Kolhapur: कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची रत्नागिरीत अडवणूक; कोरोनाचे कारण सांगत प्रशासनाची बंदी
कोल्हापुरातील छोटे व्यापारी आठवडी बाजाराच्या निमित्ताने रोज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जात असतात. मात्र त्यांना कोरोनाचे कारण सांगत जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय.
कोल्हापूर: जिल्ह्यातून आठवडी बाजारासाठी रत्नागिरीत जाणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याच समोर येतंय. कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत गेल्या महिन्याभरापासून या किरकोळ व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येतोय. या प्रकारामुळे सुमारे आठशे ते हजार व्यापाऱ्यांना फटका बसत असून याचा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीवर देखील परिणाम झालाय.
कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी आजरा, चंदगड अशा तालुक्यातील अनेक किरकोळ व्यापारी रोज आठवडी बाजाराच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात जात असतात. पालेभाज्या, कडधान्य,फळ असा माल रोज कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी जाऊन विकतात. जवळपास आठशे ते हजार किरकोळ व्यापारीच नाही तर या निमित्ताने टेम्पो चालक, हमाल यांच्याही हाताला काम मिळतेय. मात्र गेल्या महिन्याभरापासून हा सगळा व्यवहार ठप्प झालाय. आणि याला कारण ठरलाय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला एक आदेश.
रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढलेल्या आदेशानुसार इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना रत्नागिरीच्या आठवडी बाजारामध्ये येता येणार नाही. राज्यात कोठेही जिल्हा बंदी नसताना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतंय.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या या किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय आता कुठे सुरळीत होत होता. अशातच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे या व्यापाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश नाकारला जातोय. हा निर्णय मागे घेतला जावा यासाठी हे व्यापारी गेल्या महिन्याभरापासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत.
दरम्यान, किरकोळ व्यापाऱ्यांना केलेल्या जिल्हा प्रवेश बंदीचा फटका फक्त व्यापाऱ्यांनाच नाही तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला देखील बसतोय. मुळात गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमधील मालाची आवक कमी झालीय. परिणामी फळ आणि पालेभाज्यांची दर देखील खाली आलेत. याच्या कारणांचा शोध कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रवेश बंदीचं हे प्रकरण समोर आलं.
राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही दिवसापूर्वी घातलेले कडक निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आलेत. शिवाय भाजीपाला कमी दरात मिळत असल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनाही गरज असताना कोल्हापूर आणि परिसरातीलच व्यापाऱ्यांची अडवणूक कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.
महत्त्वाच्या बातम्या :