(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rain : अवकाळीचा द्राक्षाला मोठा फटका, बेदाण्याचा रंग बदलला; पंढरपूरसह इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत
अवकाळी पावसामुळं पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं आहे. तर इंदापूर तालुक्यातही भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा पंढरपूर (pandharpur) तालुक्यातील द्राक्ष बागांना (grapes crop) मोठा फटका बसला आहे. पावसामुळं द्राक्षाच्या घडांचं मोठं नुकसान होत आहे. तर दुसरीकडे शेडवर टाकलेला बेदानाही खराब होताना दिसत आहे. तसेचं पुणे जिल्ह्यातील इंदापूर (indapur) तालुक्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत मदत द्यावी
गेले दोन दिवस पंढरपूर परिसरात झालेल्या पावसानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कालच्या अवकाळी पावसानं द्राक्षाच्या घडाला क्रॅक पडत आहेत. त्यामुळं हाती आलेले कोट्यवधी रुपयांचे पीक डोळ्यासमोर मातीमोल होऊ लागले आहे. द्राक्षाला कमी भाव येऊ लागल्यानं शेतकऱ्यांनी द्राक्षांचा बेदाणा करण्यासाठी शेडवर अंथराला असून या पावसाळी वातावरणाने बेदाणा चॉकलेटी पडू लागल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बेदाण्याला 200 रुपयांपर्यंत चढा भाव मिळत होता. पण पावसाने बेदाण्यांचा रंग बदलू लागल्यानं आता बेदाण्याचा भाव थेट 50 रुपयांपर्यंत कोसळला आहे. त्यामुळं आता शासनानं तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत. मात्र, सलग पाच दिवस 10 मिलिमीटर पावसाच्या अटींमुळं मदत कशी मिळणार? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
बेदाण्याची किंमत 200 रुपायांवरुन 50 रुपयांवर
पंढरपूर जिल्ह्यातील एकट्या कासेगाव परिसरातील 1500 कोटींची रुपयांची द्राक्षांची उलाढाल होते. मात्र निसर्गाच्या फटक्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाळी वातावरणाने बेदाण्याचा रंग बदलत आहे. त्यामुळं किंमत चारपट कमी येत आहे. ही बाब शासनानं विचारात घेण्याची मागणीही होऊ लागली आहे. एक किलो बेदाणा बनवायला 80 रुपये खर्च येतो आणि या अवकाळीमुळं बेदाण्याची किंमत 200 रुपायांवरुन 50 रुपयांवर आली आहे.
इंदापूर तालुक्यात शेती पिकांचं मोठं नुकसान
इंदापूर तालुक्यात काल रात्री झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांची पिकं उध्वस्त झाली आहेत. सणसर, जाचकवस्तीवरील बाळासाहेब रणवरे या शेतकऱ्याने पाऊन एकरात विविध प्रकारची आंतरपिके घेतली होती. मात्र, काल रात्री झालेल्या पावसात सगळी पिकं भूईसपाट झाली आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतातील भोपळा, पपई, श्रावणी घेवडा, चिक्कू, मका, कांदा भाजीपाल्याची पिके भुईसपाट झाली आहेत. रणवरे यांच्या संपूर्ण शेतीमालाचे नुकसान झाले आहे. शासनाने या संदर्भात लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिकची मदत कशी मिळेल अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: