गुड न्यूज, सरकारचा लाडकी बहीणनंतर शेतकरी भावांसाठी मोठा निर्णय, नमो शेतकरी महासन्मानसाठी 2 हजार कोटी मंजूर, चौथा हप्ता लवकरच मिळणार
Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.
मुंबई :महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात. राज्य सरकारनं 2023-24 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. राज्य सरकारनं चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
राज्य सरकारकडून खर्चाला मान्यता
राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आतापर्यंत 5512 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या ती महिन्यांच्या कालावधीसाठी 1720 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी 1792 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. आता या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी 2041 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच
राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेच्या तीन हप्त्यांची रक्कम जमा झालेली आहे. आता राज्य सरकारनं या योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी खर्चाला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी हप्त्यामध्ये दोन हजार रुपये मिळाल आहेत. पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हप्त्यांमध्ये एकूण 34 हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आलेली आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं नुकतीच राज्यातील पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून त्याद्वारे महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये पाठवण्यात येणार आहेत. आतापर्यंत दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
संबंधित बातम्या :