(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंचन विभागाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका, पाण्याअभावी गहू जळण्याच्या मार्गावर
सिंचन विभागाच्या आडमुठ धोरणाचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतातील उभे पीक वाया जाण्याचा मार्गावर आहे.
यवतमाळ : शेतकऱ्यांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. एकीकडे येणारी नैसर्गीक संकटे तर दुसरीकडे असणारी सरकारची धोरणे याचा वेळोवेळी फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता सिंचन विभागाच्या आडमुठ धोरणाचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतातील उभे पीक वाया जाण्याचा मार्गावर असल्याने तेथील बळीराजा संकटात सापडला आहेय
गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर
पुसद येथील बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या धोरणाचा फटका बसत असून रब्बी हंगामातील गहू पीक जळण्याच्या मार्गावर आहे. पूस धारणातील उजव्या कालव्याच्या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू पीक घेतले. सिंचन विभागाची रीतसर पाणीपट्टी भरूनसुद्धा बोरी मायनरच्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर आहे. सिंचन विभागाच्या उदासीन धोरणामुळे कालव्यातील गाळ रब्बी हंगामापूर्वी काढण्यात आला नाही. तसेच गाळ जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने गाळ काढण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांना पाणी मिळत नसल्याचे सांगूनसुद्धा कारवाई होत नसल्याने दाद मागावी तरी कुठे? असा यक्ष प्रश्न बळीराजाला पडला आहे.
नियमाप्रमाणे आम्ही पाणी मागत आहोत, तरी ते आम्हाला पाणी देत नाहीत. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून गव्हाला पाणी नाही. आमच्या गव्हाचे पीक जळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या 2 ते 3 वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. शासनाकडून येणाऱ्या फंडातून कालव्याचे काम अधिकारी करत नाहीत. शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन कालवा साफ केला जातो अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
- खतांच्या कृत्रीम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
- अरे वा! दुष्काळात स्ट्रॉबेरी बहरली! साताऱ्याच्या खटावमधील दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी साधली किमया
- आटपाडी तालुक्यातील डाळींब शेतीवर 'पिन होल बोरर' किडीचे संकट; बागा काढून काटण्याची शेतकऱ्यांवर वेळ