Rain News: मराठवाड्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता
Aurangabad Rain News: औरंगाबादसह मराठवाड्यातील (Marathwada) इतर काही जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Aurangabad Rain News: नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (Cyclone) आज औरंगाबाद, जालना, बीडसह (Aurangabad, Jalna, Beed) ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस (Rain) पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District) आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.
एकीकडे थंडीत वाढ होत असतानाच अचानक नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन-डीस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये 10 किमी प्रतितास वेगोने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे. 9 डिसेंबर पासुन दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पंडुचेरीच्या किनाऱ्यापासुन जवळजवळ वायव्येकडे सरकुन 75 ते 85 किमी प्रतितास वेगोने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील (Marathwada) इतर काही जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानातील बदलामुळे तापमानात कमालीचे चढ-उतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अधूनमधून ढगांची गर्दी होतांना दिसत आहे. दोन दिवस अतिथंडी जाणवत असल्याचे चित्र असतांना गेल्या चार दिवस उकाडा जाणवत आहे. तसेच सोमवार ते बुधवार या काळात आकाशात ढगांची गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर औरंगाबादसह मराठवाड्यात वारे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची व मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी अवकाळी ते हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण...
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गार वारा सुरु असल्याचे चित्र आहे. याचे परिणाम मानवी जीवनावर देखील होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रब्बीच्या पीकांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे.
काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन...
सद्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे 10 डिसेंबर पासुन पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हयासह इतर जिल्हयांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुषंगाने औरंगाबाद जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी आपल्या जवळच्या तहसिल कार्यालय किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे सूचना देखील करण्यात आल्या आहेत. सोबतच आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या 0240-2331077 व 7350335104 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे देखील सूचना यावेळी करण्यात आल्यात.
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा