Latur Rain News : लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, फळबागांसह भाजीपाला पिकांचे नुकसान
लातूर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
Latur Rain News : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री लातूर जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने (unseasonal rains) जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतशिवारातील उन्हाळी सोयाबीनच्या बनिमी वाऱ्यात उडून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे.
या भागात झाला जोराचा पाऊस
वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास होत होता. मात्र, काल झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात नागिकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना मात्र फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी गावामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. पावसापेक्षा वादळी वारे जास्त होते. या वाऱ्यात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. औराद, तगरखेडा, हालसी या भागात रस्त्यावर झाडे उन्मळून तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या असल्याने रस्ते वाहतूकीसाठी बंद झाले आहेत. तगरखेडा, हालसी गावांना विद्युत पुरवठा करणारे विजेचे पोल जमीनदोस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत. त्यामुळे विद्युतपुरवठा देखील खंडित झाला आहे.
नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान, अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेत शिवारातील उन्हाळी सोयाबीनच्या बनिमी वाऱ्यात उडून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी आंब्याच्या बागांचं नुकसान झालं आहे. या भागात केशर आंबा बागांचं मोठं क्षेत्र आहे. विक्रीला तयार असणारा आंबा ह्या वादळी पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. वादळी वारे अधिक होते. औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर 10 मी मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Monsoon Update : यंदा वरुणराजाचं आगमन लवकर; 11 जूनला मराठवाड्यात, तर 'या' दिवशी मुंबईत धडकणार
- नांदेडचा प्रयोगशील शेतकरी, दीड एकरात 10 क्विंटल तीळ पिकाचे उत्पादन