Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत; रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain News : सध्या वातावरणात चांगलाच बदल (Climate change) झाल्याचे चित्र दिसत आहे. कारण थंडीच्या दिवसात राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. राज्यातील अहमदनगर (Ahmednagar), सोलापूर (Solapur) आणि सांगली (Sangli) या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. तर पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं फळबाग उत्पादक शेतकरी (orchard farmers) चिंतेत आहेत. कारण या पावसाचा फळ बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. पावसामुळं बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसामुळं सागंली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत, रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती
सांगली जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. सांगली जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ हवामान होते. काल सायंकाळी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. सांगली शहरासह, मिरज पूर्व भाग, तासगाव, खानापूर तालुक्यात हलका पाऊस झाला. या पावसानं आणि ढगाळ वातावरणमुळं द्राक्ष बागांना मोठा धोका निर्माण झला आहे. सध्या द्राक्षाचे पिक तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात आहे. काही बागातील माल काढणीच्या टप्प्यात आला आहे. तर काही बागातील मणी तयार होण्याच्या स्थितीत आहे. हलक्या पावसानं फार धोका नसला तरी बुरशीजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
सोलापूर जिल्ह्यातही विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. पंढरपूर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली. याचबरोबर सांगोला, महुद , मंगळवेढा, माढा परिसरातही जोरदार पाऊस झाला. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, वाखरी, गादेगाव परिसरात चांगला पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत
पंढरपूर परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला आहे. यामुळं द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष फुलोरा स्टेजवर असल्यानं या पावसात बहर गळून जाण्याचा धोका होणार आहे. याशिवाय डाळिंब बागांवर फवारण्या कराव्या लागणार आहेत. याशिवाय ज्वारी देखील काळी पडण्याचा धोका वाढणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही पावसाची हजेरी, रब्बी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
काल सायंकाळच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव या तालुक्यांसह काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळालं. तर हवेत आर्द्रता वाढल्यानं रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: