(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारचा प्लॅन! ग्राहकांना दिलासा शेतकऱ्यांना फटका; कांदा निर्यातबंदीनंतर दरात मोठी घसरण
सध्या कांद्याच्या (Onion) मुद्यावरुन राज्यातील वातावारण चांगलचं तापलं आहे. कारण केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. त्यामुळं कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Onion Prices : सध्या कांद्याच्या (Onion) मुद्यावरुन राज्यातील वातावारण चांगलचं तापलं आहे. कारण केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसह (Farmers) विविध शेतकरी संघटना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात घट झाली आहे. यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांन या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे.
केंद्र सरकारनं सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे भाव जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. खरीप कांद्याचा पुरवठा वाढल्यानं येत्या आठवडाभरात भाव स्थिर राहण्याची किंवा किंचित घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एपीएमसीच्या आकडेवारीनुसार, लासलगाव एएमपीसीमध्ये कांद्याची सरासरी घाऊक किंमत 20 ते 21 रुपये प्रति किलो आहे. जी निर्यातबंदीच्या आधी 39 ते 40 रुपये प्रति किलो होती. केंद्र सरकारनं प्रथम कांद्यावर किमान निर्यात मूल्य (एमईपी) लागू केले. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्यातबंदी जाहीर झाल्यानंतर लगेचच कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली.
निर्यातबंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी
सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. दरम्यान, सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला देखील मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यानंतर सरकारनं हा निर्णय मागे घेत पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. अशाच पद्धतीनं सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणी होत आहे. सरकारनं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकरी हळूहळू त्यांचे पीक बाजारात आणत आहेत, कारण त्यांना आशा आहे की केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवेल.
कांद्याच्या पुरवठ्यात वाढ
लासलगाव बाजार समितीत 6 डिसेंबर रोजी लाल कांद्याची सरासरी किंमत 39.50 रुपये प्रति किलो होती. तर सर्वाधिक किंमत 45 रुपये प्रति किलो होती. मात्र, आता कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या प्रतिकिलो कांद्याला 21 ते 25 रुपयांचा दर मिळत आहे. निर्यातबंदीनंतर सरासरी किंमत 47 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर सर्वोच्च किंमत 44 टक्क्यांनी कमी झाली आहे. घाऊक बाजारातील कांद्याच्या पुरवठ्याच्या आकडेवारीवरुन खरीप कांद्याची आवक सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. दरम्यान, लासलगाव बाजारात या महिन्यात 19 डिसेंबरपर्यंत 3.66 लाख टन लाल कांद्याची आवक झाली आहे. तर संपूर्ण डिसेंबर 2022 मध्ये एकूण आवक 3.69 लाख टन होती.
महत्त्वाच्या बातम्या: