Buldhana News : मोठी बातमी! सिंदखेड राजा येथे सापडलेली पुरातन मूर्ती नागपूरला हलविण्यात येणार असल्याची नागरिकांची माहिती
Buldhana News : उत्खननात भगवान विष्णू आणि लक्ष्मीची अप्रतिम अशी अकराव्या शतकातील मूर्ती सापडली आहे. या संपूर्ण मूर्तीत समुद्रमंथनाचं दृश्य अतिशय सुबक आणि कोरीव असं दर्शवलेलं आहे.
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखोजी जाधव यांच्या समाधी परिसरात भारतीय पुरातत्व विभागाकडून उत्खनन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. या उत्खननात भगवान विष्णू आणि लक्ष्मीची अप्रतिम अशी अकराव्या शतकातील मूर्ती सापडली आहे. या संपूर्ण मूर्तीत समुद्रमंथनाचं दृश्य अतिशय सुबक आणि कोरीव असं दर्शवलेलं आहे. यात भगवान विष्णू शेषनागावर विराजमान होऊन बसले आहेत आणि लक्ष्मी त्यांच्या चरणाजवळ बसलेल्या आहेत. ही मूर्ती सहा फूट लांब आणि तीन फूट उंच अशी अतिशय भव्य आणि वजनदार असल्याने आज दुपारपर्यंत ही मूर्ती बाहेर काढली जाण्याची शक्यता आहे.
मात्र, सिंदखेड राजा परिसरात सापडलेली ही मूर्ती पुरातत्व विभाग नागपूरला नेणार असल्या प्राथमिक माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याला आतापासून विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. आज दुपारपर्यंत ही मूर्ती बाहेर काढली तर त्यानंतर गावकरी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांची अशी मागणी आहे की, ही अतिशय सुंदर मूर्ती असून हा इथला वारसा आहे आणि त्यामुळे शासनाने या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या संग्रहालयात ही मूर्ती जतन करण्यासाठी ठेवावी. या परिसरातील उत्खननाच्या इतिहासात ही अतिशय सुंदर आणि रेखीव अशी मूर्ती असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आज सकाळपासून सिंदखेड राजा परिसरातील नागरिक सकाळपासून राजे लाखोजी जाधव समाधी परिसरात जमायला सुरुवात झाली आहे.
'असं' आहे मूर्तीचं स्वरूप
शेष नागावर विश्राम अवस्थेतील लक्ष्मी सेवारत विष्णू मूर्ती हातामध्ये शंख, चक्र, गडा, पद्म, नाभितून उत्पन्न कमळ आणि त्यावर ब्रह्मदेव विराजमान असं काहीसं स्वरूप आहे. या मूर्तीच्या प्रभावळ भागात सुंदर, कोरीव समुद्रमंथनाचा देखावा, वासुकी नाग मूर्तीच्या बैठकीवर सुंदर असं नक्षीकाम केलं आहे.
उत्खनना दरम्यान सापडलेली ही मूर्ती साधारणपणे अकराव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही सुरेख आणि रेखीव मूर्ती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याचे बोलले जात आहे.
सिंदखेड राजा परिसरातील नागरिकांचा विरोध
सिंदखेड राजा येथे सापडलेल्या मूर्तीला इतरत्र हलविण्यास सिंदखेड राजा परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने मूर्ती हलविल्यास तीव्र आंदोलनाचा सामान्यांचा इशारा दिला आहे. जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचाही मूर्ती इतरत्र हलवण्यास विरोध केला आहे. तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझीर काजी यांनीही मूर्ती इतरत्र हलवल्यास मोठा जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा :