मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे, पवार राहणार अनुपस्थित, शंभूराज देसाई म्हणाले; 'पराभव जिव्हारी...'
Shambhuraj Desai on Sharad Pawar and Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. महायुतीकडून या सोहळ्याची जोरदार तयारी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र ठाकरे, पवार आणि पटोले या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी ठाकरे-पवारांवर निशाणा साधलाय.
शंभूराज देसाई म्हणाले की, जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिलं आहे. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आभार मानतो. आज देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. शिवसेना आमदारांनी वर्षा बंगल्यावर भेटून साहेबांनी शपथ घ्यावी, हा आग्रह धरला. आज पुन्हा आम्ही जाणार आहोत. आमचा हक्क आहे, आमच्या नेत्याकडे आग्रह करायचा. आमदारांना कुणाला मंत्रीपद मिळेल, याबाबत आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही. आम्ही पक्षाचे सर्व अधिकार शिंदे साहेबांना दिले आहेत. तिघं जण कॅबिनेट घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडतील, असे त्यांनी म्हटले.
त्यांना पराभव जिव्हारी लागलाय
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना देण्यात आले आहे. मात्र, दोघेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. याबाबत विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले की, पवारसाहेब व उबाठाची काय भूमिका आहे, हे माहित नाही. मात्र शपथविधीचं शासनाकडून निमंत्रण आहे. सत्ताधारी म्हणून आम्हीही दिलेलं आहे. त्यांना पराभव किती जिव्हारी लागला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
ते पुढे म्हणाले की, पराभव स्वीकारून कामं केली पाहिजे, विजयाचा उन्माद डोक्यात जाता कामा नये. विरोधकांनी काही चांगल्या सकारात्मक बाजू मांडल्या तर नक्कीच विचार होईल. उबाठाची अवस्था संजय राऊतांनी काय केली. त्याचं ऐकल्याने ठाकरेंची ही अवस्था आहे. आम्ही 40 होतो धनुष्यबाणावर लढलो आणि 57 झालो आहोत. उबाठा किती होते आणि आता किती झाले ते पहावं. पक्षाचीही अवस्था कोणामुळे झाली हेही पहावं. पोटात एक आणि ओठात एक असे शिंदेसाहेब नाही. अडीच वर्षापूर्वी आमच्या भूमिकेवर अनेकदा विरोधकांनी टीका केली. आम्ही चांगल्या कामातून उ्तर दिलं. म्हणून 40 वरून 60 वर गेलो आहोत, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
आणखी वाचा