(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grape Farming: मराठवाड्यातील द्राक्षांना मिळतोय विक्रमी दर; काळी द्राक्षं 121 ते 130 तर साधी द्राक्षं 70 ते 80 किलो
Grape Farming: चांगल्या दर्जामुळे काळ्या द्राक्षाला (Black Grape) 121 ते 130 रुपये प्रति किलो तर साधारण द्राक्षाला 70 ते 80 रुपये भाव मिळतोय.
Grape Farming: मराठवाड्यात (Marathwada) सध्या प्रतिकूल वातावरणात देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण कधी नव्हे तो एवढा विक्रमी दर सध्या द्राक्षाच्या बागांना (Grape Orchard) मिळत आहे. मराठवाड्यातील निवडक भागात द्राक्षाची लागवड होते, मात्र नाशिकच्या द्राक्षाला बाजारात यायला आणखी काही दिवस शिल्लक असल्याने व्यापाऱ्यांनी मराठवाड्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे मोर्चा वळवलाय. त्यातच चांगल्या दर्जामुळे काळ्या द्राक्षाला (Black Grape) 121 ते 130 रुपये प्रति किलो तर साधारण द्राक्षाला 70 ते 80 रुपये भाव मिळतोय.
नशिक जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर द्राक्षाची लागवड करण्यात येते. त्यामुळे नाशिकला द्राक्षांचं माहेरघर समजले जाते. पण नाशिकमधील द्राक्षाला बाजारात यायला आणखी काही दिवस शिल्लक आहे. अशात मराठवाड्यातील द्राक्ष मात्र बाजारात येण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मराठवाड्याच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे मोर्चा वळवला असून, मागणीही वाढली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. तर औरंगाबादसह (Aurangabad), जालना (Jalna) जिल्ह्यांतील लवकर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांकडे व्यापारी सौद्यासाठी भेटी देत आहे. या दोन्ही जिल्ह्यातील काळ्या द्राक्षांचा 121 रुपये प्रति किलोचा दर मिळत असून, इतर द्राक्षांना 50 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे. विशेष म्हणजे दर ठरल्याने काही ठिकाणी बागांत काढणी सुरु झाली आहे.
'या' भागात द्राक्षांची बागा...
औरंगाबाद जिल्ह्यातील सटाना, पळशी परिसरांतही द्राक्ष बागां पाहायला मिळतात. तर जालन्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात देखील मोठ्याप्रमाणावर द्राक्षांच्या बागा आहेत. सद्या या भागात द्राक्ष व्यापारी यांची वर्दळ पाहायला मिळत आहे. तर नाशिकमधील द्राक्ष बाजारात येण्यासाठी वेळ असल्याने दोन पैसे जास्त देऊन व्यापारी मराठवाड्यातील द्राक्ष खरेदीसाठी प्राधान्य देतांना दिसून येत आहे.
अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट...
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे इतर पिकांसारखाच फटका द्राक्ष बागांना देखील बसला आहे. तर लांबलेल्या छाटण्याचाही परिणाम पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 30 ते 40 टक्के द्राक्ष बागा फुटल्याच नाही. आधीच कोरोनाच्या संकटात दोन हंगाम गेल्याने द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यात आता यंदा उत्पादनात घट झाल्याने याचाही फटका यावर्षी बसला असल्याचं शेतकरी सांगतायत.
यामुळे मिळतोय चांगला दर...
सुरवातीपासूनचे वातावरण पाहता यावर्षी द्राक्षाच्या बागा जगतील का? असे चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे अनेकांनी जोखीम न उचलण्याचा निर्णय घेत बाग न लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील द्राक्षांच्या बागेत घट झाली आहे. आता आवक कमी असल्याने आहे त्यांना चांगला दर मिळत आहे. तसेच नाशिक येथील द्राक्ष बाजारात येण्यासाठी आणखी 25 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे जालना आणि औरंगाबाद येथील द्राक्षांच्या बागेला चांगला दर मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PM Kusum Yojana: दिलासादायक! शेतकऱ्यांना होणार 5 लाख सौर पंपांचं वाटप; नेमक्या तरतूदी काय?