सप्टेंबर अतिवृष्टीत गेला, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस झोडपणार, मराठवाडा- विदर्भात ठिकठिकाणी अलर्ट
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत.

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने दाणादाण उडाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. गावात पाणी शिरल्यामुळे शेकडो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भातही पावसाने थैमान घातल्याचे चित्र होते. आता बहुतांश भागात पाऊस ओसरला असला तरी पुढील चार दिवस विदर्भ मराठवाड्यासह तळ कोकणात काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. (IMD Forecast)
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाचे अंदाज देण्यात आले असून पुन्हा विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाचा ताज्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (30 सप्टेंबर) रोजी नांदेड वगळता कुठल्याही जिल्ह्याला पावसाची शक्यता नाही. पण उद्यापासून मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Heavy rainfall very likely to occr at isolated places in the districts of Konkan-Goa and ghats of North Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 29, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/kUBtWgffQz
कोणत्या जिल्ह्याला काय अलर्ट?
30 सप्टेंबर- आज नांदेड वगळता राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट आहे.
1 ऑक्टोबर - रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
2 ऑक्टोबर - मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा ,नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे.
3 ऑक्टोबर- संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, बीड परभणी हिंगोली नांदेड व लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा, सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच कोल्हापूर व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट, बहुतांश राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
























