(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kharif sowing : बंगालसह हरियाणामध्ये खरीपाच्या पेरणीला वेग, महाराष्ट्रासह अन्य राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम
ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. सोयाबीन, भात आणि कापूस या खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे.
Kharif sowing : सध्या देशात काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. सोयाबीन, भात आणि कापूस या खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. त्यामुळं पुढील पंधरवड्यात पडणारा पाऊस पिकांसाठी महत्त्वाचा असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही त्याठिकाणचे शेतकरी पावसाची प्रतीक्षेत आहे. त्या शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी केली आहे.
महाराष्ट्रात अद्याप पावसाची प्रतीक्षा, बंगालसह हरियणामध्ये पेरणीला वेग
मध्य प्रदेशातील माळवा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप सोयाबीन पेरणीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. तर गुजरातमधील शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेनं कापूस पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. हरियाणामध्ये, अधूनमधून मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांना भात पिकाची पेरणी करण्यास मदत केली आहे. बंगालमधील भात उत्पादक शेतकरीही पेरणी करत आहेत. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) चे कार्यकारी संचालक डी एन पाठक म्हणाले, की आत्तापर्यंत, माळवा प्रदेशात पाऊस कमी झाला आहे. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी आणखी पावसाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्याकडं जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ आहे. या पंधरवड्यात पाऊस झाल्यास या भागातही पेरणीला वेग येईल असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, गेल्या खरीपात भारताने 127.20 लाख टन सोयाबीनचे उत्पादन केले होते. गुजरातमध्ये खरीप हंगामासाठी कापसाचा पेरा मागील हंगामाच्या तुलनेत किमान 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वेळेच्या आधीच पेरण्याची घाई करु नये असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. गेल्या हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगला भाव मिळाला होता.
हरियाणात बासमती पिकाची पेरणी करण्यास मदत
हरियाणातील बासमती तांदूळ उत्पादक विजय सेटिया म्हणाले की, राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अधूनमधून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना बासमती पिकाची पेरणी करण्यास मदत झाली आहे. देशातील बिगर बासमती तांदळाचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या बंगालमध्ये शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी पेरणी सुरु केली आहे. गेल्या तीन दिवसात चांगला पाऊस झाला आहे. बंगालच्या शेतकर्यांनी देखील पेरणीला सुरुवात केली आहे. खरीप 2021 मध्ये, भारतात 107.04 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन झाले होते. उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशातील बहुतेक भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 27 ते 29 जून दरम्यान, द्वीपकल्पीय भारत आणि पूर्व भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तर वायव्य आणि मध्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.