(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion News : कांद्याला प्रतिकिलो 25 रुपयांचा दर द्या, अन्यथा 16 ऑगस्टपासून बेमुदत कांदा विक्री बंद, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा
कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. हा दर जर मिळाला नाहीतर 16 ऑगस्टपासून कांदा विक्री बेमुदत बंद करु असा इशाराही देण्यात आला आहे.
Onion News : गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कांद्याला (Onion) उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळं कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं (Maharashtra State onion Farmers Association) व्यक्त केलं आहे. दरम्यान, कांद्याला सरासरी 25 रुपये प्रतिकिलो दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. हा दर जर मिळाला नाहीतर 16 ऑगस्टपासून कांदा विक्री बेमुदत बंद करु असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.
दर पाडण्यासाठी सरकारकडून विविध क्लुप्त्या, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप
कांद्याला थोड्याफार दिवसांसाठी भाव वाढल्यावर तत्काळ एका दिवसात कांदा निर्यातबंदी करणे, परदेशी कांदा आयात करणे, कांदा व्यापाऱ्यावरती धाडी टाकणे, कांदा साठ्यावर मर्यादा घालणे अशा विविध क्लुप्त्या वापरुन कांद्याचे दर पाडले जातात. मात्र, आता शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावानं विकला जात आहे. अशा वेळी सरकारचे मात्र शेतकऱ्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिघोळे यांनी म्हटलं आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांनीही कांदा प्रश्नावर कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्याने कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असल्याचे दिघोळे यांनी म्हटले आहे.
कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला 20 ते 22 रुपये येतो
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही गेल्या काही महिन्यांत रास्ता रोको, मोर्चे, आंदोलने, राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करुन आवाज उठवला होता. तसेच कांदा परिषदेच्या माध्यमातून घसरलेल्या कांदा दराप्रश्नी आवाज उठवला आहे, पाठपुरावा केलेला आहे. परंतू, तरीही कांद्याच्या दरात वाढ होण्यासाठी सरकारकडून कोणतेही पावले उचलली नाहीत. एकीकडं शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत मातीमोल भाव मिळत असताना यावर्षी नाफेडकडून अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यात आला. परंतू, नाफेडनेही शेतकऱ्यांचा कांदा 10 ते 12 रुपये प्रति किलो याप्रमाणे खरेदी करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला 20 ते 22 रुपये येत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून कांद्याला मिळणारा सरासरी दर हा 8 ते 10 रुपये इतका कमी आहे.
शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान सुरु
शेतकऱ्यांनी आपापल्या चाळींमध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये कांद्याची साठवणूक केलेले असून, खराब हवामानामुळे चाळींमधील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर बाजार समितीत कांदा विक्री केल्यास मातीमोल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान सुरु आहे. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात सरासरी 25 रुपये प्रति किलोचा दर मिळावा अन्यथा येत्या 16 ऑगस्ट 2022 पासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिला आहे.
देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातून कांद्याची शंभर टक्के विक्री बंद झाल्यास देशात कांदा टंचाई निर्माण होऊन सरकारवर दबाव तयार होईल.शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त म्हणजे सरासरी 25 रुपये दर मिळावा म्हणून हे कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भारत दिघोळे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: