Maharashtra Unseasonal Rains: अवकाळी पावसानं कांदा शेतात सडला, शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची चिंता; पंचनामा करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Maharashtra Unseasonal Rains: महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा, धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
Maharashtra Unseasonal Rains: मागील आठवडाभरापासून भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) अवकाळी पावसानं (Unseasonal News) जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळं धान उत्पादक शेतकरी असो किंवा पालेभाजी वा बागायती शेती करणारे शेतकरी, निसर्गाच्या दुष्टचक्रात सर्वच सापडले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून बांधातचं कांदा सडायला लागला आहे. तरीदेखील, प्रशासनाचे कोणताही अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेत बांधावर फिरकले नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश: भागात भात पिकाची शेती केल्या जाते. मात्र, पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ परिसरात पारंपरिक भात पिकाऐवजी कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. किंबहुना कांदा शेतीतून अनेकांनी स्वतःची मोठी आर्थिक भरारी घेतली आहे. या ही वर्षी सुमारे 60 हेक्टरपेक्षा अधिक भागात कांद्याची लागवड केली आहे. आता कांदा काढण्याचा हंगाम सुरू असताना सतत कोसळणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीसह पावसानं उसंत घेतली नाही. अवकाळी पावसाच्या तडाख्यात विक्रीयोग्य कांदा शेत बांधावर पावसात सापडला आणि आता अक्षरशः तो सडू लागला आहे.
विक्रीयोग्य कांदा शेतातच पाण्यात सडायला लागल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शेतकऱ्यांचे डोळे पाणावल्याचे चित्र बघायला मिळतं आहे. 48 तासांपेक्षा अधिक कालावधी लोटलेला असतानाही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहचलेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधून नुकसानीचा पंचनामा करण्याची विनवणी केली असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
धान पिकाला प्रचंड फटका; शेतकरी संकटात
संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यालाही तडाखा बसला आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धानपिक जमीनदोस्त झाले आहे. खरीप हंगामात धानावर आलेल्या रोगराईने त्रस्त झालेला शेतकरी रब्बी हंगामात चांगला पीक येईल अशी आशा करत असतानाच या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या वतीने नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. मागील एक आठवड्यापासुन सुरू असलेल्या पावसाने शेतातील धानपिक अक्षरशः मातीमोल झाले आहे. मात्र अद्यापही अधिकारी पंचनामे करायला पोचलेले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस; शेतकरी हैराण
हिंगोली तालुक्यासह औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये आज साडेचार च्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस हा मुसळधार एक तास होता. औंढा नागनाथ येथील आज गुरुवारी बाजारचा दिवस असल्यामुळे अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची व भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली. पाऊस जोराचा असल्यामुळे व्यापाऱ्यांचा भाजीपाला ही पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला त्यामुळे व्यापाऱ्यांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. तसेच या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. तर अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे