दत्त जयंती 2023 कधी आहे?
पंचांगानुसार, या वर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा मंगळवारी, 26 डिसेंबर रोजी सकाळी 05:47 ते बुधवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 06:03 पर्यंत असेल. 26 डिसेंबरला पौर्णिमा तिथी दिवसभर राहणार असल्याने या दिवशी दत्त जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी शुक्ल आणि ब्रह्म नावाचे दोन शुभ योग देखील आहेत.
दत्तजयंतीचे महत्त्व
भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते, अशी मान्यता आहे. कारण, भगवान दत्ताला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते. भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत.
भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे. त्यामुळे, दत्तामध्ये गुरू आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तिन चेहरे आणि सहा हात आहेत. विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरू होते, त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्व आहे. भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि त्यांचे जीवन सुफळ संपन्न होते.
अशी करा दत्त पूजा
स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत-उपासनेचा संकल्प करावा. घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्ताची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करा. कुंकू लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यानंतर हातात फूल घेऊन श्री दत्ताचा नाम जप करा आणि फूल भगवान दत्ताला अर्पण करा.
दत्ताची आरती (Datta Aarti)
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
New Year 2024 : नवीन वर्षात घरी आणा 'या' वस्तू; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा, सुधारेल आर्थिक स्थिती