Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
Nashik Crime News: साई भंडाऱ्यातून आणलेल्या प्रसादाच्या कारणावरून उफाळलेल्या रागातून लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावाचा जीव घेतल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय.

Nashik Crime News: साई भंडाऱ्यातून आणलेल्या प्रसादाच्या कारणावरून उफाळलेल्या रागातून लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावावर लाकडाने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केल्याची हृदयद्रावक घटना नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर (Bodhale Nagar) परिसरात घडली. दोघेही भाऊ मद्यपी असून, त्यांच्यात यापूर्वीपासूनच सतत वाद होत होते. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणातून अखेर सख्ख्या भावाचा जीव गेला. या घटनेमुळे धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आई आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nashik Crime News: रात्रीपासून वादाला सुरुवात
या प्रकरणी रेखा दत्तू बोरसे (रा. सुयोगनगर, बोधलेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 8 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजता या वादाला सुरुवात झाली. परिसरातील स्प्रिंग व्हॅली सोसायटीजवळील साई मंदिरात भंडारा आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणाहून योगेश दत्तू बोरसे (वय 32) हा घरी प्रसाद घेऊन आला होता. योगेश प्रसाद खात असताना, त्याचा लहान भाऊ सनी दत्तू बोरसे (वय 30) याने याबाबत जाब विचारत त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला.
Nashik Crime News: आई-बहीण मध्यस्थीला; तरीही हल्ला सुरूच
भांडण वाढत असल्याचे पाहून आई आणि बहीण रेखा यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र सनी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने योगेशला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शेजारी राहणारे आतेभाऊ तुषार जाधव हे घटनास्थळी आले. त्यांना पाहताच सनी घटनास्थळावरून पळून गेला.
Nashik Crime News: मध्यरात्री पुन्हा हल्ला
घटना इतक्यावरच थांबली नाही. रात्री सुमारे 1.30 वाजता सनी पुन्हा घरी आला. त्याने योगेशला शिवीगाळ करत लाकडाने त्याच्या कपाळावर आणि पाठीवर जोरदार वार केले. त्यानंतर सनी घरातून निघून गेला. 9 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजता आई योगेशला उठवण्यासाठी गेली असता तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. यानंतर शेजाऱ्यांनी बहिण रेखा यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. तातडीने योगेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर योगेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
Nashik Crime News: खुनाचा गुन्हा दाखल; तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी लहान भाऊ सनी बोरसे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























