(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Farmers Issue: महसूल मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच; किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी पुन्हा चालणार!
Maharashtra Farmers Issue: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत तीन तासांच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बुधवारपासून किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा मोर्चा निघणार आहे.
Maharashtra Farmers Issue: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आता अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च केल्यानंतर, बाकी प्रलंबित शेती प्रश्नांसाठी किसान सभेने, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर राज्यभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पायी मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. कृषी संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्यासह विचारवंतदेखील सहभागी होणार आहे.
किसान सभेने केलेल्या मोर्चाच्या आवाहनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रत्यक्ष मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज वर्तवला जात असताना राज्य सरकारने किसान सभेच्या शिष्टमंडळाला आज 25 एप्रिल रोजी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी आमंत्रित केले. चर्चेत किसान सभेकडून डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, डॉ. उदय नारकर, किसन गुजर, रामू पागी, संजय ठाकूर, अमोल वाघमारे, अजय बुरांडे, विश्वनाथ निगळे, सीटूचे नेते डॉ. विवेक माँटेरो, इत्यादींनी सहभाग नोंदवला. तर राज्य शासनातर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल सचिव, दुग्ध विकास सचिव व इतर संबंधित खात्याचे अधिकारी हजर होते.
महसूल मंत्र्यांसोबतची ही बैठक सुमारे तीन तास चालली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी इतर कोणत्याही खात्याचे मंत्री हजर नसल्याने मोर्चाच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांविषयी कोणताही ठोस निर्णय निघू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पायी मोर्चा ठरल्याप्रमाणे 26 एप्रिल रोजी अकोले येथून नियोजित वेळेला दुपारी तीन वाजता निघणार असल्याचे किसान सभेने जाहीर केले आहे. हा मोर्चा लोणी येथील महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर 28 एप्रिलला सायंकाळी पोहोचेल. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोर्चाचे रूपांतर बेमुदत महामुक्काम आंदोलनात होईल असा इशारा किसान सभेने दिला आहे.
कृषी संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात विचारवंतांचा सहभाग
केंद्र व राज्य सरकारचे या मूलभूत मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या 26 ते 28 एप्रिलच्या अकोले ते लोणी पायी मोर्चात अनेक मान्यवरांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देण्यात आली आहे. रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जागतिक कीर्तीचे पत्रकार पी. साईनाथ, ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. आर. रामकुमार, उत्तर भारतातील लोकप्रिय शेतकरी नेते व लेखक बादल सरोज, माकपचे आमदार विनोद निकोले आदी अकोले ते लोणी पायी मोर्चात सहभागी होणार आहेत अशी माहिती किसान सभेने दिली आहे. पी. साईनाथ आणि यातील बहुसंख्य मान्यवर मोर्चात तिन्ही दिवस सहभागी होऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अकोले ते लोणी पायी मोर्चाचा कसा असेल मार्ग?
दिनांक 26 एप्रिल 2023
अकोले बाजार तळ ते रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ, ता. संगमनेर : 12 किलोमीटर
दिनांक 27 एप्रिल सकाळी
रामेश्वर मंदिर परिसर, धांदरफळ ते खतोडे लॉन्स : 10 किलोमीटर
दिनांक 27 एप्रिल दुपारी
खतोडे लॉन्स ते जनता विद्यालय, वडगाव पान : 9.6 किलोमीटर
दिनांक 28 एप्रिल सकाळी
वडगाव पान ते समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी : 11 किलोमीटर
दिनांक 28 एप्रिल दुपारी
समृद्धी लॉन्स, निमगाव जाळी ते लोणी : 10 किलोमीटर