Eknath Shinde DCM: उदय सामंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट, एकनाथ शिंदें म्हणाले होते, 'उपमुख्यमंत्रीपद नको, मी संघटना वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन'
Political Drama over Eknath Shinde DCM post: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही, यावरुन प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. शपथविधीला काही तास बाकी असताना नाट्यमय घडामोडी.
मुंबई: एकनाथ शिंदे यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायचे नव्हते. त्याऐवजी मी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी राज्यभरात फिरेन, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. मात्र, शिवसेनेच्या आमदारांनी त्याला विरोध केला. तुम्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणे, ही आमची गरज आहे, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यामुळे येत्या एक-दीड तासात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाबाबत (Eknath Shinde DCM) आपली भूमिका मांडतील. एकनाथ शिंदेंची ही कृती म्हणजे मंत्रिमंडळातील चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठीचे दबावतंत्र नाही, असे उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे ऐनवेळी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा नव्याने सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना ओळखतो. ते चांगली खाती मिळवण्यासाठी प्रेशर टॅक्टिस वापरत नाहीत. ते एक संवेदनशील व्यक्ती आहेत. चर्चेत काही गोष्टी मागे-पुढे होतात. पण जनमताचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, हा विश्वास आम्हाला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
आम्हा सगळ्यांचं करिअर एकनाथ शिंदेंच्या हातात, त्यांना डावलून कोणी काही केलं तर... उदय सामंतांचा इशारा
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, आमच्या 59 आमदारांपैकी कोणीही उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छूक नाही. आमच नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही आणि त्यांनी आमच्यावर एखादी जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर ती आम्हीदेखील स्वीकारणार नाही, हे आम्ही शिंदे साहेबांना स्पष्टपणे सांगितले आहे. या सरकारमध्ये आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेने आणलेल्या योजनांची कायमस्वरुपी करण्यासाठी ते देवेंद्रजींना सहकार्य करतील, एकत्र बसून महाराष्ट्रातील निर्णय होतील, ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाचंही नाव येऊ नये, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की, या खुर्चीवर जाऊन बसावं. हा खुलासा करावं लागणं हे आमचे दुर्दैव आहे. आम्ही नेता एकनाथ शिंदे यांनाच मानतो. आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातात दिलं आहे. त्यामुळे त्यांना डावलून कोणी काहीतरी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे.
आणखी वाचा